konkandhara.com

Editorial

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा रायगड : “आज महाराष्ट्रात हजारो लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य व्हायचे आहे. फक्त सदस्य नव्हे तर सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मनसैनिकांनी पुढे येत राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम राबवावी,” असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी रोपवेने रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. वर्धापन दिनानिमित्त मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “९ मार्चला वर्धापन दिन आणि १९ मार्चला गुढीपाडव्याचा मेळावा असल्यामुळे दोनदा भाषण करण्यापेक्षा सर्व मुद्द्यांवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे. मात्र आजपासून पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, राज्यभरातील वर्दळीच्या ठिकाणी मनसेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स उभारावेत. मनसैनिकांनी लोकांपर्यंत जाऊन संवाद साधावा आणि इच्छुकांना पक्षाचे सदस्य करून घ्यावे. “आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरून पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तसेच १९ मार्च रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी सर्व मनसैनिकांनी आणि महाराष्ट्राच्या हितचिंतकांनी शिवतीर्थावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी सांगितले.

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात Read More »

चिपळूणच्या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाला बाधित व्यापारी-नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

चिपळूणच्या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाला बाधित व्यापारी-नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा १०५ कोटींचा प्रकल्प; शहराच्या विकासासाठी सहकार्याची ग्वाही चिपळूण : चिपळूण नगर परिषदेने शहरातील चिंचनाका ते पॉवर हाऊस, तसेच मध्यवर्ती बसस्थानक ते खेंड बावशेवाडी या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पामुळे बाधित होणारे व्यापारी व नागरिक यांची बैठक सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत बाधित व्यापारी व नागरिकांनी शहराच्या विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. या बैठकीत नगर परिषदेचे सल्लागार व आर्किटेक्ट नागेश देशपांडे यांनी पीपीटीच्या माध्यमातून रस्ते कशा पद्धतीने उभारले जातील, गटारांची व्यवस्था, रस्त्यांचा दर्जा, फुटपाथ, तसेच संपूर्ण आराखड्याची सविस्तर माहिती दिली. या रस्ते रुंदीकरणासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर व्यापारी व नागरिकांनी आपल्या शंका व प्रश्न मांडले. या प्रश्नांना नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, तसेच नगररचना विभागाच्या श्रीमती खैरमोडे यांनी समर्पक उत्तरे दिली.या वेळी बोलताना नगराध्यक्ष सकपाळ म्हणाले की, रस्ते रुंद झाल्यास शहर अधिक सुंदर होईल तसेच दळणवळणाची सुविधा सुधारेल. त्यामुळे चिपळूणची बाजारपेठ अधिक सक्षम होईल आणि व्यापाराला चालना मिळेल. नगर पालिका ‘ब’ वर्गात असल्याने उत्पन्न मर्यादित असले, तरी शहराच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत डॉ. रत्नाकर घाणेकर यांनी रस्ते रुंदीकरणासाठी निधी व अंडरग्राउंड गटार यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी आपण हाती घेतलेले काम अर्धवट सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. डॉ. प्रकाश पाटणकर यांनी रेड लाईन व ब्ल्यू लाईन संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.अभय चितळे यांनी या रस्ता प्रकल्पाला शंभर टक्के पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच टीडीआर प्रमाणपत्र तीन महिन्यांच्या आत मिळावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर नगराध्यक्षांनी तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले. नकाशे विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी मान्य केली. नगरसेवक फैसल कासकर यांनी रस्ते रुंदीकरणाची आवश्यकता स्पष्ट करत शहराच्या भविष्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगितले. राजू भागवत यांनी विकासासाठी काही काळ त्रास सहन करावा लागेल, असे मत व्यक्त केले. डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी वृक्षसंवर्धनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी या ४.४१ किलोमीटरच्या रस्त्यांवर सुमारे ४५० वृक्ष लागवडीची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. राजू भागवत यांच्या सूचनेनुसार काही वृक्ष नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुळासकट उचलून अन्य ठिकाणी लावण्याबाबतही विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, सुजित जाधव, उद्यान विभागाचे बापू साडविलकर, पाणीपुरवठा विभागाचे रोहित खाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांच्यासह नगरसेवक मिस्बाह नाखुदा, उदय जुवळे, सफा गोठे, प्रमोद बुरटे, अजय भालेकर, वैशाली कदम, निहार कोवळे, नसरीन खडस, वैशाली निमकर, संजय गोताड, संदीप भिसे, हर्षाली पवार, शैनाज वांगडे, योगेश पवार, अंजली कदम, शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, विक्रांत उर्फ कपिल शिर्के, निलम जाधव, अंकुश आवले, उमा उर्फ शिल्पा देसाई, शुभम पिसे, गणेश आग्रे, पल्लवी महाडिक, कांचन शिंदे, मिथिलेश नरळकर, शितल रानडे, विकी लवेकर आदी उपस्थित होते.

चिपळूणच्या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाला बाधित व्यापारी-नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद Read More »

दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवड आज; भाजपच्या पार्वती गवस की सोनिया नाईक?

दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवड आज; भाजपच्या पार्वती गवस की सोनिया नाईक?

दोडामार्ग : भूषण सावंत  दोडामार्ग : पंचायत समिती दोडामार्ग येथे आज सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार असून या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी पहिल्या टप्प्यात भाजपला संधी मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन महिला सदस्यांपैकी सभापतीपदाची संधी नेमकी कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सभापतीपदासाठी भाजपच्या माटणे पंचायत समिती सदस्य सौ. पार्वती महादेव गवस आणि मणेरी पंचायत समिती सदस्य सौ. सोनिया अंकुश नाईक यांची नावे चर्चेत आहेत. विजयानंतर या दोघींमधील कोणाला सभापतीपदाची संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष (१५ महिने) असा राहणार आहे. त्यानुसार प्रत्येक सदस्याला ठराविक कालावधीसाठी संधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे बिनविरोध कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांची उपसभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात असून ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज होणाऱ्या या निवड प्रक्रियेनंतर दोडामार्ग पंचायत समितीच्या नेतृत्वाची दिशा स्पष्ट होणार असून तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.  

दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवड आज; भाजपच्या पार्वती गवस की सोनिया नाईक? Read More »

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा खेड : मुंबई–गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत प्रवीण गीते हा तरुण आपल्या मित्रासह रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (एमएच ०८ बीबी ५७९०) या दुचाकीवरून मुंबई–गोवा महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात होता. भरणे गावाच्या हद्दीत शिंदेवाडी परिसरात दुचाकी भरधाव वेगात असताना चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी महामार्गावर घसरली. या अपघातात अद्वैत महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जोरात आपटला. डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला अद्वैतचा मित्रही गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ कळंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्वैत गीते हा नवभारत हायस्कूलचे शिक्षक प्रवीण गीते यांचा मुलगा असून त्यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील तिसंगी आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नातेवाईक, हितचिंतक आणि मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्वैतचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली.दरम्यान, अद्वैत आपल्या मित्रांसोबत जेवणासाठी महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू Read More »

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील अत्याधुनिक सभागृह कलाकारांसाठी खुले – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील अत्याधुनिक सभागृह कलाकारांसाठी खुले – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांच्या हक्काच्या व्यासपीठाची प्रतीक्षा आता संपली असून रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील नूतनीकृत आणि अत्याधुनिक सभागृह स्थानिक कलाकारांसाठी समर्पित करण्यात आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात शनिवारी रात्री या नूतनीकृत सभागृहाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.उद्घाटन प्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या मंगल मंत्रोच्चारात कोनशिलेचे अनावरण व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.ए. परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला, भारुड आणि लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तसेच नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मीनार गजानन पाटील यांचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी विशेष कौतुक केले. तसेच प्रा. आनंद आंबेकर आणि डॉ. शशांक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. उदय सामंत म्हणाले की, “रत्नागिरीत कलाकारांसाठी अत्याधुनिक सभागृहाची गरज होती. ही गरज ओळखून अत्यंत कमी कालावधीत हे सभागृह सज्ज करण्यात आले असून या माध्यमातून रत्नागिरीच्या समृद्ध संस्कृतीला आणि कलाविश्वाला नवे बळ मिळेल.” या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, डॉ. राजश्री देशपांडे, प्राचार्य कीर्तीकुमार भोसले, समीर इंदुलकर, अनिल दांडेकर यांच्यासह नगरसेवक, कलाकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. तसेच पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या कार्याचा गौरव करणारे पद्यरूप गौरवपत्र यावेळी त्यांना प्रदान करण्यात आले.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील अत्याधुनिक सभागृह कलाकारांसाठी खुले – पालकमंत्री डॉ. उदय सामंत Read More »

mumbai-goa-highway-inauguration-nitin-gadkari-statement

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाला मोठ्या प्रमाणावर विलंब झाल्याने या महामार्गाचे उद्घाटन करण्याबाबत आपल्यालाच संकोच वाटत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन आपण करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाबाबत अनेक वर्षांपासून विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत कामाला झालेल्या उशिराबद्दल खंत व्यक्त केली. महामार्गाच्या कामातील अडथळे दूर करून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा मार्ग हा कोकणातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होणार आहे.

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी Read More »

kajal-shirsat-bds-dentist-pal-punarvasan-dodamarg

पाल पुनर्वसनच्या काजल शिरसाट दंतवैद्य बनल्या ; BDS पदवी संपादन करून तालुक्याचा मान उंचावला

दोडामार्ग / भूषण सावंत दोडामार्ग : पाल पुनर्वसन (ता. दोडामार्ग) येथील शरद कृष्णा शिरसाट यांची कन्या काजल शरद शिरसाट हिने Pandit Deendayal Upadhyay Dental College, सोलापूर येथून BDS (Bachelor of Dental Surgery) हा ४+१ वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून दंतवैद्य ही पदवी संपादन केली आहे. सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवी प्रदान समारंभात तिला अधिकृतरीत्या ही पदवी बहाल करण्यात आली. काजल शिरसाट हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आपल्या कुटुंबाचे तसेच पाल पुनर्वसन परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. BDS हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये चार वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम आणि एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते. या कालावधीत विद्यार्थ्यांना दातांचे विविध आजार, त्यांचे निदान, उपचार पद्धती, शस्त्रक्रिया तसेच आधुनिक दंतवैद्यकीय तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. सोलापूर येथील Pandit Deendayal Upadhyay Dental College हे दंतवैद्यकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध महाविद्यालय मानले जाते. येथे आधुनिक साधनसामग्री आणि अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून काजल शिरसाट आता समाजसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. काजल शिरसाट यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह पाल पुनर्वसन व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन यश संपादन करावे, यासाठी काजल शिरसाट या प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. त्यांच्या या यशामुळे पाल पुनर्वसनसह दोडामार्ग तालुक्याचा अभिमान अधिक उंचावला आहे.  

पाल पुनर्वसनच्या काजल शिरसाट दंतवैद्य बनल्या ; BDS पदवी संपादन करून तालुक्याचा मान उंचावला Read More »

konkandhara 26

शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; रत्नागिरीत व्यक्ती गंभीर जखमी

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा रत्नागिरी, ७ मार्च : शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (७ मार्च) सकाळी सुमारे ११ वाजता मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली. या हल्ल्यात जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (५५, रा. भाटिमिऱ्या, रत्नागिरी) गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नार्वेकर यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शशांक सावंत, संजू आणि रुपेश सावंत उर्फ छोटा भाई (तिघेही रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (१ मार्च) रात्री सुमारे १० वाजता शिमगोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी पालखी येणार असल्याने भाटिमिऱ्या येथील दत्त मंदिराजवळ रस्त्यावर मंडप उभारणे आणि रांगोळी काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तीन मुली दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का मंडपाचे काम करणाऱ्या फिर्यादींच्या भाचा विरेंद्र किरला याला लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्या वादादरम्यान एका मुलीने “मी सडामिऱ्या गावातील लोकांना बोलावते,” अशी धमकी दिली. काही वेळाने शशांक सावंत, संजू आणि अन्य काहीजण तेथे आले आणि वादाचे रूपांतर गंभीर वादात झाले. मात्र, त्या वेळी जयेंद्र नार्वेकर, रुपेश कमलाकर सावंत, मनोज सावंत, परेश सावंत व इतर प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. दरम्यान, शनिवारी (७ मार्च) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जयेंद्र नार्वेकर हे आपल्या एमएच-०८-बीएफ-२३२३ क्रमांकाच्या दुचाकीवरून मिरकरवाडा जेटी येथे बोटीचे काम पाहण्यासाठी जात होते. ते जेटीच्या पहिल्या गेटजवळ आले असता संशयित शशांक सावंत आणि संजू यांनी दुचाकी त्यांच्या समोर आडवी लावून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दोघांनीही चाकूने त्यांच्या पाठीवर, हातावर व खांद्यावर सपासप वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर नार्वेकर खाली कोसळले. त्याच वेळी रुपेश सावंत उर्फ छोटा भाई दुचाकीवरून घटनास्थळी आला आणि त्यानेही चाकूने त्यांच्या पाठीवर वार केले. परिसरात गर्दी वाढू लागल्याने तिघेही संशयित तेथून पसार झाले. जखमी अवस्थेत नार्वेकर यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका दुचाकीस्वाराला आपल्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याची विनंती केली. दरम्यान, त्यांच्या ओळखीचे राहुल नावाचे व्यक्तीही तेथे आल्याने दोघांनी मिळून नार्वेकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामूनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; रत्नागिरीत व्यक्ती गंभीर जखमी Read More »

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दोडामार्ग / भूषण सावंत दोडामार्ग : तालुक्यातील सासोली गावातील शेती व बागायती परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती सोसायटी अध्यक्ष मनोज गवस यांनी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांना दिली. माहिती मिळताच संतोष नानचे यांनी तत्काळ कसई-दोडामार्ग नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नगरपंचायत प्रशासन व अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले. घटनास्थळी ग्रामस्थांनीही मदत करत आग विझविण्यासाठी सहकार्य केले. वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी सासोली ग्रामस्थांनी नगरसेवक संतोष नानचे तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायत प्रशासन व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. Read More »

अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा मुंबई : मालवणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ७ मार्च २०२६ रोजी प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रविंद्र नाट्यगृह) येथे आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार मंडळ सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य करत महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अक्षता कांबळी यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. त्यांच्या या कार्याची नोंद महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कोकण विभाग अध्यक्षा सुनीता गणगे आणि मुंबई–पुणे विभाग प्रमुख लक्ष्मण मानकर यांनी घेतली. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अक्षता कांबळी या पहिल्या मानकरी ठरल्या. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाची शाल, सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक आणि भेटवस्तू देण्यात आल्या. दरम्यान, अक्षता कांबळी यांना शासनाचा जिल्हास्तरीय ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ देखील जाहीर झाला असून या दुहेरी सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पुरस्कारांसाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार Read More »