konkandhara.com

क्राईम

चोरीची इको कार २४ तासांत शोधली; दापोली-शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

प्रतिनिधी : कोकणधारा दापोली : येथील व्यापारी अनिल मोरे यांची चोरीला गेलेली चारचाकी इको कार शोधून काढण्यात दापोली आणि शिरगाव पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी दोन अज्ञात इसमांनी अनिल मोरे यांची इको कार चोरून नेली होती. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शोधमोहीम सुरू केली होती.दरम्यान, गुहागर-विजापूर मार्गावरील पोफळी तांबे कॅन्टीन परिसरात एक चारचाकी गाडी संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे अलोरे-शिरगाव पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती दापोली पोलिसांना दिली. घटनेची खातरजमा करण्यासाठी दापोली पोलिसांनी फिर्यादी अनिल मोरे यांना सोबत घेऊन शिरगाव पोलिस ठाणे गाठले. तेथे उभी असलेली गाडी आपलीच असल्याची खात्री मोरे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी रीतसर पंचनामा करून सदर वाहन त्यांच्या ताब्यात सुपूर्द केले. प्राथमिक माहितीनुसार, गुहागर-विजापूर मार्गावरील एका वळणावर ही गाडी सोडून चोरटे पसार झाले होते. चोरीची घटना घडल्यानंतर केवळ एका दिवसात तपासाची दिशा निश्चित करून वाहन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. आपली गाडी सुखरूप परत मिळाल्याने व्यापारी अनिल मोरे यांनी दापोली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, वाहन हस्तगत करण्यात यश आले असले तरी ही चोरी करणारे दोन अज्ञात इसम कोण होते आणि त्यांच्या मागचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई Read More »

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण; १०९४ गॅस कार्ड्स जप्त

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण उघड; १०९४ गॅस कार्ड्स जप्त

प्रतिनिधी : कोकणधारा पाचल (वार्ताहर) : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजापूर पुरवठा विभागाने बुधवारी संबंधित सर्व्हिस सेंटरवर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १०९४ ग्राहकांची गॅस पुस्तिका (कार्ड) आणि एक कमर्शियल सिलिंडर जप्त करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली असून पुढील चौकशीसाठी प्रकरण जिल्हा पुरवठा विभागाकडे सोपवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्व्हिस सेंटरकडून ग्राहकांकडून गॅस कार्ड्स जमा करून घेतली जात होती. या कार्ड्सच्या आधारे सिलिंडर बुक करून प्रत्यक्षात ग्राहकांना गॅस न देता तेच सिलिंडर जादा दराने विक्री केल्याचा संशय आहे. काही ग्राहकांच्या नावावर सिलिंडरची उचल दाखवली गेली, मात्र त्यांना गॅस मिळाला नसल्याने हा प्रकार उघड झाला. १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता पुरवठा विभागाने छापा टाकून झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गॅस पुस्तिका आणि एक कमर्शियल सिलिंडर आढळून आला. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व्हिस सेंटरच्या संचालकांनी ग्राहक स्वतःहून कार्ड्स ठेवून जात असल्याचे सांगितले असले, तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्ड्स सापडल्याने प्रशासनाने संशय व्यक्त केला आहे. या कारवाईत पुरवठा निरीक्षक निलेश लाड, मंडल अधिकारी पूनम गावित, तलाठी नरके, शशिकांत कांबळे, लिपिक विक्रम पाटील, ग्रामवसूल अधिकारी कृष्णा गोरड, कोतवाल अमित चिले व पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे सहभागी झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण उघड; १०९४ गॅस कार्ड्स जप्त Read More »

konkandhara 63

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यातील वादातून मायलेकासह सुनेवर लोखंडी पाईपने हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अपर्णा जनार्दन शिंदे (वय ५२) या आपल्या मुलासह सामाईक वाड्यात राहत आहेत. ३० मार्च रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता घरदुरुस्तीचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरून त्यांचा मुलगा करण हा बोलण्यासाठी गेला असता, पुतण्या मयूर मनोहर शिंदे याने जागा देण्यास नकार देत शिवीगाळ सुरू केली. वाद वाढताच अपर्णा शिंदे व त्यांची सून काव्या घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी मयूरची पत्नी मयुरी शिंदे हिने सुनेला पकडून मारहाण केली. त्यानंतर मयूर शिंदे याने घरातून लोखंडी पाईप आणून अपर्णा शिंदे यांच्या हाताच्या मनगटावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. तक्रारीनुसार, मयुरी शिंदे, कलावती मनोहर शिंदे आणि सुप्रिया केतन शिंदे यांनीही फिर्यादींना पकडून ठेवत मारहाणीला साथ दिली. घटनेनंतर जखमींना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खेड पोलिसांनी मयूर मनोहर शिंदे (३६), मयुरी मयूर शिंदे (२८), कलावती मनोहर शिंदे (५५) आणि सुप्रिया केतन शिंदे (२८) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार अस्मिता साळवी करत असून, पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सामाईक मालमत्तेच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा Read More »

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; सुमित्रा ज्वेलर्समध्ये चांदीचे दागिने लंपास

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; चोरट्यांचा शोध सुरू

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी :- शहरातील मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत ज्वेलर्समधून चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याचे समोर आले असून, ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत. या तपासात प्रभारी शहर पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी करून काही धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला.

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; चोरट्यांचा शोध सुरू Read More »

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोंकणधारा मंडणगड : तालुक्यातील शिरगाव येथे पाण्याचे इलेक्ट्रिक पंप चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून या प्रकरणी चार संशयितांविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर कनोजिया (३०), मोहित कनोजिया (२१) दोघेही रा. महाड, तसेच आकाश पवार (२५) व अविनाश जाधव (२१) दोघेही रा. आकले या चौघांचा यात समावेश आहे. पहिली घटना २५ मार्च रोजी शिरगाव गोमुख येथे घडली. याबाबत सुनील पाटील (४६, व्यवसाय पंपचालक, रा. शिरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी पंपहाऊसच्या दरवाजाच्या खालच्या बाजूच्या फळ्या उचकटून आत प्रवेश केला आणि सुमारे दहा हजार रुपये किंमतीचा पाच एच.पी. क्षमतेचा बंद स्थितीतील पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला. दुसरी घटना याच दिवशी शिरगाव धर्मा येथे घडली. याबाबत आत्माराम जोंधळे (६२, व्यवसाय शेती, रा. तेरडी सुतारवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी पंपहाऊसचा सिमेंटचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करत सुमारे वीस हजार रुपये किंमतीचा बारा एच.पी. क्षमतेचा दुरुस्तीसाठी ठेवलेला जुना पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला. दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल Read More »

रत्नागिरीत तरुणाला रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून तरुणाला रॉडने बेदम मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा येथे घटना

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : जुन्या वादातून तसेच एका तरुणीशी बोलतोय या संशयातून २९ वर्षीय तरुणाला चौघांनी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील राजीवडा येथील पुलाखाली गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरमान नझीर होडेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रमजान नवाज मिरकर, साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर (सर्व रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमान होडेकर आणि आरोपी हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून परस्पर परिचित आहेत. जैतापूर (ता. राजापूर) येथील एका सामायिक मैत्रिणीने रमजान मिरकर याचे काही सामान अरमान यांच्याकडे दिले होते. ते सामान पोहोचवण्यासाठी जात असताना, फिर्यादी त्या तरुणीला का भेटतो आणि तिच्याशी का बोलतो, असा संशय रमजान मिरकर याने घेतला. याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी रमजान मिरकर याला इतर तिघांनी साथ देत चौघांनी मिळून अरमान याला रॉडने मारहाण केली.

जुन्या वादातून तरुणाला रॉडने बेदम मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा येथे घटना Read More »

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार

प्रतिनिधी : कोंकणधारा संगमेश्वर : तालुक्यातील निवे बुद्रुक-शिंदेवाडी येथे घराचे किंवा कपाटाचे कोणतेही कुलूप न तोडता कपाटातच ठेवलेल्या चावीचा वापर करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडली असून ५ मार्च रोजी ती उघड झाली. याबाबत सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर २७ मार्च रोजी देवरूख पोलिस स्थानकात फिर्याद नोंदवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दौलत पाल्ये (वय ५६) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांचे निवे बुद्रुक येथे सामायिक घर असून, घटनेच्या वेळी कपाटाच्या लॉकरची चावी घरातच ठेवलेली होती. चोरट्याने याचाच फायदा घेत कपाट उघडून दोन तोळे सोन्याचा हार आणि दोन तोळे सोन्याची चेन, असे एकूण चार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा जबरदस्तीच्या खुणा आढळून न आल्यामुळे, घरातील व्यवस्था आणि चाव्यांची माहिती असलेल्या एखाद्या जवळच्या किंवा परिचित व्यक्तीनेच ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेत परिसरातील संशयितांची चौकशी सुरू केली असून पुढील तपास देवरूख पोलिसांकडून सुरू आहे.

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार Read More »

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : तालुक्यातील जयगड सागरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत गणपतीपुळे–चाफे मुख्य मार्गावर शनिवारी (दि. २८ मार्च) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश मधुकर साळवी (वय ५६, मूळ रा. फणसोप, रत्नागिरी, सध्या रा. रामरोड, गणपतीपुळे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास चाफे ते गणपतीपुळे मार्गावर नेहमीप्रमाणे चालण्यासाठी गेले होते. याचदरम्यान, त्या मार्गावरून वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावरच कोसळले. आसपासच्या ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड–गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी करत आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना Read More »

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडला; खळबळ

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण : तालुक्यातील देवखेरकी परिसरात एका हापूस आंब्याच्या बागेजवळ जळालेला मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह ठेवून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी जळालेल्या बॅगेचे अवशेष तसेच दोन लोखंडी रॉड आढळून आले असून, ते या प्रकरणाशी संबंधित असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी बागेत काम करणाऱ्या एका मजुराला हा मृतदेह दिसला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने तो घाबरून गेला आणि भीतीपोटी त्याने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. अखेर, मनावरील ताण वाढल्यानंतर त्याने ही माहिती बागमालकाला दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बराच कालावधी उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा सांगाडा उरला असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रत्नागिरी येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरील अवशेष आणि हाडांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेत सापडलेले अवशेष अल्पवयीन मुलाचे किंवा मुलीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. हा प्रकार पूर्वनियोजित खून असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात किंवा आसपासच्या भागात कोणते बालक बेपत्ता आहे का, याचीही माहिती पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगाराचा तातडीने शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ Read More »

चिपळूण बाजारपेठेत छेडप्रकरण; भावाकडून मारहाण, परस्पर तक्रारी

चिपळूण बाजारपेठेत महिला कर्मचाऱ्याची छेड; भावाकडून तरुणाला मारहाण, परस्परविरोधी तक्रारी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील बाजारपेठ परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची कथित छेड काढणाऱ्या तरुणाला संबंधित महिलेच्या भावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे बाजारपेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि संबंधित तरुण हे दोघेही शहरातील बाजारपेठेतील एका दुकानात कामाला आहेत. कामाच्या ठिकाणी संबंधित तरुणाकडून महिलेला वारंवार त्रास दिला जात असल्याची चर्चा असून, याबाबत त्याला यापूर्वीही समज देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, समज देऊनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने संबंधित महिला मानसिक त्रासात होती, अशी माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार पुन्हा घडल्याने महिलेच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली. याची माहिती मिळताच महिलेचा भाऊ थेट दुकानाजवळ पोहोचला.त्यानंतर संबंधित तरुणाला जाब विचारण्यात आला. या वेळी दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात महिलेच्या भावाने तरुणाला मारहाण केल्याचे समोर आले आहे.घटनेदरम्यान परिसरातील काही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या वेळी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने या घटनेकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. दरम्यान, या प्रकरणात संबंधित महिलेच्या बाजूने छेडछाडीबाबत तक्रार देण्यात आली असून, दुसरीकडे मारहाण झालेल्या तरुणानेही स्वतःवर हल्ला झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही बाजूंच्या तक्रारींची पडताळणी करत असून, दुकानातील सहकारी, परिसरातील साक्षीदार तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.चिपळूण पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे समजते. महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारांविषयी व्यापारी वर्तुळातही चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेमुळे बाजारपेठ परिसरात चर्चेला उधाण आले असून, नेमका प्रकार काय घडला, याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. पोलीस तपासानंतर या प्रकरणाचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

चिपळूण बाजारपेठेत महिला कर्मचाऱ्याची छेड; भावाकडून तरुणाला मारहाण, परस्परविरोधी तक्रारी Read More »