konkandhara.com

Editorial

आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” कार्यक्रमाचे उद्या आयोजन

आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” कार्यक्रमाचे उद्या आयोजन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन – महिला डॉक्टर्स विंग (IMA WDW) महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” या राज्यस्तरीय जनजागृती व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी (चिपळूण) येथे होणार आहे. डिजिटल युगात महिलांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणे, त्यांच्यात डिजिटल सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन, IMA WDW महाराष्ट्र महिला डॉक्टर्स राज्यस्तरीय हेल्पलाईनचा शुभारंभ, “आरोही नारी गौरव पुरस्कार” प्रदान, “छावा” या विशेष सांस्कृतिक सादरीकरणासह “डिजिटल जागर” जनजागृती कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन IMA महिला डॉक्टर्स विंग महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” कार्यक्रमाचे उद्या आयोजन Read More »

konkandhara 10 1

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाला स्थगिती

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणास स्थगिती देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. ९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यासाठी देण्यात येणाऱ्या इरादापत्रांच्या (Letter of Intent) प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. राज्यातील विविध संघटनांकडून ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांचे खुले धोरण बंद करण्याबाबत शासनाकडे सातत्याने मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत खुले धोरणास तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले. परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांसाठी देण्यात येणाऱ्या इरादापत्रांच्या कामकाजास स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाला स्थगिती Read More »

konkandhara 9 1

युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस पुरवठ्याचा आढावा, तक्रारींसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा क्रमांक जाहीर

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : मध्यपूर्व आशिया, अमेरिका आणि युरोपियन खंडात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात घरगुती गॅस मिळण्यात कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ७०५७२२२२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाने सर्व तालुका स्तरावर पथके स्थापन करून गॅस एजन्सींना नियमित भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भेटीदरम्यान ग्राहकांशी संवाद साधून त्यांचे अभिप्राय आणि अडचणी जाणून घ्याव्यात तसेच त्याची माहिती जिल्हा कार्यालयास तात्काळ कळवावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यापूर्वी दोन सिलेंडरच्या बुकिंगमध्ये १० दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होता, तो आता २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला असून यासंदर्भातील फलक सर्व गॅस एजन्सींनी आपल्या कार्यालयाबाहेर लावावेत, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत प्र. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र गॅस टंचाईची शक्यता असल्याच्या भीतीमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर बुकिंग केले जात असल्याने एजन्सींवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे वेटिंग वाढले असले तरी गॅस पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर एचपीसीएल कंपनीचे मिरज हजारवाडी, बीपीसीएल कंपनीचे वाई (सातारा) आणि इंडेन कंपनीचे चाकण (पुणे) येथून प्राप्त होतात. जिल्ह्यासाठी दररोज सुमारे ६९०० ते ७२०० सिलेंडरची मागणी असून तीनही कंपन्यांकडून सरासरी ७५०० सिलेंडरचा पुरवठा होत असल्याची माहिती देण्यात आली. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील गॅस एजन्सी प्रतिनिधींकडूनही आढावा घेण्यात आला. शांतादुर्गा गॅस एजन्सीचे सुमारे ८५ हजार ग्राहक असून दररोज १५०० ते १६०० सिलेंडर वितरण केले जाते. मनोरमा गॅस एजन्सीचे १७ हजार ग्राहक असून दररोज ३०० ते ३५० सिलेंडर वितरित केले जातात. तसेच रत्नागिरी गॅस एजन्सीचे १८ हजार ग्राहक असून दररोज सुमारे ३०० सिलेंडर वितरित केले जातात. उपस्थित एजन्सी प्रतिनिधींनी घरगुती गॅस वितरणात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले.

युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस पुरवठ्याचा आढावा, तक्रारींसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा क्रमांक जाहीर Read More »

commercial-gas-shortage-hostel-pg-hotel-business-impact

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. स्वयंपाकासाठी आवश्यक असणारा गॅस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक हॉस्टेल्स आणि पीजी व्यवस्थापकांनी तात्पुरते बंद करण्याचा विचारही सुरू केला आहे. गॅस टंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात जाणवत असून अनेक ठिकाणी स्वयंपाकघर चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या परिस्थितीवर अभिनेता हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आज व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे अनेक हॉस्टेल्स आणि पीजी व्यवस्थांवर मोठा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना आणि बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती आपल्याला एका मोठ्या वास्तवाची जाणीव करून देते की, युद्धं आता फक्त बातम्यांमधील घटना राहिलेली नाहीत. त्याचे परिणाम थेट आपल्या दैनंदिन आयुष्यावर दिसू लागले आहेत.” ते पुढे म्हणाले की, जगात कुठेही संघर्ष किंवा युद्ध झाले तरी त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर आणि सामान्य लोकांच्या जीवनावर होतो. “युद्ध ही दूर घडणारी घटना नसून त्याचे पडसाद आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कुठलेही युद्ध हे वाईटच,” असेही त्यांनी नमूद केले. सध्या गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हॉस्टेल चालक, पीजी व्यवस्थापक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे.

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया Read More »

दिवा–वीर मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी; माणगावातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा

दिवा–वीर मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी; वाहतूक कोंडीतून सुटकेची अपेक्षा थांबा दिलेल्या गाड्यांना प्रवाशांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद

माणगाव | जहेंद्र हरिभाऊ मुंढे माणगाव | रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात दररोज हजारो नागरिक, पर्यटक आणि प्रवासी ये-जा करत असल्यामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून दिवा ते वीर मेमू रेल्वे सेवा सुरू करावी तसेच अधिकाधिक एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना माणगाव स्थानकात थांबे द्यावेत, अशी ठाम मागणी माणगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सुरेश जैन यांनी केली आहे. माणगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई–गोवा महामार्गावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रखडलेल्या महामार्गाच्या कामांमुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे. माणगाव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने दररोज हजारो पर्यटक आणि प्रवासी येथे येत असतात. त्यामुळे माणगाव रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाले असले तरी अद्यापही अनेक महत्त्वाच्या गाड्या माणगाव स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन आणि तळा या विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांचा माणगाव स्थानकाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या थांबा असलेल्या रेल्वे गाड्यांना अक्षरशः हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून त्यामुळे रेल्वे प्रशासनालाही आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होत असल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून रोहा येथे मडगाव, संपर्क क्रांती, इंदोर, कोईम्बतूर आणि तिरुनेलवेली या एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाले आहेत. त्याच धर्तीवर माणगाव येथेही जनशताब्दी, मंगला, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या आणि ऋषिकेश यांसारख्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. याशिवाय दिवा ते रोहा या मार्गावर ज्या पद्धतीने रेल्वे सेवा सुरू आहे, त्याचप्रमाणे दिवा ते वीर मेमू रेल्वे सेवा दिवसातून तीन ते चार वेळा सुरू केल्यास माणगावसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असा दावा प्रवासी संघटनेने केला आहे. माणगाव एसटी बस स्थानकातून दररोज शेकडो एसटी बस मुंबई व कोकणात धावत असल्या तरी दुपारच्या वेळेत रेल्वे उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रवाशांना खासगी बस किंवा वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढण्यासोबतच शासनालाही अपेक्षित महसूल मिळत नाही. दरम्यान, रोहा ते वीर या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले असून वीर येथे रेल्वे गाड्या थांबविण्यासाठी आवश्यक ट्रॅक व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवा ते वीर मेमू सेवा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे प्रवासी संघटनेचे मत आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांची हेळसांड थांबवून मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी दिवा–वीर मेमू रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, माणगाव येथे अधिकाधिक रेल्वे गाड्यांना थांबे मिळावेत यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दिवा–वीर मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी; वाहतूक कोंडीतून सुटकेची अपेक्षा थांबा दिलेल्या गाड्यांना प्रवाशांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद Read More »

dodamarg-panchayat-samiti-chairman-parvati-gawas-ganeshprasad-gawas

दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पार्वती गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस या दोघांची बिनविरोध निवड

दोडामार्ग : भूषण सावंत दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सौ.पार्वती महादेव गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस या दोघांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवड जाहीर होताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आणि पुष्पगुच्छ देऊन नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली.दुपारी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, झरेबांबर पंचायत समिती सदस्या श्रीमती स्नेहा गवस, कोनाळ पंचायत समिती सदस्य सौ.सायली स्वप्निल निंबाळकर, विभागप्रमुख अनिल शेटकर, माजी पंचायत समिती उपसभापती लक्ष्मण नाईक, रामदास मेस्त्री हे पदाधिकारी दाखल झाले. त्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपतालुकाप्रमुख आनंद तळणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, मणेरी पंचायत समिती सदस्या सौ.सोनिया अंकुश कुबल, माटणे पंचायत समिती सदस्या सौ.पार्वती महादेव गवस, माटणे जिल्हा परिषद सदस्य सौ.साक्षी तळवडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश उर्फ भैया नाईक, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, कळणे सरपंच श्री.देसाई, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सभापती पदासाठी माटणे पंचायत समिती सदस्य भाजपच्या सौ.पार्वती महादेव गवस यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर उपसभापती पदासाठी कोलझर पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस यांनी अर्ज सादर केला. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवड जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पेढे वाटले आणि नव्या सभापती व उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पंचायत समितीत महायुतीची सत्ता अधिक बळकट झाल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पार्वती गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस या दोघांची बिनविरोध निवड Read More »

लांजा : स्वयंपाकासाठी आणलेल्या कोळंबीचे वाटण करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या ७० वर्षीय वृद्ध आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील धावणेवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपत दिवाळे (वय ३५, रा. धावणेवाडी, ता. लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव असून सुनिता गणपत दिवाळे (वय ७०) असे जखमी आईचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संतोष दिवाळे याने बाजारातून कोळंबी आणली होती. आई सुनिता यांनी कोळंबी साफ केल्यानंतर मुलगा संतोषला मसाल्याचे वाटण करण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या संतोषने घरातील दगडी वरवंटा उचलून आईच्या डोक्यात मारहाण केली. तसेच शर्टाने तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दिवाळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे लांजा परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून मुलाने आईवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

कोळंबीच्या वाटणावरून मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोकणधारा लांजा : स्वयंपाकासाठी आणलेल्या कोळंबीचे वाटण करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या ७० वर्षीय वृद्ध आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील धावणेवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपत दिवाळे (वय ३५, रा. धावणेवाडी, ता. लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव असून सुनिता गणपत दिवाळे (वय ७०) असे जखमी आईचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.संतोष दिवाळे याने बाजारातून कोळंबी आणली होती. आई सुनिता यांनी कोळंबी साफ केल्यानंतर मुलगा संतोषला मसाल्याचे वाटण करण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या संतोषने घरातील दगडी वरवंटा उचलून आईच्या डोक्यात मारहाण केली. तसेच शर्टाने तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दिवाळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे लांजा परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून मुलाने आईवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

कोळंबीच्या वाटणावरून मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल Read More »

मळेवाड येथे डंपर-दुचाकीचा अपघात;बाप-लेक जखमी

मळेवाड येथे डंपर-दुचाकीचा अपघात;बाप-लेक जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा सावंतवाडी : मळेवाड-सावळवाडी येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दुचाकीस्वार पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत.यात औदुंबर बाबुराव खोत (वय – ४६) आणि त्यांचा मुलगा अथर्व खोत (वय – १०, दोघेही रा.कोंडुरे) अशी जखमींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की,आज सकाळच्या सुमारास कोंडूरे येथील औदुंबर खोत हे आपल्या मुलासह दुचाकीवरून मळवाड मार्गे शिरोडाच्या दिशेने जात होते यावेळी मळेवाड सावळवाडी येथील वळणावर आले असता अचानक ब्रेक लावल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि समोरून येणाऱ्या डंपरला जाऊन धडकली.या अपघातात दोघेही पिता – पुत्र जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी गाव घेतली आणि जखमींना मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अदिती ठाकूर व डॉक्टर विक्रम मस्के यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्य दाखल करण्यात आले.

मळेवाड येथे डंपर-दुचाकीचा अपघात;बाप-लेक जखमी Read More »

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध ; उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध ; उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी

प्रतिनिधी : कोकणधारा वेंगुर्ला : वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपाचे मातोंड पं. स.सदस्य शंकर शशिकांत घारे तर उपसभापतीपदी शिवसेनेचेपरुळे पं.स.सदस्य सचिन दामोदर देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे.पिठासन अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात आज सोमवारी ९ मार्च २०२६ रोजी झालेल्या सभेनंतर ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर आदी उपस्थित होते.दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक – एक अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध संपन्न झाली.यावेळी या सभेस शंकर घारे,सचिन देसाई यांच्यासह म्हापण पं.स.सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर,तुळस पं.स.सदस्या सुचिता वजराटकर, आडेली पं.स.सदस्य नितीन मांजरेकर,वायंगणी पं.स.सदस्या शीतल राऊत,उभादांडा पं.स. सदस्या साक्षी नार्वेकर,आसोली पं.स.सदस्य संकेत धुरी,रेडी पं.स.सदस्या प्रियांका घाटवळ व शिरोडा पं.स.सदस्या योगिता परब आदी उपस्थित होते. निवड जाहीर होताच प्रशासन तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,संचालक महेश सारंग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाप्रमुख पप्पू परब, नगरसेवक प्रणव वायंगणकर व भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले.

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध ; उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी Read More »

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव; उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव; उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

संजय पिळणकर सावंंतवाडी : येथिल पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांची निवड झाली आहे तर उपसभापतीपदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड झाली.याबाबतची अधिकृत घोषणा आज सोमवारी करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस आणि कक्ष अधिकारी विनायक पिंगुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पंचायत समितीमध्ये भाजपचे सहा,शिवसेनेचे सहा,अपक्ष पाच आणि ठाकरे गटाचा एक असे सदस्य उपस्थित होते. सभापती पद आरक्षित असल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली.जिल्हा परिषद मतदार संघातील पंचायत समिती सदस्या सुष्मिता जाधव यांचा या पदासाठी एकमेव अर्ज दाखल केला होता तर उपसभापती पदासाठी भाजपचे सदस्य गौरव मुळीक यांनी अर्ज भरला होता.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले.या निवडीमुळे सावंतवाडी पंचायत समितीला २४ वे सभापती आणि ९ व्या महिला सभापती मिळाल्या आहेत.

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव; उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध Read More »