konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 38 2

चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे उद्या उद्घाटन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : दी चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण यांच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नव्या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा बुधवार दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन उद्योग मंत्री (महाराष्ट्र राज्य) तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून खासदार मा. नारायण राणे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तसेच माजी मंत्री आ. भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आणि चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, तसेच संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनानिमित्त सर्व सभासद, खातेदार व हितचिंतकांना उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.याच निमित्ताने गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही बँकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे उद्या उद्घाटन Read More »

konkandhara 37 2

अंजनवेल किनाऱ्यावर बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई; दोन नौकांना लाखोंचा दंड

रत्नागिरी (प्रतिनिधी) – गुहागर तालुक्यातील अंजनवेल दीपस्तंभासमोर समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत लाखोंचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१३ मार्च) रात्री सुमारे १० वाजता करण्यात आली. सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नवदुर्गा गस्ती नौकेतून समुद्रात गस्त घालत असताना ही कारवाई केली. परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण, पर्यवेक्षक विनायक शिंदे, सुरक्षारक्षक अक्षय मयेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंजनवेल किनाऱ्यापासून सुमारे २० वाव अंतरावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या नौकांची पाहणी केली. यावेळी रत्नागिरीतील ए. आर. मयेकर यांच्या मालकीची ‘श्री सद्गुरू कृपा’ ही नौका एलईडी प्रकाशाचा वापर करून मासेमारी करताना आढळली. तसेच गुजरातमधील दीव येथील ट्रॉलिंग नौकाही बेकायदेशीररीत्या मासेमारी करताना सापडली. दोन्ही नौकांना ताब्यात घेऊन दाभोळ बंदरात अटकावून ठेवण्यात आले. यानंतर परवाना अधिकाऱ्यांनी अभिनिर्णय अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांच्या न्यायालयात अहवाल सादर केला. मंगळवारी झालेल्या सुनावणीत अभिनिर्णय अधिकारी सागर कुवेस्कर यांनी निर्णय देत एलईडी मासेमारी करणाऱ्या ‘श्री सद्गुरू कृपा’ नौकेचे मालक ए. आर. मयेकर यांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच गुजरातमधील ट्रॉलिंग नौकेचे मालक विनोद सोळंखी यांना ३ लाख २७ हजार ८०० रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईमुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून मत्स्यव्यवसाय विभागाने अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.

अंजनवेल किनाऱ्यावर बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई; दोन नौकांना लाखोंचा दंड Read More »

konkandhara 36 2

संगमेश्वरात जाखमाता देवीचा ‘शिंपणे’ उत्सव जल्लोषात साजरा

संगमेश्वर (प्रतिनिधी) – संगमेश्वर तालुक्यातील कसबा परिसरात देवी जाखमातेचा पारंपरिक ‘शिंपणे’ उत्सव बुधवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी या उत्सवासाठी हजेरी लावत परिसर भक्तिमय आणि रंगमय झाला. उत्सवाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या पारंपरिक फेऱ्यांनी झाली. सकाळी ६ वाजल्यापासून रंगांच्या उधळणीला प्रारंभ झाला होता. दुपारी सुमारे ३ वाजता मोठ्या वाहनांमधून लाल रंगाचे पाणी आणून फेऱ्यांमध्ये सहभागी भाविकांवर उधळण्यात आले. रस्त्यांवर तसेच घरांच्या गच्च्यांवरूनही रंगांची बरसात होत असल्याने संपूर्ण कसबा परिसर लाल रंगाने न्हाऊन निघाला. दुपारनंतर उत्सवाला अधिकच रंग चढला. ढोल-ताशा, झांज पथक आणि डीजेच्या तालावर हजारो भाविकांनी नृत्य करत आनंद लुटला. जवळपास पाच ते सहा तास हा जल्लोष सुरू होता. उत्सवादरम्यान प्रत्येक घरात मटण-भाकरी, वडे यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा बेत करण्यात आला होता. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना रंगवत आनंद साजरा करत होते. विशेषतः ‘जावई’ मानाचा असल्याने त्याला रंगवण्याची परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. धार्मिक विधींचा भाग म्हणून कसबा येथील चंडिका मंदिर, संगमेश्वर येथील निनावी व जाखमाता मंदिर तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर देवाला ‘रखवाली’ देण्याची परंपरा पार पडली. यामध्ये नारळ, कोंबडे व बकऱ्यांचा समावेश होता. यापासून तयार करण्यात आलेला प्रसाद आणि रात्री हौद फोडल्यानंतरचा प्रसाद एकत्र करून हजारो भाविकांना मटण-भाकरीचे वाटप करण्यात आले. रात्री सुमारे १० वाजता पारंपरिक विधीनुसार मानकरी मंडळींच्या उपस्थितीत पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता करण्यात आली. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल उत्सव समितीने भाविकांचे आभार मानले.

संगमेश्वरात जाखमाता देवीचा ‘शिंपणे’ उत्सव जल्लोषात साजरा Read More »

khed-khan-chemical-blast-death-toll-3

खेडमध्ये खान केमिकल स्फोटातील मृतांचा आकडा तीनवर; आणखी एका कामगाराचा मृत्यू

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुजन गोपाल दास (वय २९, मूळ रा. बंगाल, सध्या रा. आवाशी, खेड) असे मृत कामगाराचे नाव असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता तीन झाली आहे. ६ मार्च रोजी खान केमिकल कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाला होता. या स्फोटामुळे गरम रसायन कामगारांच्या अंगावर उडाले, तसेच छप्पर कोसळल्याने एकूण अकरा कामगार जखमी झाले होते. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात हलवण्यात आले होते. या दुर्घटनेत यापूर्वी ११ मार्च रोजी मुरडे येथील रघुनाथ खंडू खामकर (वय ५७) यांचा, तर १२ मार्च रोजी लातूर येथील असद खान यांचा मृत्यू झाला होता. उपचार सुरू असलेल्या कामगारांपैकी सुजन दास याने सोमवारी (१६ मार्च) उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सुजन दास यांचे कुटुंब मूळचे बंगालमधील असून, मागील ३० वर्षांपासून ते आवाशी येथे वास्तव्यास आहे. वडील गोपाल दास यांनी मेहनतीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करत येथे घर उभारले. सुजनचे शिक्षणही स्थानिक पातळीवर झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याच्या बहिणीचा विवाह पार पडला होता. आनंदाचे वातावरण असतानाच सुजनच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जखमी कामगारांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

खेडमध्ये खान केमिकल स्फोटातील मृतांचा आकडा तीनवर; आणखी एका कामगाराचा मृत्यू Read More »

असुर्डे खापरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

असुर्डे खापरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण: तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील असुर्डे खापरेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली असून शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या प्रवेश सोहळ्यात सोमा खापरे, काशिनाथ खापरे, संतोष खापरे, अजित खापरे, सुमित खापरे, राजेंद्र खापरे, प्रमोद खापरे, प्राजक्ता खापरे, अंकित खापरे, वंदना खापरे, शशिकांत खापरे, सुगंधा खापरे, योगेश खापरे, आरती खापरे, स्वाती खापरे, आयुष आग्रे, आर्यन खापरे, दिनेश खेराडे, सुजाता खेराडे, नरेंद्र खापरे, मानसी खापरे, राजेश आग्रे, कृष्णा आग्रे, अरुण आग्रे, अर्चना आग्रे, सायली आग्रे, मंगेश खापरे, गणपत खापरे, मिनाक्षी खापरे, अंजली खापरे, मारुती खापरे, प्रणय खापरे, बापूजी खापरे, सुजाता खापरे, महेंद्र खापरे, सुस्मिता खापरे, पांडूरंग खापरे, प्रतिभा खापरे, महेश खापरे, शांताराम शिगवण, विशाल शिगवण, दत्ताराम खापरे, कृष्णा खापरे, सुरज खापरे, सावी खापरे, रेश्मा खापरे, शर्मिला भुवड, धोंडू भुवड, संदेश खापरे, पारस खापरे, गणेश खापरे, सृष्टी खापरे, नारायण खापरे, ओम खापरे, सार्थक खापरे, निखील खापरे, ओम भुवड यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार शेखर निकम यांनी सर्व नवप्रवेशितांचे संपर्क कार्यालयात मनापासून स्वागत करत त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी नमूद केले. नवनिर्वाचित सावर्डे जिल्हा परिषद सदस्या पुजा निकम यांनीही प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कोकरे जि.प. गट सदस्य संजय कदम यांनीही ग्रामस्थांचे स्वागत करून भविष्यात विकासकामांबाबत ठामपणे पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दत्ताराम गुजर, आरडीसीसी संचालक राजेंद्र सुर्वे, सरपंच पंकज साळवी, सुधीर राजेशिर्के, निलेश खापरे यांच्यासह कोकरे जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रवेश केवळ राजकीय बदल नसून विकासाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

असुर्डे खापरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश Read More »

गोवळकोट रोडवरील ख्रिश्चन स्मशानभूमीची नगराध्यक्षांकडून पाहणी; स्वच्छता व कंपाउंड वॉलसाठी सूचना

गोवळकोट रोडवरील ख्रिश्चन स्मशानभूमीची नगराध्यक्षांकडून पाहणी; स्वच्छता व कंपाउंड वॉलसाठी सूचना

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड येथे असलेल्या ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीची स्वच्छता व संरक्षक भिंत उभारण्याबाबत मागणी होत असताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली. या वेळी त्यांनी संबंधित विभागाला स्मशानभूमी परिसर तातडीने स्वच्छ करणे, कंपाउंड वॉल उभारणे, तसेच आवश्यक तेथे भराव करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत, असेही त्यांनी सांगितले. या पाहणीवेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, भाजपचे गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविका वैशाली निमकर, अंजली कदम, नगरसेवक उदय जुवळे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

गोवळकोट रोडवरील ख्रिश्चन स्मशानभूमीची नगराध्यक्षांकडून पाहणी; स्वच्छता व कंपाउंड वॉलसाठी सूचना Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

धोक्याची घंटा! मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल मोजतोय शेवटची घटका : रहिमान दलवाई

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण–गुहागर मार्गावरील मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून, तो अक्षरशः शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असतानाच त्याची दयनीय अवस्था नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी व्यक्त केली आहे. गुहागर–विजापूर हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरील मिरजोळी येथील पूल ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता. अनेक दशकांपासून हा पूल वाहतुकीचा मुख्य आधार राहिला आहे. मात्र, कालांतराने देखभालीअभावी पुलाची रचना कमकुवत झाली असून, सध्या तो धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. या मार्गावरून दररोज टँकर, डंपर, ट्रक, एसटी बस तसेच लहान-मोठी वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. वाढत्या वाहतुकीच्या ताणामुळे पुलाची झीज अधिकच वाढली आहे. पुलावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.“पुलाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याआधीच प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुरुस्ती किंवा नव्याने पूल उभारण्याची गरज आहे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून, संभाव्य दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

धोक्याची घंटा! मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल मोजतोय शेवटची घटका : रहिमान दलवाई Read More »

konkandhara 42

सांगलीत स्प्रिंट ड्युअॅथलॉन स्पर्धा; चिपळुणातील आयर्न मॅन प्रशांत दाभोळकर रेस अँबेसिडर

प्रतिनिधी : कोकणधारा सांगली : S3 Training Academy यांच्या वतीने 19 एप्रिल 2026 रोजी स्प्रिंट ड्युअॅथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी आयर्न मॅन प्रशांत दाभोळकर यांची रेस अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. देशभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून S3 Training Academy फिटनेस आणि एंड्युरन्स खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करत आहे. स्पर्धेचे स्वरूप आव्हानात्मक असून त्यामध्ये प्रथम 5 किलोमीटर धावणे, त्यानंतर 20 किलोमीटर सायकलिंग आणि शेवटी 2.5 किलोमीटर धावणे असा क्रम असणार आहे.या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधील खेळाडू उत्साहाने सहभागी होतात. 18 ते 30, 31 ते 45, 46 ते 55 तसेच 56 वर्षांवरील अशा विविध वयोगटांमध्ये स्पर्धा होणार असल्याने सर्व वयोगटातील खेळाडूंना आपल्या क्षमतेची चाचणी घेण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.या उपक्रमामुळे रनिंग आणि सायकलिंग या खेळांबाबत जनजागृती होत असून फिटनेस संस्कृतीला चालना मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन S3 Training Academy चे रेस डायरेक्टर व अध्यक्ष संतोष शिंदे आणि रेस अँबेसिडर आयर्न मॅन प्रशांत दाभोळकर यांनी केले आहे.

सांगलीत स्प्रिंट ड्युअॅथलॉन स्पर्धा; चिपळुणातील आयर्न मॅन प्रशांत दाभोळकर रेस अँबेसिडर Read More »

konkandhara 41 1

भोस्ते घाटात ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या बसचा अपघात; दोघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या बसचा अपघात झाला. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा गोव्यातील प्रयोग आटपून संपूर्ण टीम मुंबईकडे परतत होती. भोस्ते घाट उतरत असताना बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. घाट उतरताना बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.या अपघातात नाटकाचे साउंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड हे जखमी झाले. विलास दाते यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांना तीन टाके घालावे लागले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रिक्षामधून कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच साहित्यप्रेमी उत्तमकुमार जैन यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व आवश्यक ते सहकार्य केले. दरम्यान, अपघातावेळी बसमध्ये सुमारे २५ जण प्रवास करत होते; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

भोस्ते घाटात ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या बसचा अपघात; दोघे जखमी Read More »

चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ कोटी ८५ लाखांहून अधिक वसुली

चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ कोटी ८५ लाखांहून अधिक वसुली

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथील जिल्हा न्यायालयात शनिवार, दि. १४ मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीत प्रलंबित व वादपूर्व अशा विविध प्रकरणांचा निकाल लागून एकूण ३ कोटी ८५ लाखांहून अधिक रक्कमेची तडजोड व वसुली करण्यात आली. या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व तालुका विधी सेवा समितीकडील ७४० प्रलंबित प्रकरणे तसेच १ हजार ३१२ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ७४० प्रलंबित प्रकरणांपैकी १०७ प्रकरणे निकाली निघाली असून, दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये एकूण ३ कोटी ५० लाख १० हजार ५२१ रुपयांची तडजोड झाली. तसेच वादपूर्व प्रकरणांपैकी ५० प्रकरणे निकाली निघून ३५ लाख ११ हजार ८ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. त्यामुळे पक्षकारांचा वेळ व खर्च वाचला.विशेष म्हणजे, चिपळूण जिल्हा न्यायालयाने गेल्या अडीच वर्षांत सलग ११ राष्ट्रीय लोकअदालतींमधून तब्बल २४ कोटीहून अधिक रक्कमेची वसुली केली असून ही बाब उल्लेखनीय ठरली आहे.ही लोकअदालत जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये विविध बँका, पतसंस्था, महावितरण, इतर वित्तीय संस्था, नुकसान भरपाई अर्ज, कौटुंबिक हिंसाचार व पोटगीसंबंधित प्रकरणांचा समावेश होता. लोकअदालतीसाठी न्यायाधीश व वकीलांचे तीन पॅनेल कार्यरत होते. या प्रक्रियेत जिल्हा न्यायालय-१ चिपळूणच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, दिवाणी न्यायाधीश के. ए. पोवार, सह दिवाणी न्यायाधीश वाय. सी. पाटील तसेच पॅनल विधीज्ञ एन. एस. सावंत, एन. जी. लाड आणि सौ. एन. यू. पवार यांनी कामकाज पाहिले. लोकअदालतीत पक्षकार व वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच चिपळूण वकील संघ, जेष्ठ विधीज्ञ, सरकारी वकील, पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याबद्दल तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा डॉ. अनिता नेवसे यांनी सर्वांचे आभार मानले.

चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ कोटी ८५ लाखांहून अधिक वसुली Read More »