konkandhara.com

31 मार्च 2026

प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वनअधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार

प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वनअधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वन विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल वन विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या धाडसी व यशस्वी कामगिरीबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष उमेशशेठ काटकर, उपाध्यक्षा सुमती जांभेकर, सेक्रेटरी संतोष इनामदार, विश्वस्त शर्मिला मोरे, स्मिता सरदेसाई, प्रमोदशेठ लाड, संजय अवटी, सहा सेक्रेटरी धनश्री जोशी, सदस्य संपदा लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच चिपळूण नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांनीही उपस्थित राहून देसाई यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बोलताना सेक्रेटरी संतोष इनामदार यांनी प्रभात रोड फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. सन 2000 पासून नारायण तलाव संवर्धन, परिसरातील मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण तसेच आपत्ती काळात मदत अशा विविध उपक्रमांद्वारे फाउंडेशनने समाजात भरीव योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. गिरीजा देसाई यांनी वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जनजागृती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी ठाणे वन विभागात कार्यरत असताना 30 हून अधिक बिबट्यांची सुखरूप सुटका केली, तसेच 200 हून अधिक वन्यप्राण्यांचे प्राण वाचवले. अवैध तस्करीविरोधात कारवाई करत 50 हून अधिक वाहने जप्त करण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करणे, झाडे लावणे व ती जगविणे, तसेच जनजागृती मोहीम राबविणे या बाबींमध्ये त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या कार्यामुळे वन विभागाचे कामकाज अधिक प्रभावी व सुबक झाले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी गिरीजा देसाई यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार करताना अभिमान वाटत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वनअधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार Read More »

bhaskar-jadhav-fuel-shortage-criticism-government-chiplun

इंधन तुटवड्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप;भास्कर जाधव यांचा सरकारवर निशाणा

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : राज्यात इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते, असा इशारा देतात, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगतात. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. “जर राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, तर मग केरोसिन वितरणाचा निर्णय का घेण्यात आला?” असा सवाल उपस्थित करत जाधव यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच अफवा पसरवण्याच्या बाबतीत भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. इंधन पुरवठा, संभाव्य संकटाची चर्चा आणि सरकारच्या निर्णयांमुळे सध्या राज्यात चर्चांना उधाण आले असून, या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

इंधन तुटवड्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप;भास्कर जाधव यांचा सरकारवर निशाणा Read More »

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; सुमित्रा ज्वेलर्समध्ये चांदीचे दागिने लंपास

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; चोरट्यांचा शोध सुरू

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी :- शहरातील मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत ज्वेलर्समधून चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याचे समोर आले असून, ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत. या तपासात प्रभारी शहर पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी करून काही धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला.

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; चोरट्यांचा शोध सुरू Read More »

konkandhara 53

खेर्डीत भव्य कबड्डी स्पर्धेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, खेर्डी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. श्री. अनिल शेठ दाभोळकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खेर्डी परिसरात या क्रीडा सोहळ्याबद्दल विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उद्घाटन प्रसंगी श्री. अनिल शेठ दाभोळकर, श्री. जयेंद्रथ शेठ खताते, सौ. दिशाताई दाभोळकर, श्री. नितीनजी (अबूशेठ) ठसाळे, श्री. प्रकाश शेठ साळवी, श्री. विश्वनाथजी (बाबुशेठ) साळवी, श्री. जमालुद्दीनजी बंदरकर, सौ. निनाताई दाभोळकर, श्री. राकेशजी दाभोळकर, श्री. सचिनजी भोसले यांच्यासह दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस खेर्डीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा सोमवार दि. 30 मार्च 2026 ते बुधवार दि. 1 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून एकूण 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खेळाडूंनीही चुरशीच्या लढती सादर करत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. स्पर्धेच्या अंतिम दिवशी मा. श्री. अनिल शेठ दाभोळकर यांचा 70 वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येणार असून त्यावेळी विजेत्या संघांना पारितोषिक वितरण सोहळाही पार पडणार आहे. खेर्डी व चिपळूण तालुक्यातील सर्व कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

खेर्डीत भव्य कबड्डी स्पर्धेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन Read More »

किरण सामंत यांची शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजापूर–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत (भैय्या सामंत) यांची शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कोकणातील पक्ष संघटना अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क, विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य या बाबींमुळे किरण सामंत यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती अधिक प्रभावीपणे राबवणे ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणात शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती Read More »

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा : बबन बांडागळे | मुरादपूरमध्ये मंगेश बांडागळे यांचा सत्कार

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा, विकासाची नवी दिशा द्या : बबन बांडागळे, मुरादपूरमध्ये पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांचा सत्कार; कांचन बोरे हिचाही गौरव

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : “गावाने दाखवलेला विश्वास हा केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी आहे. त्या विश्वासाला उतराई होत विकासाची नवी दिशा देणे, हेच खरे नेतृत्वाचे लक्षण आहे,” असे प्रतिपादन शिक्षक नेते बबन बांडागळे यांनी केले. देवरुख लगतच्या मुरादपूर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बांडागळे हे पंचायत समिती निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल श्री सोमेश्वर ग्रामविकास मंडळ, मुरादपूर यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा दलात नियुक्ती झाल्याबद्दल कांचन बोरे हिचाही सन्मान करण्यात आला. मुरादपूर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात फौजदार गणेश बांडागळे, रवींद्र बांडागळे, रवींद्र बांडागळे गुरुजी, सरपंच दीक्षा बांडागळे, माजी उपसरपंच नंदकिशोर बांडागळे, माजी सरपंच अनिल बांडागळे, मुजीब साटविलकर, वासुदेव नार्वेकर, स्वरा बांडागळे, दत्ताराम चोगुले, शशिकांत कापदुले, गायत्री बांडागळे, श्रीकृष्णा बांडागळे, रमेश बांडागळे, महेश बांडागळे, ग्रामसेविका तृप्ती कुलकर्णी, खैरून फकीर, तसेच मुरादपूरच्या पहिल्या सरपंच सुप्रिया चौगुले, राजेंद्र महाडिक, नितीन बांडागळे, अजित बांडागळे, वामन बांडागळे, सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम चौगुले यांनी करताना या सत्कारामागील भावना व्यक्त केल्या. “गावातील एक तरुण आज तेरा गावांचे म्हणजेच हातिव पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करत आहे, ही अभिमानाची बाब आहे. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कामांमुळे लोकांचा विश्वास संपादन झाला आणि त्याच जोरावर मंगेश बांडागळे विजयी झाले,” असे ते म्हणाले. तसेच कांचन बोरे हिने महाराष्ट्र सुरक्षा दलात स्थान मिळवून गावाचे नाव उज्वल केल्याचे त्यांनी नमूद केले. दिनेश साबळे यांनी निवडणूक काळातील आठवणी सांगताना मंगेश बांडागळे यांच्या अथक परिश्रमांचा उल्लेख केला. “तेरा गावांतून मिळालेला प्रतिसाद आणि आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे हेच त्यांच्या विजयाचे मुख्य कारण ठरले,” असे त्यांनी सांगितले. रवींद्र बांडागळे गुरुजी यांनी पक्षभेद विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला. “आपल्या गावातील तरुण पुढे जात असेल तर त्याला साथ देणे ही आपली जबाबदारी आहे. संपूर्ण मुरादपूर गाव त्यांच्या पाठीशी उभे राहिले, हेच त्यांच्या यशाचे खरे बळ आहे,” असे ते म्हणाले. सरपंच दीक्षा बांडागळे यांनीही शुभेच्छा देत भविष्यातील कार्यासाठी विश्वास व्यक्त केला. गौरवमूर्ती कांचन बोरे हिने आपल्या मनोगतात भावना व्यक्त करताना सांगितले, “पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते, मात्र महाराष्ट्र सुरक्षा दलातील वर्दी मिळाल्याचे समाधान आहे. आजचे यश पाहण्यासाठी वडील हवे होते,” असे सांगताना तिचा आवाज दाटून आला. सत्कारमूर्ती मंगेश बांडागळे यांनी आपल्या मनोगतात गावकऱ्यांचे आभार मानत सांगितले की, “संपूर्ण गाव, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीय यांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर आणि केलेल्या कामांवर विश्वास ठेवून जनतेने मला विजयी केले. हा विश्वास मी कधीच विसरणार नाही.” पुढे ते म्हणाले की, “मुरादपूर ग्रामपंचायत परिसराच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे दहा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून पंचायत समिती सदस्य म्हणून माझे पहिले काम गावासाठीच आहे. तेरा गावांत काम करत असतानाही मुरादपूरकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही.” पत्रकार योगेश बांडागळे यांनी मंगेश बांडागळे हे विषय समजून घेतात, अभ्यास करतात, त्यामुळे निश्चितच पहिल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याचे दर्शन घडले. गावाने सरपंच केले, पंचायत समिती निवडणुकीत गाव पाठीशी ठामपणे उभा राहिला, हे कधीही विसरू नका, अशी सूचना त्यांनी केली. अध्यक्षीय भाषणात बबन बांडागळे यांनी मंगेश बांडागळे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, “ग्रामपंचायतीत दहा वर्षे काम केल्यामुळे त्यांना प्रशासनाची चांगली जाण आहे. आता पंचायत समितीच्या माध्यमातून अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी ही संधी साधत विकासाची गती वाढवावी,” असा सल्ला त्यांनी दिला. तसेच भविष्यातही ते राजकीय क्षेत्रात यशाची नवी उंची गाठतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांडागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र बांडागळे यांनी केले.

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा, विकासाची नवी दिशा द्या : बबन बांडागळे, मुरादपूरमध्ये पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांचा सत्कार; कांचन बोरे हिचाही गौरव Read More »