पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप
पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ५) शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून रूट मार्च काढला होता. मात्र, या बंदोबस्तानंतर अवघ्या दोन तासांतच पुण्याच्या नाना पेठ परिसरात टोळीयुद्ध उफाळले आणि रक्तरंजित थरार घडला. आंदेकर टोळी व कोमकर गटातील वर्चस्वाच्या संघर्षातून आयुष कोमकर (Ayush Komkar) याची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकर (Ganesh Komkar) याचा मुलगा आयुष याच्यावर शुक्रवारी संध्याकाळी पार्किंगमध्ये घात झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी एक्सवर लिहिलं – “लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो. एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून रक्तरंजित होळी खेळली जाते. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय. अशा परिस्थितीत लोक विचारत आहेत — कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’?” नेमकं काय आहे प्रकरण? १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा वर्चस्वाच्या वादातून खून झाला. आंदेकर टोळी बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. आंबेगाव पठार भागात टोळी रेकी करत असल्याचं समोर आलं होतं, मात्र कारवाई असूनही हल्ला शहराच्या मध्यवर्ती भागातच घडला.