konkandhara.com

Editorial

मराठवाडा पूरस्थिती गंभीर! आतापर्यंत 8 जणांचा बळी

मुंबई | मराठवाड्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं आहे. शेती पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून जनावरांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक ठिकाणी बचाव पथकं अद्यापही कार्यरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर, धाराशिव व बीड जिल्ह्यांचा दौरा करतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी करतील. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील आपल्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत एकूण 23 टक्के शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हवामान विभागानं पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या परिस्थितीत विरोधकांनी सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करून त्यासाठीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी मात्र पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, पुढील आठ दिवसांत 2,215 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. तसेच सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अनेक आमदार-खासदार पूरग्रस्त भागात उतरले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी परांडा तालुक्यात एक आजी आणि तिच्या दोन वर्षांच्या नातवाला पूरातून वाचवले. काँग्रेस आमदार अमित देशमुख, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांनीही पूरग्रस्त गावांना भेटी देऊन मदतकार्याचा आढावा घेतला आहे. मराठवाड्यातील पूरस्थिती अद्याप गंभीर असून शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. पुढील काही दिवसांत राज्य सरकार आणि प्रशासन कोणती ठोस पावलं उचलतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मराठवाडा पूरस्थिती गंभीर! आतापर्यंत 8 जणांचा बळी Read More »

जगप्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; 92 व्या वर्षी अखेरचा निरोप

क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि आदरणीय अंपायर डिकी बर्ड (Dickie Bird) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. इंग्लंडच्या यॉर्कशर क्लबकडून त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती देण्यात आली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) देखील श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, “डिकी बर्ड हे केवळ यॉर्कशरचे अभिमान नव्हते, तर संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचे लाडके अंपायर होते.” डिकी बर्ड यांनी आपल्या कारकिर्दीत 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली. 1975, 1979 आणि 1983 या सलग तीन वर्ल्ड कप अंतिम सामन्यांमध्ये अंपायरिंग करणारे ते जगातील पहिले अंपायर होते. विशेष म्हणजे, 1983 च्या अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. मोहिंदर अमरनाथच्या निर्णायक एलबीडब्लू निर्णयावेळी डिकी बर्ड यांनी हात वर करत “आऊट” दिला आणि त्याच क्षणी भारतीय क्रिकेटचा सुवर्णअध्याय लिहिला गेला. 1933 मध्ये इंग्लंडच्या बार्न्सले येथे जन्मलेले बर्ड सुरुवातीला फर्स्ट क्लास क्रिकेटपटू होते. मात्र फलंदाज म्हणून फारसं यश न मिळाल्याने त्यांनी 32 व्या वर्षी खेळाला अलविदा करून अंपायरिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1970 मध्ये काउंटी चॅम्पियनशिपमधून त्यांनी अंपायरिंगची सुरुवात केली आणि 1973 मध्ये इंग्लंड–न्यूझीलंड कसोटीमधून आंतरराष्ट्रीय अंपायरिंगमध्ये पदार्पण केले. पुढील दोन दशकांत डिकी बर्ड जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आदरणीय अंपायर म्हणून ओळखले गेले. एकूण 66 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामने त्यांनी निर्णयक्षमतेने पार पाडले. 1996 मध्ये भारताविरुद्धच्या टेस्ट सामन्यात त्यांनी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना अंपायर केला. याच सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी कसोटी पदार्पण केले होते. सामन्यानंतर दोन्ही संघांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देत सन्मानित केले होते. डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाने एक साधा, अचूक आणि खेळाडूंच्या मनात कायम घर करून राहिलेला अंपायर गमावला आहे. अंपायरिंगची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढविण्यात त्यांचे योगदान अनमोल राहील.

जगप्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; 92 व्या वर्षी अखेरचा निरोप Read More »

शिर्डी साई संस्थानवर 6 सदस्यीय समितीचा प्रस्ताव रद्द; उच्च न्यायालयाने दिला राज्य सरकारला जबर धक्का!

अहिल्यानगर : शिर्डी साई संस्थान समिती प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. सरकारकडून नेमण्यात येणाऱ्या सहा सदस्यीय समितीला न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्य सरकारने संस्थानवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर जिल्हाधिकारी सहअध्यक्ष म्हणून काम पाहणार होते. याशिवाय, स्थानिक आमदार, नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समितीत सदस्य म्हणून सहभागी होणार होते. या प्रस्तावावर आधारित संस्थानकडून उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांना शिफारस पाठविण्यात आली होती. मात्र, याविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल केली होती. सुनावणीत न्यायालयाने समितीच्या नेमणुकीवर आक्षेप घेत स्पष्ट स्थगिती दिली. दरम्यान, सुनावणीदरम्यान शिर्डी साई संस्थाननेच माघार घेतली. शासनाच्या सूचनेनुसार प्रस्ताव पुढे नेण्यात आला होता, पण न्यायालयीन प्रक्रियेत संस्थानने प्रस्ताव मागे घेतल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी साईबाबा संस्थान सध्या त्रिसदस्यीय समितीकडे चालवले जाते. व्यवस्थापन आणि कार्यान्वयन अधिक प्रभावी करण्यासाठी सहा सदस्यीय समितीची शिफारस करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन स्थगितीनंतर आता संस्थानच्या कारभाराचे भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ स्थापन केले जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारला न्यायालयीन झटका बसल्यानंतर पुढील पावले काय असतील याची उत्सुकता वाढली आहे.

शिर्डी साई संस्थानवर 6 सदस्यीय समितीचा प्रस्ताव रद्द; उच्च न्यायालयाने दिला राज्य सरकारला जबर धक्का! Read More »

यवतमाळनंतर चिपळूणमध्येही TWJ कंपनीचा मोठा घोटाळा! 28 लाख 50 हजारांची भावंडांची फसवणूक

रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील 39 लाखांच्या फसवणुकीनंतर आता चिपळूणमध्येही ट्रेड विथ जॅझ (TWJ) कंपनीच्या फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण शहरातील भावंडांची तब्बल 28 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कंपनीच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण शहरातील इंटक भवन येथे असलेल्या TWJ कंपनीच्या कार्यालयातून हा सगळा कारभार चालत होता. आरोपी समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांनी स्वत:ला कंपनीचे प्रतिनिधी सांगत प्रतिक दिलीप माटे आणि त्यांची बहीण तृप्ती दिलीप माटे यांचा विश्वास संपादन केला. महिन्याला 3 ते 4 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी प्रतिक माटे यांच्याकडून 3.5 लाख आणि त्यांच्या बहिणीकडून 25 लाख रुपये गुंतवून घेतले. जानेवारी 2023 पासून आजपर्यंत या दोघांनी मिळून 28.5 लाख रुपये गुंतवले. मात्र, मे 2025 नंतर कंपनीने कोणताही परतावा दिला नाही. वारंवार मागणी करूनही मूळ रक्कमही न परतवल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रतिक माटे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, TWJ कंपनीने गुंतवणूकदारांना सुरुवातीला मोठा नफा दाखवून आकर्षित केले होते. एका लाख रुपयांवर महिन्याला 7 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात होते. हळूहळू हा दर 6, 5, 4 आणि 3 टक्क्यांपर्यंत कमी झाला. काही गुंतवणूकदारांनी सुरुवातीला दामदुप्पट नफा घेतला, त्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि गुंतवणुकीचा ओघ वाढत गेला. पुढे कंपनीने गुंतवणूक थांबवली आणि फसवणूक उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी अशा हाय-प्रोफाईल लोकांकडून करोडो रुपये गोळा केले असून, हा गैरव्यवहार तब्बल 1000 ते 1200 कोटी रुपयांचा असल्याची चर्चा आहे. कंपनीकडे इव्हेंट, इन्फ्रा, हॉस्पिटॅलिटी, लर्निंग, लॉजिस्टीक अशा विविध उपकंपन्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अवास्तव आमिषांना बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच गुंतवणूक करावी.

यवतमाळनंतर चिपळूणमध्येही TWJ कंपनीचा मोठा घोटाळा! 28 लाख 50 हजारांची भावंडांची फसवणूक Read More »

आमच्या ताटात हात घालू नका! – अलिबागमध्ये आदिवासी-कोळी समाजाचा इशारा

अलिबाग | राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणात वाटा मागण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोळी व आदिवासी समाज आक्रमक झाला असून येत्या 30 सप्टेंबर रोजी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (20 सप्टेंबर) अलिबाग येथे झालेल्या संयुक्त बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बैठकीत आरक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा नेत्यांनी मांडला. जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती दिलीप भोईर म्हणाले, “आमचा कुणालाही आरक्षण द्यायला विरोध नाही. परंतु आमच्या हक्काच्या जागेत कुणी डोकावलं, तर ते आम्ही सहन करणार नाही. आधीच आदिवासी व कोळी बांधव अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. अशा वेळी आमच्या ताटात हात घालण्याचा प्रयत्न आम्ही रोखून धरू.” बैठकीला माजी तहसीलदार मोरेश्वर आडके अध्यक्षस्थानी होते. यावेळी आदिवासी कातकरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान नाईक, माजी तहसीलदार रवी पाटील, ऑफ्रोह संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, धर्मा लोभी, गजानन पाटील आदींसह अनेक समाजनेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन समाजबांधवांना एकत्र करण्याचं ठरलं आहे. स्वतंत्र समित्या स्थापन करून नियोजन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनातून कोळी व आदिवासी समाजाने सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर कुणाचाही डोळा असू नये.

आमच्या ताटात हात घालू नका! – अलिबागमध्ये आदिवासी-कोळी समाजाचा इशारा Read More »

महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा – सांगलीत डॉ. अमोल कोल्हेंचा जोरदार इशारा!

सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा: डॉ. अमोल कोल्हे यांचा सडेतोड इशारा सांगली – महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या निमित्ताने सांगलीत उत्स्फूर्त जनसमुदाय एकत्र आला होता. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. जयंतराव पाटील यांचा वारसा आणि संस्कृत परंपरा यांचा गौरव करण्यात आला. मोर्चात भाषण करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अलीकडच्या राजकीय वातावरणावर थेट हल्ला चढवला. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्राची भूमी ही शिव्यांचा नाही तर ओव्यांचा वारसा सांगणारी आहे. स्व. यशवंतराव चव्हाणपासून शरद पवार साहेबांपर्यंतच्या सर्व नेत्यांनी ही सुसंस्कृत परंपरा जपली. मात्र काही स्वयंघोषित नेत्यांनी वाचाळवीरांचा आधार घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ माजवला आहे.” यावेळी डॉ. कोल्हे यांनी विशेषतः स्व. राजारामबापू पाटील यांचा अपमान केल्याचा निषेध नोंदवला. सहकार चळवळीतील त्यांचे योगदान, शेतकऱ्यांना दिलेला समृद्धीचा मार्ग हा महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. “महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुमच्या सत्तेपेक्षा, राजकीय अस्तित्वापेक्षा महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे. या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे, हेच सांगलीत अनुभवले.” – डॉ. अमोल कोल्हे मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय वारशाचे रक्षण करण्याचा निर्धार या मोर्चातून व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा – सांगलीत डॉ. अमोल कोल्हेंचा जोरदार इशारा! Read More »

मेट्रो मार्ग 4 व 4अ: ठाणे-मुंबईकरांसाठी वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग!

ठाणे – ठाणे आणि मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित मेट्रो मार्ग 4 व 4अचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएकडून गायमुख ते विजय गार्डन स्टेशनदरम्यान मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. 👉 प्रकल्पाची वैशिष्ट्ये : मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या प्रयत्नांचे कौतुक करत काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ठाणेकर व मुंबईकरांना या सोयीचा लवकरात लवकर लाभ मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी सांगितले की, ठाणे रिंग मेट्रोला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून हा प्रकल्प देखील भविष्यातील वाहतूक सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मेट्रो मार्ग 4 व 4अ: ठाणे-मुंबईकरांसाठी वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग! Read More »

हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया

ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात आघाडीवर असलेले नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात एका तरुणाशी झालेल्या संभाषणात हाके यांनी आपला ड्रायव्हरचा यूपीआय नंबर देऊन पैसे घेण्याची तयारी दाखवल्याचा आरोप आहे. या संभाषणात तरुणाने “तुम्ही समाजासाठी एवढं धावताय, पेट्रोलसाठी मदत करतो” असं सांगत एक लाख रुपयांपर्यंत UPI द्वारे पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यावर हाके यांनी “मी अकाउंटवर पैसे घेत नाही, ड्रायव्हरचा नंबर देतो” असं म्हटल्याचं ऐकायला मिळतं. परंतु शेवटी त्याच तरुणाने हाके यांना सुनावत, “तुम्ही सुपाऱ्या घेऊन समाजविरोधी काम करता, लाज कशी वाटत नाही?” अशी टीका करत फोन कट केल्याचं क्लिपमध्ये आहे. या क्लिपवर प्रतिक्रिया देताना हाके म्हणाले, “हा माझा नव्हे तर मला पैसे देणाऱ्या व्यक्तीचा हेतू संशयास्पद आहे. मला मुद्दाम बदनाम करण्यासाठी अशा क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र आहे, पण माझं आंदोलन थांबणार नाही.” दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात “मी ब्राह्मण जातीचा आहे, आमच्यावर परमेश्वराने सर्वात मोठा उपकार केला तर तो म्हणजे आम्हाला आरक्षण नाही” असे वक्तव्य केले होते. यावर हाके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मीही देवाला प्रार्थना करीन की पुढच्या जन्मी मला ब्राह्मण समाजात जन्म द्या, तेव्हाच त्यांना कळेल.” हाके यांनी पुढे मनोज जरांगेवरही टीका करत, “जरांगे यांनी दिल्ली नाही तर आफ्रिकेत आंदोलन करायला हवं, तिथे जास्त गरज आहे” असं म्हटलं.

हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया Read More »

सदा सरवणकर यांच्या वक्तव्याने खळबळ!

सदा सरवणकर यांचे वादग्रस्त वक्तव्य | आमदार निधी वाटपावरून माहिममध्ये राजकीय खळबळ मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात” – माहिममधून नवा वाद पेटला मुंबई :माहिम मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना (शिंदे गट) उमेदवार सदा सरवणकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वादंग निर्माण झाले आहे. सरवणकर यांनी स्पष्टपणे सांगितले – “आजचा आमदार फक्त 2 कोटी रुपयांचा निधी घेतो. पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळतो. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या मागे ठामपणे उभे आहेत.” त्यांनी पुढे बोलताना दावा केला की, “काम करणाऱ्यांना पराभव पत्करावा लागतो, पण काम न करणारे जाती-पातीच्या आधारावर जिंकतात. माझा पिंड हा कामाचा असल्यामुळे मी सतत विविध कामांच्या उद्घाटनासाठी दिसतो.” 🔥 विरोधकांचा पलटवार सरवणकर यांच्या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. माहिमचे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी पलटवार करत विचारले – “जनतेने पराभूत केलेल्या माजी आमदाराला 20 कोटी निधी देणे हा मतदारांचा अपमान आहे. निवडून दिलेल्या आमदारांना निधी न देणे हा सरळसरळ अन्याय आहे. आतापर्यंत त्यांना 500 कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला. हा पैसा गेला कुठे?” सावंत यांनी जाहीर केले की, ते विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याकडे औपचारिक तक्रार करणार आहेत. तर ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले –“सत्ताधाऱ्यांना मुजोरी चढली आहे. आमदार निधी वाटपाची पद्धत चुकीची आहे. या प्रकरणाची चौकशी ईडीकडून व्हावी.” 📌 पार्श्वभूमी आमदार निधी हा स्थानिक विकासासाठी देण्यात येणारा निधी असून, त्याचा वापर मतदारसंघातील सार्वजनिक कामांसाठी करणे अपेक्षित असते. पण अनेकदा या निधीचे वाटप सत्ताधारी- विरोधी गटातील भेदभावावर अवलंबून असल्याचे आरोप होत असतात. सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा निधी वाटपातील पारदर्शकता व न्याय्यतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या घडामोडींमुळे माहिम मतदारसंघासोबतच संपूर्ण राज्यातील आमदार निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विरोधी पक्ष आता या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सदा सरवणकर यांच्या वक्तव्याने खळबळ! Read More »

लोकसंख्या वाढ धर्मामुळे? – धक्कादायक गैरसमजांना पुराव्यानिशी छेद देणारं धाडसी पुस्तक

पुस्तकाचं नाव: द पॉप्युलेशन मिथलेखक: डॉ. एस. वाय. कुरैशीप्रकाशक: हार्पर कॉलिन्स (२०२१) “भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय, आणि त्याला धर्माधारित कारणं जबाबदार आहेत!” – हे विधान आपण अनेकदा ऐकलं असेल. पण खरंच हे तथ्य आहे का? की हे केवळ राजकीय आख्यायिका आहेत? या प्रश्नांची उत्तरं देणारं, गैरसमजांना पुराव्यानिशी छेद देणारं पुस्तक म्हणजे डॉ. कुरैशी यांचं द पॉप्युलेशन मिथ. डॉ. एस. वाय. कुरैशी हे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC). प्रशासकीय सेवेत दीर्घ अनुभवासोबत त्यांनी समाजातील संवेदनशील मुद्द्यांवर सातत्याने लिखाण केलं आहे. लोकशाही, निवडणुका, सामाजिक समरसता यांवर त्यांचा अभ्यास मोठ्या मानाने घेतला जातो. द पॉप्युलेशन मिथ या ग्रंथात त्यांनी लोकसंख्या आणि धर्म यावर पसरलेल्या गैरसमजांचं विश्लेषण केलं आहे. The Population Myth हे २०२१ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक भारतीय समाजात प्रचलित असलेल्या “मुस्लिम लोकसंख्या जलद वाढतेय आणि हिंदूंना मागे टाकेल” या धारणेचं तपशीलवार परीक्षण करतं. कुरैशी यांनी जनगणना अहवाल, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS), सरकारी आकडेवारी, आरोग्यविषयक अभ्यास यांचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने या मिथकांचा पर्दाफाश केला आहे. हे पुस्तक सांगतं की – सर्व धर्मांमध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण गेल्या काही दशकांत कमी झालं आहे. मुस्लिम समाजातही कुटुंब नियोजनाचा वापर वाढतो आहे. शिक्षण, गरीबी आणि स्त्रियांचं सशक्तीकरण हे घटक लोकसंख्या नियंत्रित करतात, धर्म नव्हे. कुरैशी यांनी सोप्या भाषेत आकडेवारी मांडली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य वाचकालाही या विषयाची खरी बाजू समजते. पुस्तक मुख्यतः काही मिथकांना केंद्रस्थानी ठेवतं – “मुस्लिम लोकसंख्या हिंदूंना मागे टाकेल” “मुस्लिम समाज कुटुंब नियोजन नाकारतो” “धर्म हा लोकसंख्या नियंत्रणात मुख्य घटक आहे” या मिथकांना तथ्याधारित उत्तरं दिली आहेत. आकडेवारी, तुलनात्मक ग्राफ, आणि सरकारी अहवालांच्या आधारे लेखक दाखवतात की शिक्षण आणि विकास मिळाल्यावर सर्व समाजात लोकसंख्या नियंत्रण नैसर्गिकरीत्या होतं. भाषा शैली: सोपी, प्रवाही, वाचकाला आकडेवारी समजेल अशी. कथनाची ताकद: राजकीय संवेदनशील विषय असूनही संतुलित आणि शास्त्रीय मांडणी. वेगळेपणा: धर्माधारित मिथकांचा पुराव्यानिशी पर्दाफाश. प्रभावी प्रसंग: NFHS आकडेवारीवर आधारित निष्कर्ष – सर्व धर्मांमध्ये TFR (Total Fertility Rate) घटतो आहे. विषय आकडेवारीप्रधान असल्यामुळे सामान्य वाचकाला काही ठिकाणी जड वाटू शकतो. राजकीय अंग अधिक स्पष्ट करण्याची संधी असूनही काही ठिकाणी लेखक जपून बोलतात. आजच्या भारतात धर्माधारित लोकसंख्या चर्चेचं राजकारण तापलेलं असताना हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. वाचकाला केवळ आकडेवारीचं भान येत नाही, तर “विकास आणि शिक्षण हेच लोकसंख्या नियंत्रणाची खरी गुरुकिल्ली आहेत” हा मुद्दाही ठसतो. हे पुस्तक समाजशास्त्र, राजकारण आणि समकालीन भारत समजून घ्यायला उत्सुक असणाऱ्या वाचकांसाठी आवश्यक आहे.👉 “लोकसंख्येचं भूत दाखवून समाजात दरी निर्माण करणाऱ्यांना हे पुस्तक ठोस उत्तर देतं. त्यामुळे वाचायलाच हवं.” लोकसंख्या वाढ धर्मामुळे? – धक्कादायक गैरसमजांना पुराव्यानिशी छेद देणारं धाडसी पुस्तक

लोकसंख्या वाढ धर्मामुळे? – धक्कादायक गैरसमजांना पुराव्यानिशी छेद देणारं धाडसी पुस्तक Read More »