konkandhara.com

21 मार्च 2026

konkandhara 59

लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा लोटे : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील CETP (सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा रासायनिक सांडपाण्याने भरलेला टँकर स्थानिक ग्रामस्थांनी पकडल्याची घटना घडली आहे. या सांडपाण्यात PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) या घातक रसायनाचा अंश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजेंद्र आंब्रे, रवी गोवळकर, सचिन चाळके, गंगाराम चाळके, नितीन कडू, अजय चाळके, संजय चाळके, रोशन कालेलकर, सचिन काते, अंकुश चाळके, नंदू काते, अक्षय दिवेकर, संकेत हुमणे आदी ग्रामस्थांनी हा टँकर अडवला. संबंधित टँकर CETP प्रकल्पात सांडपाणी सोडण्यासाठी आणण्यात आला होता. मात्र प्रकल्प व्यवस्थापनाने तपासणीनंतर हे सांडपाणी स्वीकारण्यास नकार दिला. ग्रामस्थांनी टँकर पकडूनही पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित असताना पंचनामा न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. PFAS हे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक रसायन मानले जाते. त्यामुळे या सांडपाण्याच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत कंपनीकडून करण्यात आलेले दावे संशयास्पद ठरत असल्याचा आरोप आहे.यापूर्वीही ग्रामपंचायतींनी CETP मध्ये अशा प्रकारचे रेसिड्यू सोडण्यास विरोध दर्शवला होता. मात्र प्रत्यक्ष टँकर पकडल्याने हा प्रकार अधिक गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार हुसेन दलवाई यांनी या घटनेची दखल घेत संबंधित सर्व यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर जप्त करून नमुना तपासणी करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा करावा, तसेच पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, घातक कचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि BNS 2023 अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाईची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले. PFAS सारख्या घातक रसायनांबाबत स्पष्ट व कठोर धोरण आखून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी Read More »

konkandhara 58

ईद निमित्त चिपळूणमध्ये सौहार्दाचा संदेश; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर प्रत्यय देणारा एकात्मतेचा संदेश ईद-उल-फितरच्या निमित्ताने चिपळूणमध्ये अनुभवायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मापारी मोहल्ला मस्जिद (प्रभाग क्र. ४) येथे ईदच्या नमाजानंतर मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमातून सणांच्या माध्यमातून समाजात बंधुभाव, प्रेम, एकात्मता आणि सौहार्द वाढवण्याचा संदेश देण्यात आला. “ईदचा सण केवळ धार्मिक उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि मानवतेचा संदेश देणारा आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.या प्रसंगी नगरसेवक अजय भालेकर, वैशाली कदम, संजय गोताड, युवसेना चिपळूण शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्यासह प्रसाद म्हापुस्कर, लावेश म्हापुस्कर, सुरेश पाथरे, विलास चिपळूणकर, संदिप मनोरकर, प्रकाश साडविलकर, परिमल साडविलकर, गणेश गांधी, सचिन लकेश्री आणि पंकज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराची परंपरा अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

ईद निमित्त चिपळूणमध्ये सौहार्दाचा संदेश; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा Read More »

konkandhara 57

नागावेतील भंगार गोडावूनला भीषण आग; इमारत भस्मसात, सहा कामगार बचावले

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या भंगार प्लास्टिक साठ्याच्या गोडावूनला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या घटनेत सहा कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला. ही घटना सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पालांडे नामक व्यवसायिकाची नागावे येथे डबर-खडी क्रशर होती. ती बंद पडल्यानंतर संबंधित जागा भंगार व्यवसायिकाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. या ठिकाणी भंगार प्लास्टिक पिशव्या धुणे व सुकवून त्यापासून कच्चा माल तयार करण्याचे काम सुरू होते. गोडावूनमध्ये सुमारे तीन ट्रक इतका प्लास्टिक साठा होता. दरम्यान, इमारतीलगत वाढलेले गवत शेतीकामासाठी पेटवण्यात आले होते. कडक उन्हामुळे ही आग वेगाने पसरत जाऊन प्लास्टिक साठ्यापर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वणव्यामुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आग लागल्यानंतर जवळपास अर्धा तास पोलीस व अग्निशमन दलाला कळवण्यात विलंब झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. त्यानंतर महाजनको, पोफळी येथून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र पाणीसाठा अपुरा पडल्याने आग विझवण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी पोहोचला असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काही वेळातच संपूर्ण गोडावून भस्मसात झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची पुढील चौकशी सुरू असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नागावेतील भंगार गोडावूनला भीषण आग; इमारत भस्मसात, सहा कामगार बचावले Read More »