चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला रविवार, दि. १२ एप्रिलपासून चिपळूण येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबईचे माजी रणजीपटू व निवड समिती सदस्य सुनील मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली. शहरातील पवन तलाव मैदानावर ही स्पर्धा होणार आहे.
उद्घाटन समारंभाला आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती संदेश आयरे यांच्यासह सर्व नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि मुंबई क्रिकेटमधील भक्कम कारकीर्द यामुळे सुनील मोरे हे नाव क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सुनील मोरे यांनी १९९२ ते १९९६ या कालावधीत मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्या काळात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर आणि अमोल मुझुमदार यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांनी २५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४४ च्या सरासरीने १५०३ धावा केल्या असून, संघाला अनेकदा भक्कम सुरुवात करून दिली.
मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनी नॅशनल क्रिकेट क्लब आणि दादर युनियन स्पोर्टिंग क्लबकडून टाइम्स शिल्ड व कांगा लीगसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच त्यांनी इंग्लंडमधील सॉमरसेट संघाकडून काउंटी क्रिकेटचा अनुभवही घेतला आहे.
विशेष म्हणजे, १९९० च्या दशकात चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे अनेक वर्षांनंतर त्यांचे पुन्हा चिपळूणमध्ये आगमन होत असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुण खेळाडूंना सुनील मोरे यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूला प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.



















