रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड २५ मार्चला; संभाव्य नावांची जोरदार चर्चा
प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २५ मार्च रोजी ही महत्त्वपूर्ण निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून संभाव्य नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनात विषय समित्यांचे सभापती पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धोरणात्मक निर्णय, योजना अंमलबजावणी आणि विभागनिहाय कामकाज यामध्ये या पदांची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे या पदांवर कोणाची निवड होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी काही अनुभवी आणि निष्ठावान नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चिपळूणच्या मयुरी शिर्के यांना महिला व बालकल्याण समिती सभापतीपद मिळण्याचे संकेत असून महिलांच्या प्रश्नांवरील त्यांची जाण आणि प्रशासकीय अनुभव यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते.रत्नागिरीचे प्रकाश रसाळ यांच्याकडे समाज कल्याण समितीची धुरा सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वंचित घटकांसाठीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचा अनुभव उपयोगी ठरेल, अशी चर्चा आहे. राजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रकाश कुवळेकर यांच्या नावाचा विचार शिक्षण व अर्थ समितीसाठी केला जात असल्याचे समजते. शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि अर्थसंकल्पीय नियोजनात त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल, असा पक्षाचा विचार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.गुहागर तालुक्यातील महेश नाटेकर यांना कृषी समिती सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. कोकणातील शेती व बागायतदारांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चळके यांच्याकडे बांधकाम व आरोग्य या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. ग्रामीण भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या बळकटीसाठी त्यांच्या नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही सर्व नावे सध्या चर्चेच्या टप्प्यात असून २५ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी पक्षश्रेष्ठींकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राजकीय समीकरणे आणि प्रादेशिक समतोल लक्षात घेता या नावांना पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या निवडीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून आगामी काळात विकासकामांच्या गतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड २५ मार्चला; संभाव्य नावांची जोरदार चर्चा Read More »





