konkandhara.com

20 मार्च 2026

विकास निर्देशांकात रत्नागिरी अव्वल; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

विकास निर्देशांकात रत्नागिरी अव्वल; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. २० (जिमाका) : दै. लोकसत्ता यांच्या जिल्हा निर्देशांक उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या विश्लेषणात रत्नागिरी जिल्ह्याने विकास निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे सांख्यिकी विभागाच्या तपशीलांच्या आधारे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबईतील ‘द ताज बाय विवांता’, कफ परेड येथे आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याने सर्वांगीण विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान मिळविल्याने जिल्ह्याच्या प्रगतीची नोंद राज्यस्तरावर झाली आहे.

विकास निर्देशांकात रत्नागिरी अव्वल; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान Read More »

रत्नागिरी जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी २ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू; पाचपेक्षा जास्त जणांच्या जमावास बंदी.

रत्नागिरी जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १९ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते २ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केला आहे. जिल्ह्यात आगामी काळात रमजान ईद (२१ मार्च), श्रीराम नवमी (२६ मार्च), कामदा एकादशी (२९ मार्च), महावीर जयंती (३१ मार्च) आणि हनुमान जयंती (२ एप्रिल) यांसारखे विविध सण-उत्सव साजरे होणार आहेत. यासोबतच विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून आंदोलन, मोर्चे व कार्यक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. खेड, चिपळूण, अलोरे-शिरगाव, रत्नागिरी, जयगड आणि देवरुख परिसरात औद्योगिक प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या मागण्यांवरून अचानक आंदोलन होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामावरूनही आंदोलन सुरू आहेत. ओबीसी व मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता देखील प्रशासनाने व्यक्त केली आहे.या आदेशानुसार शस्त्रे, दांडके, तलवारी, बंदुका, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगणे, दगडफेकसाठी साधने गोळा करणे, भडकावू भाषणे करणे, घोषणा देणे किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी परवानगीशिवाय एकत्र येणे यास मनाई करण्यात आली आहे. मात्र अंत्ययात्रा, धार्मिक विधी, विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम तसेच सिनेमागृहे व नाट्यगृहे यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मोर्चा, मिरवणूक किंवा सभा आयोजित करण्यासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’ उपकेंद्रासाठी तात्काळ कार्यवाही करा – पालकमंत्री उदय सामंत

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बाटू) चे उपकेंद्र तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. आज पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनच्या कामकाजाचा व विविध अडचणींचा आढावा घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जि.प. सदस्य बाबू म्हाप, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य अजय हुंबरीकर, प्रा. पियुष गजबे, प्रा. उत्तमसखाने काकडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य यू. व्ही. पाटील व ‘बाटू’चे कुलगुरू कारभारी काळे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. बैठकीत महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, वसतिगृह सुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासोबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. “महाविद्यालय परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवावा. पुढील शनिवारी पुन्हा भेट देणार असून त्यापूर्वी स्वच्छता व आवश्यक कामे पूर्ण करावीत,” असे निर्देशही त्यांनी दिले.तत्पूर्वी पालकमंत्री सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कामकाजाचाही आढावा घेतला.

पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’ उपकेंद्रासाठी तात्काळ कार्यवाही करा – पालकमंत्री उदय सामंत Read More »

खेडमध्ये कुकरची वाफ लागून १३ वर्षीय मुलगी भाजली; रत्नागिरीत उपचार सुरू

खेडमध्ये कुकरची वाफ लागून १३ वर्षीय मुलगी भाजली; रत्नागिरीत उपचार सुरू

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : घरगुती काम करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे खेड येथे १३ वर्षीय मुलगी गंभीररीत्या भाजल्याची घटना घडली आहे. वर्षा सोमनाथ जाधव (वय १३, रा. भरणे नाका, खेड) असे जखमी मुलीचे नाव असून तिच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. १२ मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भूक लागल्याने वर्षाने गॅसवर शिजवून ठेवलेल्या भाजीचा कुकर स्वतः उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुकरमधील वाफ पूर्णपणे निघाली नसताना झाकण उघडल्याने गरम वाफेचा झोत तिच्या अंगावर आला. या प्रकारात वर्षाचा चेहरा, छाती व पोटाचा भाग गंभीररीत्या भाजला असून त्वचेवर फोड आले आहेत. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने १९ मार्च रोजी पुढील उपचारासाठी तिला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.दरम्यान, या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

खेडमध्ये कुकरची वाफ लागून १३ वर्षीय मुलगी भाजली; रत्नागिरीत उपचार सुरू Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

चवदार तळे सत्याग्रह शताब्दीची सुरुवात; समतामूलक समाजाचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस

प्रतिनिधी : कोकणधारा महाड, दि. २० : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड येथे आयोजित या कार्यक्रमात शताब्दी वर्षाची सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी चवदार तळ्याच्या जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजनही करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री अदिती तटकरे, डॉ. उदय सामंत, संजय शिरसाट, भरत गोगावले, अण्णा बनसोडे, खासदार सुनील तटकरे, धैर्यशील पाटील, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १९२३ मध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा असूनही समाजातील भेदभाव कायम होता. त्या अन्यायाविरोधात उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरला. “भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. विषमता आणि अस्पृश्यता दूर करून समतामूलक समाज निर्माण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा,” असे आवाहन त्यांनी केले.यावेळी अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणातील ९८ वारसांना शासकीय सेवेत नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी केली, तर भरत गोगावले यांनी महाडचा विकास शताब्दीपूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या ऐतिहासिक स्थळाचा सर्वांगीण विकास करून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले.

चवदार तळे सत्याग्रह शताब्दीची सुरुवात; समतामूलक समाजाचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस Read More »

खेड तालुक्यात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; कंपनी बंदच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून परिसरातील तब्बल ११ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत कंपनी बंद करण्याच्या मागणीचे ठराव एकमुखाने मंजूर केले आहेत. संबंधित ठरावांसह निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले असून आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला आता अधिक धार मिळाली असून बुधवारी प्रमुख आंदोलकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल तसेच पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली. कंपनी बंद होईपर्यंत संविधानिक व लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीस लोटे, चिरणी, आंबडस, भेलसई, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक, घाणेखुंट, आवाशी, गुणदे, शेल्डी आदी ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सदस्य उपस्थित होते. तसेच रवींद्र गोवळकर, संजय आंब्रे, संजय साळवे, अविनाश आंब्रे, किशोर आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंत-देसाई आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.या ११ ग्रामपंचायतींनी मिळून “लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती” या नावाने ४५ सदस्यांची समिती स्थापन केली असून स्थानिक नागरिकांच्या भावना प्रशासनापुढे मांडण्यात आल्या. कंपनीमुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय व आरोग्यविषयक परिणामांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, दि. १८ मार्च २०२६ रोजी धामणदेवी, आंबडस, भेलसई, लोटे, गुणदे, आवाशी, चिरणी, घाणेखुंट, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक व शेल्डी या ग्रामपंचायतींनी मंजूर केलेले ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. “जनतेच्या हितासाठी व न्यायासाठी कंपनी बंद होईपर्यंत लढा सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका ग्रामपंचायतींनी घेतली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील या कंपनीकडून घातक ‘पिफास’ (PFAS) रसायनाचे उत्पादन होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू असून, आता ग्रामपंचायतींच्या ठरावांमुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. प्रशासनासमोर या वाढत्या विरोधामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार Read More »

chiplun-tar-melting-fire-fire-brigade-control

चिपळुणात डांबर वितळवताना आग; अग्नीशमन दलाने अर्ध्या तासात मिळवले नियंत्रण

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी शहरातील पालिकेसमोरील खेडेकर क्रीडा संकुलाच्या मैदानात डांबर वितळवण्याच्या कामादरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी पहाटेपासून डांबर लाकडाच्या साह्याने वितळवण्याचे काम सुरू होते. दुपारच्या कडक उन्हात डांबर पूर्णपणे वितळून ड्रमच्या बाहेर पडल्याने अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने तीव्र स्वरूप धारण करत परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे अर्धा तास पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. यावेळी पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. या आगीत ड्रममधील बहुतांश डांबर जळून खाक झाले असून काही काळ कामकाज ठप्प झाले होते. घटनेमुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

चिपळुणात डांबर वितळवताना आग; अग्नीशमन दलाने अर्ध्या तासात मिळवले नियंत्रण Read More »

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा धुडगूस; चालक-वाहकास मारहाण

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा धुडगूस; चालक-वाहकास मारहाण

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण-तिवरे एस.टी. बसमध्ये मद्यधुंद प्रवाशाने चालक आणि वाहकासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळकवणे फाट्याजवळ घडली. या प्रकारामुळे काही काळ बसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास (क्र. एमएच २० बीएल २४३७) ही एसटी बस तिवरे गावाकडे जात असताना प्रवासी प्रकाश बाबा कोकरे (वय ३१, रा. नांदिवसे) हा दारूच्या नशेत प्रवास करत होता. त्याचे तिकीट कळकवणे फाट्यापर्यंत असल्याने वाहक पाराजी सरवदे यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. यावरून आरोपीने संतापून चालक उमेश सुखदेव हजारे (वय ३६) व वाहकासोबत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने चालकाला मारहाण केली. या झटापटीत चालकाच्या चेहऱ्यावर नख लागून दुखापत झाली असून त्यांचा शर्टही फाटला. तसेच वाहकासोबत झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या खिशातील सुमारे ८०० रुपये गहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चालक उमेश हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश कोकरे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा (रजिस्टर नं. १२/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा धुडगूस; चालक-वाहकास मारहाण Read More »

“पूरमुक्त चिपळूणकडे मोठे पाऊल; वांगडे मोहल्ल्यासाठी २४.९९ कोटींची संरक्षण भिंत चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीकाठावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी अखेर दिलासा देणारा निर्णय झाला असून पूर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहादुरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा हा भाग नदीकाठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विशेषतः २२ व २३ जुलै २०२१ च्या भीषण पुरात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच नदीच्या पाण्याच्या वेगामुळे काठालगतची जमीन खचत असल्याने घरांना सतत धोका निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मागील तीन वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून क्षेत्रीय कार्यालयाच्या पाहणीनंतर तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, मुख्य अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता गणेश सलगर व त्यांच्या तांत्रिक पथकाचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाला गती मिळाली. दरम्यान, हा केवळ पहिला टप्पा असून पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांसाठीही लवकरच मंजुरी मिळविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या कामामुळे वाशिष्ठी काठावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पूरमुक्त चिपळूणच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री उदय सामंत तसेच संबंधित अधिकारी यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत. तसेच दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले आहे.

“पूरमुक्त चिपळूणकडे मोठे पाऊल; वांगडे मोहल्ल्यासाठी २४.९९ कोटींची संरक्षण भिंत

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीकाठावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी अखेर दिलासा देणारा निर्णय झाला असून पूर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहादुरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा हा भाग नदीकाठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विशेषतः २२ व २३ जुलै २०२१ च्या भीषण पुरात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच नदीच्या पाण्याच्या वेगामुळे काठालगतची जमीन खचत असल्याने घरांना सतत धोका निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मागील तीन वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून क्षेत्रीय कार्यालयाच्या पाहणीनंतर तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, मुख्य अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता गणेश सलगर व त्यांच्या तांत्रिक पथकाचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाला गती मिळाली. दरम्यान, हा केवळ पहिला टप्पा असून पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांसाठीही लवकरच मंजुरी मिळविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या कामामुळे वाशिष्ठी काठावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पूरमुक्त चिपळूणच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री उदय सामंत तसेच संबंधित अधिकारी यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत. तसेच दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले आहे.

“पूरमुक्त चिपळूणकडे मोठे पाऊल; वांगडे मोहल्ल्यासाठी २४.९९ कोटींची संरक्षण भिंत Read More »

dr-sunita-chavan-ratnagiri-gynecologist-death

रत्नागिरीतील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता चव्हाण यांचे निधन

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ तसेच स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. डॉ. चव्हाण यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने आणि वैद्यकीय कौशल्याने असंख्य महिलांना आरोग्यसेवा दिली. स्त्रीरोग तज्ञ म्हणून त्यांनी जिल्ह्यात मोठे योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल सर्व स्तरांतून घेतली जात होती. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत माळनाका येथील स्वस्तिक बंगला येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघून चर्मालय स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात डॉ. नितीन रमेश चव्हाण यांच्यासह शोकाकुल परिवार आहे.

रत्नागिरीतील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता चव्हाण यांचे निधन Read More »