konkandhara.com

30 मार्च 2026

रायगडमध्ये NCP बॅनर वाद: अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचे फोटो

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो

प्रतिनिधी : कोकणधारा रोहे: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून पक्षातील प्रमुख नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर मात्र खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचेच फोटो झळकले. हा कार्यक्रम नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे स्वतः उपस्थित होते. तरीही पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांचे फोटो बॅनरवर नसल्याने विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांच्यावर यापूर्वीही राष्ट्रवादी पक्षात फूट पाडल्याचे आरोप झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर रायगडमधील या बॅनर प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.या घटनेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “दादांचा पक्ष ताब्यात घेण्याचे तटकरेंचे मनसुबे आता उघड झाले आहेत. त्याची सुरुवात रायगडमधून होत आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “हिम्मत असेल तर प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत वेगळा पक्ष काढा किंवा भाजपमध्ये जा,” असा टोला देखील त्यांनी लगावला. या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो Read More »

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाई

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाईमुख्य जलवाहिनीवरील बेकायदेशीर पाच पंप जप्त; कारवाई सुरूच राहणार : सौरभ खडपे

प्रतिनिधी : कोकणधारा राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या पंप बसवून करण्यात येणाऱ्या पाणीचोरीविरोधात राजापूर नगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप जप्त करण्यात आले असून, भविष्यातही अशी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी दिली. शहरामध्ये जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या पंप बसवून पाणीचोरी होत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली असून, पाणीचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता.त्या अनुषंगाने, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने शहरात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. या सर्वेक्षणादरम्यान मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप आढळून आले, ते तात्काळ जप्त करण्यात आले. अशा प्रकारची धडक कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशाराही श्री. खडपे यांनी दिला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे जलसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आगामी काळात शहराला पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेऊन नगर पालिकेने आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी, पारंपरिक विहिरी तसेच तळी यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, उन्हाळ्यात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. खडपे यांनी स्पष्ट केले.

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाईमुख्य जलवाहिनीवरील बेकायदेशीर पाच पंप जप्त; कारवाई सुरूच राहणार : सौरभ खडपे Read More »