konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईचा महापौर फेब्रुवारीतच; जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्णय
Image

मुंबईचा महापौर फेब्रुवारीतच; जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्णय

मुंबई | प्रतिनिधी :
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी मुंबईचा महापौर तत्काळ ठरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आगामी काही दिवस पूर्णतः त्या रणधुमाळीत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतील महापौर व उपमहापौरपदाची निवड जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच, म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला मतदारांनी कौल दिला असला, तरी भाजप किंवा शिंदे गटाची शिवसेना या दोघांपैकी कोणालाही स्वतंत्रपणे बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

गटनोंदणीवर चर्चा सुरू

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी करावी की स्वतंत्र, यावर अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक एकच गट म्हणून नोंदणी करण्यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता अधिक आहे.

या माध्यमातून महापालिकेतील तसेच विविध समित्यांमधील संख्याबळ अधिक मजबूत करण्यावर भाजपचा भर असल्याचे समजते. महायुतीच्या सूत्रांनुसार, भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेकडे प्रतोदपद देण्याचा विचार सुरू आहे.

दरम्यान, यापूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेने स्वतंत्र गटनोंदणीसाठी हालचाली केल्याची माहिती समोर आली होती. काही नगरसेवक कोकण भवन येथे स्वतंत्र नोंदणीसाठी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, अचानक हा निर्णय बदलण्यात आला आणि अखेर महायुतीकडून दोन्ही पक्षांची एकत्रित गटनोंदणी करण्यावर सहमती झाल्याची माहिती आहे. यामुळे महापालिकेतील समिती प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या शिवसेनेला शह देण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महापौरपदासाठी चार नावे चर्चेत

मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत भाजप आणि शिवसेनेच्या संचालन समितीमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची मते जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापौरपदासाठी सध्या चार नावे आघाडीवर असल्याचे समजते —

राजश्री शिरवडकर
रितू तावडे
शीतल गंभीर
योगिता कोळी

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील अंतिम बैठकीनंतरच महापौर, उपमहापौर तसेच अन्य महत्त्वाच्या पदांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत.

पीठासीन अधिकारी कोण?

मुंबई महापालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर निवडीची संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

विशेष म्हणजे, मागील महापालिका सभागृहाचा कार्यकाळ संपून आता जवळपास तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे ‘मावळते महापौर’ ही संकल्पना लागू होत नाही. मुंबई महापालिकेच्या जुन्या नियमानुसार ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकतो. त्या नियमानुसार ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा अधिकार होता.

मात्र, हा अधिकार काढून घेऊन तो प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आला आहे. परिणामी, विद्यमान महापालिका आयुक्त भूषण गगराणी हेच पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांचा परिणाम

बुधवारपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात व नियोजनात व्यस्त होणार असल्याने, मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेचा निर्णय काहीसा लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आणि त्यातून निर्माण होणारी राजकीय समीकरणे मुंबईतील सत्तावाटपावर अप्रत्यक्ष परिणाम करू शकतात.

भाजप-शिंदे शिवसेना युतीला मुंबई महापालिकेत बहुमत मिळाले असले, तरी गटनोंदणी, पदवाटप आणि जिल्हा परिषद निवडणुकांची व्यस्तता यामुळे मुंबईचा महापौर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच ठरण्याची शक्यता अधिक आहे. तोपर्यंत मुंबईच्या राजकारणात चर्चांचा आणि रणनीतींचा खेळ रंगत राहणार, हे निश्चित.

✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि.…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे