konkandhara.com

Editorial

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोंकणधारा मंडणगड : तालुक्यातील शिरगाव येथे पाण्याचे इलेक्ट्रिक पंप चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून या प्रकरणी चार संशयितांविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर कनोजिया (३०), मोहित कनोजिया (२१) दोघेही रा. महाड, तसेच आकाश पवार (२५) व अविनाश जाधव (२१) दोघेही रा. आकले या चौघांचा यात समावेश आहे. पहिली घटना २५ मार्च रोजी शिरगाव गोमुख येथे घडली. याबाबत सुनील पाटील (४६, व्यवसाय पंपचालक, रा. शिरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी पंपहाऊसच्या दरवाजाच्या खालच्या बाजूच्या फळ्या उचकटून आत प्रवेश केला आणि सुमारे दहा हजार रुपये किंमतीचा पाच एच.पी. क्षमतेचा बंद स्थितीतील पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला. दुसरी घटना याच दिवशी शिरगाव धर्मा येथे घडली. याबाबत आत्माराम जोंधळे (६२, व्यवसाय शेती, रा. तेरडी सुतारवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी पंपहाऊसचा सिमेंटचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करत सुमारे वीस हजार रुपये किंमतीचा बारा एच.पी. क्षमतेचा दुरुस्तीसाठी ठेवलेला जुना पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला. दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल Read More »

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी

प्रतिनिधी : कोंकणधारा गुहागर : एप्रिल महिन्यात गुहागर येथे कासव महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय नगर पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यावसायिक, पर्यटनप्रेमी आणि नागरिकांना महोत्सवाचे प्रात्यक्षिक कांदळवन प्रतिष्ठानतर्फे दाखविण्यात येणार आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या ६ कासव संवर्धन केंद्रे उभारण्यात आली असून, येथून दररोज कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. हा निसर्गरम्य आणि दुर्मीळ अनुभव पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता यावा, तसेच वनविभागाच्या शेड्युल ‘अ’ श्रेणीतील ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी, यासाठी कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे गुहागरच्या समुद्र पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या संदर्भात नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, नगरसेवक, मुख्याधिकारी, पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय वनाधिकारी किरण ठाकूर, वेळास कासव महोत्सवाचे प्रणेते भाऊ काटदरे आणि कांदळवन प्रतिष्ठानचे मोहन उपाध्ये उपस्थित होते. भाऊ काटदरे यांनी कासव महोत्सवाच्या यशासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कासव संवर्धनाशी संबंधित सर्व कामे वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानकडूनच केली जातील, नागरिकांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पर्यटकांना योग्य मार्गदर्शन, नियमांचे पालन आणि गुहागरचा इतिहास, निसर्गसौंदर्य, पक्षीनिरीक्षण व धार्मिक पर्यटन यांची जोड देऊन पर्यटकांचा मुक्काम वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहन उपाध्ये यांनी कासव संवर्धनातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित केली. कासवांच्या पिल्लांना हाताळणे किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर करून जाहिरात करणे टाळावे, तसेच मोठ्या पर्यटन संस्थांकडून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना सुरुवातीपासूनच आळा घालावा, असे त्यांनी सांगितले.

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी Read More »

आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटकाचा बुडून मृत्यू; एकाचा जीव वाचला

आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पर्यटकाचा बुडून मृत्यू, एकाचा जीव वाचला

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील दोन सदस्य समुद्रात बुडाले असून, त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाला स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर आणि विरार परिसरातील एक कुटुंब रविवारी सकाळी आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास समुद्रात उतरलेल्या संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ओहोटीच्या प्रवाहाने आत ओढले. त्यामुळे दोघेही बुडू लागले. यावेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तसेच पोलीस पाटील आदेश कदम यांनी तात्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुयोग राजेश भानुशाली (वय २१, रा. विरार) याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, संतोष शशिकांत भानुशाली (रा. पालघर) यांचा या घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भानुशाली कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पर्यटकाचा बुडून मृत्यू, एकाचा जीव वाचला Read More »

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,देवस्थानकडून महाप्रसादाची वेळ वाढवली

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने गणपतीपुळे परिसरातील अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत. यामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समितीने स्वयंभू श्री गणपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या मोफत महाप्रसादाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळेनुसार, दुपारच्या सत्रातील महाप्रसाद दुपारी १२.१५ ते ३ वाजेपर्यंत, तर सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ७.१५ ते ८.४५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. यापूर्वी ही वेळ अनुक्रमे दुपारी १२.१५ ते २ आणि सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.१५ अशी होती. दरम्यान, गॅस टंचाईमुळे लाडू प्रसाद सध्या बंद ठेवण्यात आला आहे. लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस लागतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,देवस्थानकडून महाप्रसादाची वेळ वाढवली Read More »

रत्नागिरीत तरुणाला रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून तरुणाला रॉडने बेदम मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा येथे घटना

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : जुन्या वादातून तसेच एका तरुणीशी बोलतोय या संशयातून २९ वर्षीय तरुणाला चौघांनी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील राजीवडा येथील पुलाखाली गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरमान नझीर होडेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रमजान नवाज मिरकर, साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर (सर्व रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमान होडेकर आणि आरोपी हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून परस्पर परिचित आहेत. जैतापूर (ता. राजापूर) येथील एका सामायिक मैत्रिणीने रमजान मिरकर याचे काही सामान अरमान यांच्याकडे दिले होते. ते सामान पोहोचवण्यासाठी जात असताना, फिर्यादी त्या तरुणीला का भेटतो आणि तिच्याशी का बोलतो, असा संशय रमजान मिरकर याने घेतला. याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी रमजान मिरकर याला इतर तिघांनी साथ देत चौघांनी मिळून अरमान याला रॉडने मारहाण केली.

जुन्या वादातून तरुणाला रॉडने बेदम मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा येथे घटना Read More »

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार

प्रतिनिधी : कोंकणधारा संगमेश्वर : तालुक्यातील निवे बुद्रुक-शिंदेवाडी येथे घराचे किंवा कपाटाचे कोणतेही कुलूप न तोडता कपाटातच ठेवलेल्या चावीचा वापर करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडली असून ५ मार्च रोजी ती उघड झाली. याबाबत सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर २७ मार्च रोजी देवरूख पोलिस स्थानकात फिर्याद नोंदवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दौलत पाल्ये (वय ५६) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांचे निवे बुद्रुक येथे सामायिक घर असून, घटनेच्या वेळी कपाटाच्या लॉकरची चावी घरातच ठेवलेली होती. चोरट्याने याचाच फायदा घेत कपाट उघडून दोन तोळे सोन्याचा हार आणि दोन तोळे सोन्याची चेन, असे एकूण चार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा जबरदस्तीच्या खुणा आढळून न आल्यामुळे, घरातील व्यवस्था आणि चाव्यांची माहिती असलेल्या एखाद्या जवळच्या किंवा परिचित व्यक्तीनेच ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेत परिसरातील संशयितांची चौकशी सुरू केली असून पुढील तपास देवरूख पोलिसांकडून सुरू आहे.

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार Read More »

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : तालुक्यातील जयगड सागरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत गणपतीपुळे–चाफे मुख्य मार्गावर शनिवारी (दि. २८ मार्च) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश मधुकर साळवी (वय ५६, मूळ रा. फणसोप, रत्नागिरी, सध्या रा. रामरोड, गणपतीपुळे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास चाफे ते गणपतीपुळे मार्गावर नेहमीप्रमाणे चालण्यासाठी गेले होते. याचदरम्यान, त्या मार्गावरून वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावरच कोसळले. आसपासच्या ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड–गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी करत आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना Read More »

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडला; खळबळ

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण : तालुक्यातील देवखेरकी परिसरात एका हापूस आंब्याच्या बागेजवळ जळालेला मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह ठेवून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी जळालेल्या बॅगेचे अवशेष तसेच दोन लोखंडी रॉड आढळून आले असून, ते या प्रकरणाशी संबंधित असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी बागेत काम करणाऱ्या एका मजुराला हा मृतदेह दिसला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने तो घाबरून गेला आणि भीतीपोटी त्याने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. अखेर, मनावरील ताण वाढल्यानंतर त्याने ही माहिती बागमालकाला दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बराच कालावधी उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा सांगाडा उरला असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रत्नागिरी येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरील अवशेष आणि हाडांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेत सापडलेले अवशेष अल्पवयीन मुलाचे किंवा मुलीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. हा प्रकार पूर्वनियोजित खून असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात किंवा आसपासच्या भागात कोणते बालक बेपत्ता आहे का, याचीही माहिती पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगाराचा तातडीने शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ Read More »

चिपळूण बाजारपेठेत छेडप्रकरण; भावाकडून मारहाण, परस्पर तक्रारी

चिपळूण बाजारपेठेत महिला कर्मचाऱ्याची छेड; भावाकडून तरुणाला मारहाण, परस्परविरोधी तक्रारी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील बाजारपेठ परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची कथित छेड काढणाऱ्या तरुणाला संबंधित महिलेच्या भावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे बाजारपेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि संबंधित तरुण हे दोघेही शहरातील बाजारपेठेतील एका दुकानात कामाला आहेत. कामाच्या ठिकाणी संबंधित तरुणाकडून महिलेला वारंवार त्रास दिला जात असल्याची चर्चा असून, याबाबत त्याला यापूर्वीही समज देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, समज देऊनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने संबंधित महिला मानसिक त्रासात होती, अशी माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार पुन्हा घडल्याने महिलेच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली. याची माहिती मिळताच महिलेचा भाऊ थेट दुकानाजवळ पोहोचला.त्यानंतर संबंधित तरुणाला जाब विचारण्यात आला. या वेळी दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात महिलेच्या भावाने तरुणाला मारहाण केल्याचे समोर आले आहे.घटनेदरम्यान परिसरातील काही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या वेळी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने या घटनेकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. दरम्यान, या प्रकरणात संबंधित महिलेच्या बाजूने छेडछाडीबाबत तक्रार देण्यात आली असून, दुसरीकडे मारहाण झालेल्या तरुणानेही स्वतःवर हल्ला झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही बाजूंच्या तक्रारींची पडताळणी करत असून, दुकानातील सहकारी, परिसरातील साक्षीदार तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.चिपळूण पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे समजते. महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारांविषयी व्यापारी वर्तुळातही चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेमुळे बाजारपेठ परिसरात चर्चेला उधाण आले असून, नेमका प्रकार काय घडला, याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. पोलीस तपासानंतर या प्रकरणाचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

चिपळूण बाजारपेठेत महिला कर्मचाऱ्याची छेड; भावाकडून तरुणाला मारहाण, परस्परविरोधी तक्रारी Read More »

चिपळूण पाग परिसरात उड्डाणपूल; १०७.७८ कोटींच्या प्रकल्पासाठी नारायण राणे पुढाकार

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ व पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाढती लोकसंख्या, अवजड वाहनांची वर्दळ आणि शहरांतर्गत वाहतुकीचा ताण लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १०७ कोटी ७८ लाख रुपयांच्या वाढीव उड्डाणपुलाचा (Elevated Structure) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. तहसील कार्यालय ते ‘पाग’ या दरम्यान उड्डाणपुलाची लांबी वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या भागात एसटी बसेस व अवजड वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात घडले असून, वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १८ जून २०२५ रोजी १०७.७८ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला. त्यानंतर २२ जुलै २०२५ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडून हा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, वार्षिक आराखड्यात या कामाचा समावेश करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या प्रकल्पाची निकड लक्षात घेऊन खासदार नारायण राणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. चिपळूणमधील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची गंभीरता त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे शहरातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे विभाजन होऊन अपघातांमध्ये मोठी घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कामासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही पाठपुरावा केला आहे. खासदार राणे यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. साखळी क्रमांक ५१+५५० ते ५२+६२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या या उड्डाणपुलामुळे चिपळूणच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.सध्या या प्रस्तावावर पुढील प्रशासकीय कार्यवाही अपेक्षित असून, केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार Read More »