konkandhara.com

कोकणची बातमी

Web Banner 20

पनवेल तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन

सीएम फडणवीस यांच्या हस्ते सन्मान नवेल तालुका पोलीस ठाण्याच्या स्मार्ट वर्क, सुयोग्य व्यवस्थापन आणि उत्तम कामगिरीला मोठी दाद मिळाली आहे. या ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत खारपाडा टोल नाका ते वावंजे, धोदानी, शिरवली व खालापूर तालुका सीमेपर्यंतचा मोठा भाग येतो. या भागात नवनवीन गृहनिर्माण संकुलांसह ग्रामीण परिसरही आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी तालुका पोलिसांवर असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हे कर्तव्य प्रभावीपणे बजावण्यात आले. या ठाण्यात प्रशस्त इमारत, स्वच्छता, पासपोर्ट, बारानिशी, वायरलेस, स्टेशन डायरी यांसाठी स्वतंत्र खोल्या, महिला-पुरुष आरोपींसाठी कोठडी, संगणक, इंटरनेट, वायफाय, कॅमेरे, पिण्याचे पाणी अशा सुविधा उपलब्ध आहेत. दाखल गुन्ह्यांचे अन्वेषण व प्रकटीकरणाचे प्रमाण समाधानकारक आहे. गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण करण्यातही यश मिळाले आहे. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, तत्पर कामकाज, सायबर क्राईम नियंत्रण, प्रशिक्षित पोलिस दल, नागरिकांचा अभिप्राय, सुरक्षा निकष अशा 37 मुद्द्यांवर पनवेल तालुका पोलीस ठाणे पात्र ठरले आहे. नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी सीएम फडणवीस यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले उपस्थित होते. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक घाडगे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन Read More »

Konkandhara Thumbnail 3 1 1

नवरात्रोत्सवात सुगरणीचा शोध!

नवरात्रोत्सवात सुगरणीचा शोध! रोहाच्या वर्से गावात महिलांसाठी खास उपक्रम, राणी म्हात्रे सन्मानित कोकणात सध्या नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील वर्से गावात काळभैरव ग्रामस्थ मंडळाने नव्याने बांधलेल्या जरीमरी मंदिरात नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नऊ दिवस विविध मनोरंजक स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रम ठेवले होते. त्यात विशेष आकर्षण ठरली पाककला स्पर्धा. या स्पर्धेतून गावातील महिलांची कला आणि परंपरा पुढे आली. या पाककला स्पर्धेत विजेतेपद पटकावून ‘शोध सुगरणीचा’ हा मान राणी म्हात्रे यांना मिळाला. मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात ग्रामस्थ, महिला व तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. वर्से गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे गावातील महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि नवरात्रोत्सवाचा आनंद अधिकच वाढतो. पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा उत्सव महिलांच्या सहभागामुळे अधिक रंगतदार झाला आहे.

नवरात्रोत्सवात सुगरणीचा शोध! Read More »

WhatsApp Image 2025 09 26 at 4.01.50 AM

रत्नागिरीत आईनेच आठ महिन्यांच्या मुलीची हत्या; पोलिस तपास सुरू

रत्नागिरी, कारवांचीवाडी पारसनगर येथे एका आईने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतक बालिकेचे नाव हुरेन आसिफ नाईक असून, तिचा मृतदेह रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. ही घटना रत्नागिरी तालुक्यासह शहरात खळबळ उडवणारी ठरली आहे. घटनेच्या तपशीलानुसार, रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील या तरुणीचा विवाह चिपळूणजवळील गावातील तरुणाशी झाला होता. या दाम्पत्याला आधीच चार वर्षांची एक मुलगी आहे. पती कामानिमित्त परदेशात असल्याने महिला आपल्या माहेरी, कारवांचीवाडी येथे राहत होती. महिलेवर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी तिची बहीण बाहेर गेली असताना, आरोपीने आठ महिन्यांच्या हुरेनच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबल्याने बाळाचा गुदमरण झाला. ही घटना शेजाऱ्यांना उघडकीस आली आणि त्यांनी तातडीने बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. ग्रामीण पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आईने असे कृत्य का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

रत्नागिरीत आईनेच आठ महिन्यांच्या मुलीची हत्या; पोलिस तपास सुरू Read More »

Web Banner 5

यवतमाळनंतर चिपळूणमध्येही TWJ कंपनीचा मोठा घोटाळा! 28 लाख 50 हजारांची भावंडांची फसवणूक

रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील 39 लाखांच्या फसवणुकीनंतर आता चिपळूणमध्येही ट्रेड विथ जॅझ (TWJ) कंपनीच्या फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण शहरातील भावंडांची तब्बल 28 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कंपनीच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण शहरातील इंटक भवन येथे असलेल्या TWJ कंपनीच्या कार्यालयातून हा सगळा कारभार चालत होता. आरोपी समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांनी स्वत:ला कंपनीचे प्रतिनिधी सांगत प्रतिक दिलीप माटे आणि त्यांची बहीण तृप्ती दिलीप माटे यांचा विश्वास संपादन केला. महिन्याला 3 ते 4 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी प्रतिक माटे यांच्याकडून 3.5 लाख आणि त्यांच्या बहिणीकडून 25 लाख रुपये गुंतवून घेतले. जानेवारी 2023 पासून आजपर्यंत या दोघांनी मिळून 28.5 लाख रुपये गुंतवले. मात्र, मे 2025 नंतर कंपनीने कोणताही परतावा दिला नाही. वारंवार मागणी करूनही मूळ रक्कमही न परतवल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रतिक माटे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, TWJ कंपनीने गुंतवणूकदारांना सुरुवातीला मोठा नफा दाखवून आकर्षित केले होते. एका लाख रुपयांवर महिन्याला 7 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात होते. हळूहळू हा दर 6, 5, 4 आणि 3 टक्क्यांपर्यंत कमी झाला. काही गुंतवणूकदारांनी सुरुवातीला दामदुप्पट नफा घेतला, त्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि गुंतवणुकीचा ओघ वाढत गेला. पुढे कंपनीने गुंतवणूक थांबवली आणि फसवणूक उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी अशा हाय-प्रोफाईल लोकांकडून करोडो रुपये गोळा केले असून, हा गैरव्यवहार तब्बल 1000 ते 1200 कोटी रुपयांचा असल्याची चर्चा आहे. कंपनीकडे इव्हेंट, इन्फ्रा, हॉस्पिटॅलिटी, लर्निंग, लॉजिस्टीक अशा विविध उपकंपन्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अवास्तव आमिषांना बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच गुंतवणूक करावी.

यवतमाळनंतर चिपळूणमध्येही TWJ कंपनीचा मोठा घोटाळा! 28 लाख 50 हजारांची भावंडांची फसवणूक Read More »

Web Banner 4

आमच्या ताटात हात घालू नका! – अलिबागमध्ये आदिवासी-कोळी समाजाचा इशारा

अलिबाग | राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणात वाटा मागण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोळी व आदिवासी समाज आक्रमक झाला असून येत्या 30 सप्टेंबर रोजी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (20 सप्टेंबर) अलिबाग येथे झालेल्या संयुक्त बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बैठकीत आरक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा नेत्यांनी मांडला. जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती दिलीप भोईर म्हणाले, “आमचा कुणालाही आरक्षण द्यायला विरोध नाही. परंतु आमच्या हक्काच्या जागेत कुणी डोकावलं, तर ते आम्ही सहन करणार नाही. आधीच आदिवासी व कोळी बांधव अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. अशा वेळी आमच्या ताटात हात घालण्याचा प्रयत्न आम्ही रोखून धरू.” बैठकीला माजी तहसीलदार मोरेश्वर आडके अध्यक्षस्थानी होते. यावेळी आदिवासी कातकरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान नाईक, माजी तहसीलदार रवी पाटील, ऑफ्रोह संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, धर्मा लोभी, गजानन पाटील आदींसह अनेक समाजनेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन समाजबांधवांना एकत्र करण्याचं ठरलं आहे. स्वतंत्र समित्या स्थापन करून नियोजन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनातून कोळी व आदिवासी समाजाने सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर कुणाचाही डोळा असू नये.

आमच्या ताटात हात घालू नका! – अलिबागमध्ये आदिवासी-कोळी समाजाचा इशारा Read More »

WhatsApp Image 2025 09 18 at 3.18.05 PM

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून तब्बल ५ लाख ९६ हजारांहून अधिक प्रवाशांनी एसटीद्वारे सुखरूप प्रवास केला. या विशेष सेवेतून एसटीला २३ कोटी ७७ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसनी १५,३८८ फेऱ्या पूर्ण केल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “गणेशोत्सवासाठी आप-आपल्या गावी पोहोचलेल्या लाखो कोकणवासीयांचा सुखरूप प्रवास शक्य करून दाखवणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे अधिकारी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.” एसटी महामंडळाने या प्रवाशांची अपघात विरहित सुरक्षित वाहतूक करून नवा इतिहास रचला आहे.

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न Read More »

Copy of Web Banner 1

महिला बचत गटांसाठी शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर व महिला मेळावा – मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने महिला बचत गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), रायगड यांच्या वतीने रोहा तालुक्यातील मौजे वरसे येथे “शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर व महिला मेळावा” आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. आपल्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून कार्यरत असल्याचे सांगत, महिलांनी त्या योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या कर्जांचे धनादेश वितरित करण्यात आले. याशिवाय, ग्राम पातळीवर महिला बचत गटांना सहकार्य करणाऱ्या पुरुष बांधवांना “सुधारक सन्मान पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ज्येष्ठ ग्रामस्थ, माता-भगिनी, ग्रामपंचायत पदाधिकारी, माविमचे अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला बचत गटांसाठी शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर व महिला मेळावा – मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती Read More »

Web Banner 14

रत्नागिरीत बाप्पा रील स्पर्धा २०२५ पारितोषिक वितरण समारंभ; मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

रत्नागिरी – कोकणची संस्कृती, गणपती सण आणि कलात्मक परंपरेला उभारी देणाऱ्या “बाप्पा रील स्पर्धा २०२५” या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्तानं उदय सामंत यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकारनं मराठी चित्रपटसृष्टीसाठी देशातील पहिलीच इन्सेंटिव्ह स्कीम आणली असून कोकण, विदर्भ, मराठवाडा येथील निर्माते, कलाकार आणि टेक्नीशियन यांना मोठं प्रोत्साहन मिळणार आहे. वैभव मांगले यांच्या संकल्पना व संघर्षाच्या प्रवासाचा गौरव करण्यात आला. यावेळी वीणाताई जामकर, माजी आमदार राजन साळवी, बंड्याशेठ साळवी, राजेंद्र महाडिक, सुदेश मयेकर, परशुराम कदम, विजय खेडेकर, शिल्पाताई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त सर्व कलाकार व सहभागींचं मनःपूर्वक अभिनंदन करून मराठी कला आणि संस्कृतीचा गौरव वाढविण्यात आला.

रत्नागिरीत बाप्पा रील स्पर्धा २०२५ पारितोषिक वितरण समारंभ; मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती Read More »

Web Banner 13

रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण!

रोह्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी ओळख मिळाली. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीनं पार पडलं. कलाकार सयाजी शिंदे व भरत जाधव यांनी दिलेली भाषणं रंगतदार ठरली. रोहा | रोहा शहराच्या सांस्कृतिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण शनिवारी अत्यंत उत्साहात पार पडलं. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत राज्याची मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे तसेच मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील मान्यवर अभिनेते सयाजी शिंदे आणि भरत जाधव यांनी हजेरी लावली. नव्या नाट्यगृहाच्या उद्घाटनावेळी रोहात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळालं. रोह्यातील नागरिक, स्थानिक कलाकार, सामाजिक संस्था, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मतं मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मान्य करत सांगितलं, “होय, उशीर झाला… पण हा उशीर माझ्या जबाबदारीतलाच आहे. ही माझी चूक आहे. पण आज नाट्यगृह उभं राहिलं आहे, हेच खरं समाधान आहे.” त्यांच्या या स्पष्ट कबुलीनं टाळ्यांचा कडकडाट झाला. मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकल्पाला मिळालेलं स्थानिक सहकार्य अधोरेखित केलं. त्यांनी सांगितलं की, रोहातील कला, साहित्य, रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी हे नाट्यगृह एक मोठं व्यासपीठ ठरेल. खासदार सुनील तटकरे म्हणाले, “ज्यांनी आधी टीका केली होती… तेच आता या नाट्यगृहाचे चाहते झाले आहेत. हीच खरी कामगिरी आहे.” कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव यांनी भावनिक शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, “हे नाट्यगृह म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठं दान आहे. इथून अनेक कलाकार घडतील, हीच खरी पुण्याई.” त्यांच्या भावनिक वक्तव्याने सभागृहात दाद मिळाली. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाट्यगृहात होणाऱ्या पहिल्या नाटकाची घोषणा करत सांगितलं की, “घाशीराम कोतवाल” या सुप्रसिद्ध नाटकाने रोहाच्या रंगमंचावर पहिली घंटा वाजेल. या घोषणेनं प्रेक्षकांत उत्सुकता निर्माण झाली. उद्घाटन समारंभात स्थानिक कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण रंगतदार केलं. नाट्यगृहाच्या भव्य वास्तूचं कौतुक सर्वांनीच केलं. आधुनिक ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना आणि आसनव्यवस्था यामुळे हे नाट्यगृह कोकणातील एक आदर्श सांस्कृतिक केंद्र ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात आज उत्साहाचं आणि भावनांचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हे भव्य नाट्यगृह रोह्याच्या लोकांच्या स्वाधीन करण्यात आलं. या सोहळ्यात मंत्री अदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, “हे नाट्यगृह उभं राहणं सोपं नव्हतं. प्रत्येक टप्प्यावर नवनव्या अडचणी, आपत्ती, संकटं समोर आली. पण आम्ही हार मानली नाही. सर्व अडथळ्यांचा सामना करत, टीका-टिप्पण्यांना उत्तर देत आज हे सभागृह पूर्णत्वास आलं आहे. ही फक्त माझीच नाही, तर रोह्याच्या जनतेची जिद्द आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. स्थानिक नागरिक, कलाकार आणि मान्यवर यांनी नाट्यगृहाचं महत्त्व अधोरेखित करत मंत्री तटकरे यांचे आभार मानले. रोहा शहराला या नाट्यगृहामुळे एक वेगळीच सांस्कृतिक ओळख मिळणार आहे. स्थानिक कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. कला आणि संस्कृतीला चालना देणारी ही पायरी, रोहा शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा नवा अध्याय लिहील, यात शंका नाही.

रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण! Read More »

WhatsApp Image 2025 09 12 at 10.34.27 AM

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक

पाली (10 सप्टेंबर) – अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता विजयी झाले आहेत. 15 पैकी 9 मते मिळवत त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांचा पराभव केला. तर एक मत तटस्थ राहिले. सुरुवातीला तिरंगी लढतीचे चित्र होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत मेहता यांना पाठिंबा दिला. अखेरच्या क्षणी झालेल्या या राजकीय हालचालींमुळे भाजप-राष्ट्रवादी आघाडीला बळ मिळाले. निवडणुकीच्या निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा झाला. या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीला महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठता आला असून आगामी काळात पाली नगरपंचायतीचे राजकारण याच निकालाच्या छायेत ठरणार आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीच्या शाश्वत विकासाची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, भाजप नेते वैकुंठ पाटील, प्रकाशभाऊ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक Read More »