प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : येथील ऐतिहासिक पावन तलाव मैदानावर प्रथमच आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी प्रीमियर लीग (आरपीएल) २०२६ ही भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोन दिवस रंगतदार वातावरणात पार पडली. हजारो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने झालेल्या या स्पर्धेत केदारनाथ क्रिकेट क्लब, खरवते संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर विसू इलेव्हन, चिपळूण संघाने उपविजेतेपद मिळवले. अंतिम सामना एकतर्फी ठरला असून केदारनाथ खरवते संघाने आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला भावेश पवार, ज्याने अंतिम सामन्यात ६ गडी बाद करत आणि फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला.
या स्पर्धेचे उद्घाटन ६ एप्रिल रोजी आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक योगेश पवार, विकी नरळकर, कपिल शिर्के, गणेश अग्रे, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, केतन पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. प्रथमेश पवार, रितेश घाग आणि युवराज कुरूप या तीन मित्रांनी एकत्र येऊन रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच अशी भव्य रत्नागिरी प्रीमियर लीग यशस्वीपणे साकारली.
स्पर्धेदरम्यान लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नगरसेवक अंकुश आवले, राणी महाडिक, उमेश काटकर, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध निकम, परिमल भोसले, पिंट्या पाकळे, विकी लवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील उपांत्य सामनेही तितकेच रंगतदार ठरले. पहिल्या उपांत्य फेरीत अब्दुल कादिर कोकणी बॉईज विरुद्ध विशू इलेव्हन सामना झाला असून त्यात विशू इलेव्हन विजयी झाला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सुधीर स्पोर्ट्स, चिपळूण आणि केदारनाथ खरवते यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. हा सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला आणि त्यात केदारनाथ खरवते संघाने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेतील विविध वैयक्तिक पुरस्कारही मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अब्दुल कादिर कोकणी बॉईज संघाचा नाझीम फकी याचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार विशू इलेव्हन, चिपळूण संघाच्या सौरभ पवार याला मिळाला, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून मकरंद पवार याचा सन्मान करण्यात आला. इमर्जिंग प्लेयर पुरस्कार विशू इलेव्हनच्या मुकुंद पेजले याला मिळाला. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार भावेश पवार याने पटकावला. ऑल इंडिया आयकॉन सिरीजमध्येही भावेश पवार याने बाजी मारत ४२ इंची टीव्ही जिंकला. याशिवाय सर्व विशेष पुरस्कार विजेत्यांना आकर्षक चषकासह ३२ इंची कलर टीव्ही देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठेचा मालिकावीर पुरस्कार केदारनाथ खरवते संघाच्या सुदर्शन मयेकर याला प्रदान करण्यात आला. त्याला टीव्हीएस रेडर मोटारसायकल आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या केदारनाथ क्रिकेट क्लब, खरवते संघाला रु. २,२२,२२२ रोख पारितोषिक आणि आरपीएल २०२६ चषक, तर उपविजेत्या विशू इलेव्हन, चिपळूण संघाला रु. १,११,१११ आणि आरपीएल २०२६ उपविजेता चषक प्रदान करण्यात आला.
भव्य फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अनिरुद्ध निकम, संदेश आयरे, ऋग्वेद पवार, मुन्ना देसाई (हातखंबा), गणेश सावर्डेकर, सतीश सावर्डेकर, अजित शिगवण (रणजी, गोवा), उमेश राजशिर्के, देवराज गरगटे, समीर काजी, अमोल सुर्वे, मनोहर घाग, अरुण घाग आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेला समालोचनाचीही विशेष रंगत लाभली. आयपीएलचा आवाज म्हणून ओळखले जाणारे, कुणाल दाते, विविध राज्यांमध्ये समालोचन करणारे प्रशांत आदवडेकर, बाबल्या जाधव, तसेच सिद्दिक मेमन आणि जयेश पोटफोडे यांनी स्पर्धेचे थरारक समालोचन करत वातावरण भारावून टाकले. एकूणच, प्रथमेश पवार, रितेश घाग आणि युवराज कुरूप यांनी केलेल्या या भव्य आयोजनाचे रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो क्रीडा रसिकांनी आणि क्रिकेटप्रेमींनी मनापासून कौतुक केले. रत्नागिरी प्रीमियर लीग २०२६ ही स्पर्धा जिल्ह्यातील क्रिकेटविश्वात एक नवा मानदंड निर्माण करणारी ठरली आहे.



















