konkandhara.com

27 मई 2026

Web Banner 8

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे दीपक फाउंडेशन आणि येथील शेतकरी व तरुण वर्ग यांच्या सहकार्यातून निवी गाव परिसरात पाणलोट बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात निवी गाव आणि परिसर पाणीदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. रोहा तालुक्याला बारामाही वाहणाऱ्या कुंडलिका नदीचे वरदान लाभले असले तरी येथील सत्ताधारी राजकारण्यांच्या मानसिकतेमुळे पाण्याचे नियोजन झाले नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. शेतकरी वर्गाचे हित जपण्यापेक्षा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर पकड कशी राहील यावरच अधिक भर दिला गेल्याने रोहा तालुक्यातील शेती ओस पडली आणि विकली गेली. मात्र नेत्यांच्या बागायती हजारो झाडांनी फुलल्याचे चित्र असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. रोहा तालुक्यात विशेषतः लांढर, निवी आणि बोरघर परिसरातील तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांचे पाणी नसल्याने डोळे उघडले. त्यांनी कालव्याच्या पाण्यासाठी बळीराजा संघटनेच्या माध्यमातून लढा दिला. त्यातून काही प्रमाणात यश मिळाले आणि पाणी सुरू झाले. रोहा तालुक्याच्या हरितक्रांतीच्या विकासाला गती मिळण्यासाठी येथील शेतकरी जागा होणे आवश्यक असल्याचेही स्थानिकांकडून सांगितले जात आहे. निवी परिसरात “पाणी आडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेतून डोंगरातील पाणी अडवण्याचे काम केले जाणार आहे. दीपक फाउंडेशन आणि स्थानिकांच्या सहकार्यातून पाच बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमामुळे परिसर पाणीदार होणार असून, रोहा तालुक्यातील तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा आदर्श घेऊन आपल्या परिसरातही अशा प्रकारचे बंधारे उभारावेत, अशी मागणी होत आहे. परिसर सुजलाम-सुफलाम व्हावा आणि या पाणीस्त्रोताचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, हा पाणलोट बंधारे उभारण्यामागील उद्देश असल्याची माहिती दीपक फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम यांनी दिली.

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा Read More »

Web Banner 7

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जय बजरंग रोहा खो-खो संघाचा कु. अनुराज योगेश ठाकूर याची सोलापूर येथे होणाऱ्या ५२ व्या महाराष्ट्र राज्य कुमार गट अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कुमार गट संघात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अनुराजची सलग दुसऱ्या वर्षी रायगड जिल्हा संघात निवड झाली असून मागील वर्षी देखील त्याने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. सातत्यपूर्ण सराव, मेहनत, फिटनेस आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा जिल्हा संघात आपले स्थान कायम राखले आहे. जय बजरंग रोहा खो-खो संघ यांच्या माध्यमातून अनुराजने अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या यशामध्ये त्याचे वडील आणि परिवाराचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले जात आहे. कुस्ती खेळाचा वारसा असल्यामुळे क्रीडाविषयक आवड त्याच्यामध्ये लहानपणापासून होती. या निवडीबद्दल जय बजरंग क्रीडा मंडळ रोहा तसेच परिसरातील क्रीडाप्रेमींनी अनुराज योगेश ठाकूर याचे अभिनंदन केले आहे.

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड Read More »

Web Banner 6

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात आज महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळ स्थापनेनंतर झालेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळ अधिनस्त नोंदणीकृत मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. मंडळाच्या माध्यमातून कामगारांना अधिकाधिक लाभ मिळतील, यासाठी प्रशासनाने पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने काम करावे. तसेच जास्तीत जास्त मच्छिमारांची नोंदणी करण्यासाठी मत्स्य विभाग आणि कामगार विभाग यांनी संयुक्तपणे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रलंबित लेखापरीक्षण आणि न्यायालयीन प्रकरणे वेळेत निकाली काढण्यावरही भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, या विषयासंदर्भात कामगार मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे Read More »

Web Banner 4

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ६० पेट्रोलपंपांपैकी ८ पेट्रोलपंपांवर इंधन उपलब्धतेसंदर्भात अडचणी निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ६ पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांचा तात्पुरता तुटवडा आहे. तसेच २ पेट्रोलपंपांपैकी एका पंपावर केवळ पेट्रोल उपलब्ध असून डिझेल उपलब्ध नाही, तर दुसऱ्या पंपावर डिझेल उपलब्ध असून पेट्रोल उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ड्राय असलेल्या पेट्रोलपंपांचे टँकर लोड करण्यात आले असून उद्यापर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती कंपन्यांचे विक्रय प्रतिनिधी आणि डेपो व्यवस्थापकांनी प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधनासंदर्भात भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उर्वरित बहुतांश पेट्रोलपंप सुरळीत सुरू असून संबंधित कंपन्यांच्या पुरवठ्यानुसार आणि डेपोमधील मागणीनुसार इंधन वितरण सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने Hindustan Petroleum (HPCL), Indian Oil Corporation (IOCL) आणि Bharat Petroleum (BPCL) या कंपन्यांच्या डेपो व्यवस्थापक आणि विक्री प्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. याशिवाय, कृत्रिम दरवाढ किंवा इंधन साठेबाजीचे प्रकार रोखण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके सक्रिय करण्यात आली आहेत. पेट्रोलपंपांची तपासणी आणि छापे टाकण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा Read More »

WhatsApp Image 2026 05 23 at 11.03.44 PM

पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन

दोडामार्ग : भूषण सावंत: जिल्ह्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अवकाळी पावसात वारंवार खंडित होणारी वीज सेवा, तासन्तास अंधारात राहणारी गावे, दुरुस्तीला होणारा विलंब तसेच ग्राहकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी पावसाळ्यात वीज विभाग सक्षमपणे सेवा देऊ शकेल का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य विज ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कुडाळ येथील जिल्हा अधीक्षक अभियंता कार्यालयात जाब विचारणा आंदोलन छेडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तमाम विज ग्राहकांनी आपल्या लेखी तक्रारींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर आणि सोशल मीडिया प्रमुख मनोज घाटकर यांनी केले आहे. “पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वीज यंत्रणा कोलमडत असेल तर मुसळधार पावसात परिस्थिती किती बिकट होईल, याची कल्पना न केलेली बरी,” असा आक्रमक इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. वारंवार होणारे वीज खंडित प्रकार, झाडांच्या फांद्या न छाटणे, जुनाट तारांमुळे उद्भवणारे धोके, ग्रामीण भागातील दुर्लक्षित सेवा आणि ग्राहकांना मिळणारी असमाधानकारक वागणूक याबाबत प्रशासनाला थेट जाब विचारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी आता शांत न बसता आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन Read More »