konkandhara.com

मुख्य लढती

मुंबई महापालिका निवडणूक: मतमोजणी 16 जानेवारीला

मुंबई | १५ जानेवारी २०२६ :बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 अंतर्गत आज, गुरुवार १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या २३ मतमोजणी केंद्रांवर पार पडणार असून, त्यासाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 227 प्रभागांसाठी 23 निवडणूक निर्णय अधिकारी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता २३ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र अभिरक्षा कक्ष (Strong Room) आणि मतमोजणी कक्ष निश्चित करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि पोलिस विभागाकडून आवश्यक ती अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन अंतिम नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त मतमोजणीदरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबई पोलिसांशी विशेष समन्वय साधण्यात आला आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा उपाय राबवण्यात येणार आहेत. तसेच मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था आणि जमाव नियंत्रणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. 2,299 अधिकारी-कर्मचारी मतमोजणीत सहभागी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण अशा एकूण २,२९९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मतमोजणीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले असून, अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. मतमोजणी केंद्रांचे तपशील (संक्षेप) मुंबईतील आर, पी, के, एच, टी, एस, एन, एम, एल, एफ, जी, डी, ई, बी आणि ए विभागांतील प्रभागांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.यामध्ये दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, सांताक्रुझ, मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, सायन, दादर, वरळी, गिरगाव, भायखळा आदी परिसरांचा समावेश आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत. माध्यमांसाठी स्वतंत्र व्यवस्था मतमोजणी प्रक्रियेचे वार्तांकन सुरळीत व्हावे यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. अधिकृत निकाल जाहीर होताच त्याची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे अद्ययावत केली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकीचा निकाल उद्या, १६ जानेवारी २०२६ रोजी स्पष्ट होणार असून, मुंबईच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा हा दिवस ठरणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया किती शांत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

मुंबई महापालिका निवडणूक: मतमोजणी 16 जानेवारीला Read More »

पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची गर्दी आणि एबी फॉर्मसाठी चाललेली राजकीय धावपळ.

महापालिका निवडणुका: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट?

पुणे | 25 डिसेंबर 2025:राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयांबाहेर अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. एबी फॉर्म मिळवण्यासाठी आणि वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार धावपळ करत होते. मात्र या गडबडीत सर्वाधिक चर्चा झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या काही वादग्रस्त उमेदवारांमुळे. दिवसभर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उमेदवारांना बोलावून एबी फॉर्म वाटत असल्याचे चित्र असताना, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना दिलेल्या तिकिटांमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पुण्यात राष्ट्रवादीकडून गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. याचबरोबर आयुष कोमकर हत्याप्रकरणात कारागृहात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनाही उमेदवारी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एवढ्यावरच न थांबता, कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर यानेही प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दीपक मारटकर हत्या प्रकरणात जामीनावर असलेला बापू नायर थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने ‘गुन्हेगारीविरोधी भूमिका’ आणि प्रत्यक्ष राजकारण यातील विसंगती पुन्हा एकदा समोर आली आहे. दीपक मारटकर यांची 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री निर्घृण हत्या झाली होती. दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे पुत्र असलेल्या दीपक यांच्यावर घराबाहेर पडताच पाच ते सहा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार केले होते. पाठीवर, डोक्यावर आणि छातीवर झालेल्या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपास सुरू झाला आणि आरोपींना अटकही करण्यात आली. या प्रकरणात बापू नायरचे नाव पुढे आले होते. 2024 मध्ये तो जामिनावर बाहेर आला असून आता थेट महापालिका निवडणूक लढवत आहे. बापू नायरचा गुन्हेगारी इतिहास दीर्घ आहे. 2011 मध्ये बिबवेवाडी परिसरात वर्चस्वाच्या वादातून गुंड बैजु नवघणे याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात नायर टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती, जरी पुढे त्याची निर्दोष मुक्तता झाली असली तरी परिसरात त्याची दहशत कायम राहिली. बिबवेवाडी, कोंढवा, धनकवडी, सहकारनगर या भागांत खंडणी, मारामारी, खुनाचे प्रयत्न अशा गुन्ह्यांमुळे तो ‘भाई’ म्हणून ओळखला जाऊ लागला. 2015 मध्ये आर्म अ‍ॅक्टखाली त्याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून ‘गुन्हेगारांना सोडणार नाही’ अशी जाहीर वक्तव्ये करणाऱ्या अजित पवारांवर विरोधकांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. “गुंडगिरी संपवण्याच्या घोषणा करणारेच जर निवडणुकांत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळ्यांना तिकीट देत असतील, तर पुणे गुन्हेगारीमुक्त होईल कशी?” असा प्रश्न नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते विचारू लागले आहेत. विशेषतः आंदेकर भगिनींना जेलमधूनच निवडणूक लढवावी लागणार असल्याची शक्यता या चर्चेला अधिक धार देत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, महानगरपालिका निवडणुका या स्थानिक पातळीवरील सत्ता आणि आर्थिक नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळेच अनेक पक्ष ‘जिंकण्याची क्षमता’ या निकषावर उमेदवारी देताना नैतिकतेचा विचार बाजूला ठेवतात. पुण्यासारख्या शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे राजकीय आश्रयाने बळकटीकरण होणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे अजित पवारांची ‘पालकमंत्री’ म्हणून असलेली प्रतिमा देखील प्रश्नांकित होत आहे. एकीकडे कायदा-सुव्यवस्थेवर कडक भूमिका, तर दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना सढळपणे तिकीट—हा विरोधाभास आगामी प्रचारात विरोधकांकडून आक्रमकपणे मांडला जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांचा हा पहिला टप्पाच वादांनी गाजत असताना, मतदार या उमेदवारींकडे कसे पाहतात आणि त्यावर मतदानातून काय संदेश देतात, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

महापालिका निवडणुका: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट? Read More »

अंधेरीतील वॉर्ड 81 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची गर्दी आणि राजकीय संभ्रमाचे दृश्य.

मुंबईत ठाकरे–मनसे युतीची परीक्षा; वॉर्ड 81 मध्ये संभ्रम

मुंबई | 24 डिसेंबर 2025:मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे यांची बहुचर्चित युती प्रत्यक्ष मैदानात उतरताच पहिल्याच टप्प्यात कसोटीला लागली आहे. वरकरणी स्पष्ट वाटणारे जागावाटपाचे आकडे अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी मात्र धूसर झाले आणि काही प्रभागांमध्ये एकाच युतीतील उमेदवार आमने-सामने उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले. या गोंधळाचे सर्वात ठळक प्रतीक ठरलेला वॉर्ड म्हणजे अंधेरीतील क्रमांक 81, जिथे ठाकरे गट आणि मनसेचे अधिकृत उमेदवार एकमेकांविरोधात अर्ज दाखल करून बसले आहेत. मुंबईत युतीचे सूत्र जाहीर झाले तेव्हा शिवसेना ठाकरे गट 163 जागांवर, मनसे 53 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर लढणार, असे स्पष्ट चित्र समोर आले होते. या आकड्यांमुळे युतीत समन्वयाचा संदेश दिला जात होता. मात्र प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेत ‘बैठकांवर बैठकां’चा जो खेळ रंगला, त्यातून काही प्रभागांमध्ये निर्णय अंतिम क्षणापर्यंत बदलत राहिले आणि त्याचा फटका थेट तळागाळातील कार्यकर्त्यांना बसला. वॉर्ड 81 मध्ये ही अस्वस्थता अधिक ठळकपणे दिसून आली. या प्रभागासाठी मनसेकडून शबनम शेख यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. दुपारी उमेदवारीची सूचना मिळाल्यानंतर त्या तयारीला लागल्या. मात्र रात्री उशिरा, साधारण साडेअकराच्या सुमारास, अचानक अर्ज दाखल करू नका, अशी सूचना आल्याने संभ्रम वाढला. दुसरीकडे, याच प्रभागावर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा होता. सकाळ होताच पुन्हा एकदा सूचना बदलल्या आणि शबनम शेख यांनी अर्ज दाखल केला. त्याच वेळी ठाकरे गटाकडून मोहिनी धामणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने युतीतील दोन उमेदवार प्रत्यक्ष समोरासमोर आले. हा प्रसंग केवळ एका वॉर्डपुरता मर्यादित नाही, तर तो युतीतील समन्वयाच्या मर्यादांवर प्रकाश टाकतो. कार्यकर्त्यांमध्ये ‘नक्की कोणासाठी काम करायचं’ हा प्रश्न उभा राहिला आहे. एका बाजूला मनसैनिक आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिक—दोघेही युतीचा भाग असले तरी, प्रभागात दोन वेगवेगळे उमेदवार असल्याने संभ्रम आणि अस्वस्थता वाढताना दिसते. काही कार्यकर्ते माघार होईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत, तर काहींना शेवटपर्यंत ही लढत राहील, अशी भीती वाटते. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर युतीच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ‘मराठी माणूस आणि मुंबई’ हा केंद्रबिंदू ठेवत युतीची घोषणा केली होती. मात्र स्थानिक पातळीवर उमेदवारीचे निर्णय वेळेत आणि स्पष्ट न झाल्यास, हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचण्यात अडथळे येऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अंधेरीतील वॉर्ड 81 मध्ये चित्र आणखी गुंतागुंतीचे बनले आहे कारण याच प्रभागातून भाजपने शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन झाले. शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “केलेल्या कामावर आणि लोकांच्या विश्वासावर विजय मिळेल,” असा दावा मुरजी पटेल यांनी यावेळी केला. त्यामुळे एकीकडे युतीतील संभ्रम आणि दुसरीकडे प्रतिस्पर्ध्यांचे संघटित शक्तिप्रदर्शन, असा दुहेरी दबाव या वॉर्डमध्ये तयार झाला आहे. अशीच परिस्थिती शहरातील इतर काही प्रभागांमध्येही जाणवत आहे. शेवटच्या क्षणी बदललेले निर्णय, अधिकृत उमेदवार आणि प्रत्यक्ष मैदानात उतरलेले चेहरे यातील विसंगती, यामुळे युतीची ‘एकजूट’ कागदावर जितकी स्पष्ट आहे, तितकीच ती जमिनीवर आव्हानात्मक ठरत असल्याचे दिसते. कार्यकर्त्यांची नाराजी, मतदारांचा संभ्रम आणि प्रतिस्पर्ध्यांची संधी—हे सगळे घटक एकत्र येऊन निवडणुकीची रंगत वाढवत आहेत. या साऱ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट ठळकपणे पुढे येते: मुंबईसारख्या महाकाय महानगरात निवडणूक लढवताना केवळ मोठी घोषणा पुरेशी नसते. प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा समन्वय महत्त्वाचा ठरतो. वॉर्ड 81 मधील आजची परिस्थिती ही युतीसमोरील इशाराच आहे—निर्णयात स्पष्टता आणि वेळेवर हस्तक्षेप नसेल, तर गोंधळच राजकीय कथानक ठरू शकतो. येत्या काही दिवसांत माघारीच्या सूचना येतात की थेट लढत रंगते, यावरच ठाकरे–मनसे युतीची पहिली कसोटी कशी पार पडते, याचे उत्तर मिळेल. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

मुंबईत ठाकरे–मनसे युतीची परीक्षा; वॉर्ड 81 मध्ये संभ्रम Read More »

नागपूरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचे आंदोलन, घोषणाबाजी आणि उमेदवार यादी जाळतानाचे दृश्य.

नागपूर महापालिका: युतीत धुसफूस, शिवसेनेची उघड बंडखोरी

नागपूर | 24 डिसेंबर 2025:नागपूर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच, महायुतीतील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला. वरकरणी एकत्र दिसणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीत, जागावाटपाचा मुद्दा आता उघड संघर्षात बदलला असून, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच बंडखोरीचे निशाण फडकताना दिसत आहे. नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती जरी जाहीर असली, तरी स्थानिक पातळीवर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपताच हा असंतोष रस्त्यावर उतरला. धंतोली परिसरातील पूर्व विदर्भ विभागीय कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. “देना होगा जवाब, देना होगा जवाब” आणि “आशिष जयस्वाल मुर्दाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि महायुतीतील तणावाचे दृश्य सर्वांसमोर आले. या संतापामागे जागावाटपाची कडू गणिते आहेत. नागपूर महापालिकेसाठी शिवसेनेने सुरुवातीला सन्मानजनक प्रतिनिधित्व म्हणून किमान 25 जागांची मागणी केली होती. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला आपल्या संघटनात्मक ताकदीवर आणि गेल्या काही वर्षांच्या कामगिरीवर विश्वास होता. मात्र अंतिम जागावाटप जाहीर होताच, शिवसेनेच्या वाट्याला केवळ आठच जागा आल्याचे स्पष्ट झाले. हा आकडा समोर येताच कार्यकर्त्यांचा संयम सुटला. “हक्काच्या जागा भाजपच्या पदरात टाकल्या गेल्या,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये खोलवर रुजली. या नाराजीने केवळ घोषणाबाजीवरच थांबणं मान्य केलं नाही. संतप्त कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीरपणे जाळत निषेध नोंदवला. “आमची शिवसेना भाजपाला विकून टाकली,” असा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. ही दृश्ये नागपूरच्या राजकीय इतिहासात दुर्मिळ मानली जात असून, युतीतील अंतर्गत अस्वस्थता किती तीव्र आहे, याचं प्रतीक ठरली आहेत. या सगळ्या घडामोडींमागे दिग्गज नेत्यांचा दबाव असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. नागपूर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला मानलं जातं. या बलाढ्य नेतृत्वासमोर शिवसेनेचं स्थानिक नेतृत्व हतबल झालं आणि त्यांच्या दबावाखाली पक्षाने माघार घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी उघडपणे केला. “आपली ताकद असतानाही नेत्यांनी भाजपसमोर शरणागती पत्करली,” अशी खंत अनेक शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. या नाराजीचे पडसाद आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उमटताना दिसत आहेत. संतप्त झालेल्या अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी काही प्रभागांमध्ये बंडखोरी करत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाने दिलेली अधिकृत उमेदवारी नाकारून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार या बंडखोरांनी व्यक्त केला आहे. प्रचाराच्या काळात “अन्यायाचा मुद्दा” मतदारांपर्यंत नेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. या बंडखोरीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. एकीकडे विरोधक असलेले ठाकरे गट, काँग्रेस आणि इतर पक्ष, तर दुसरीकडे युतीतीलच नाराज कार्यकर्ते—अशा दुहेरी आघाडीवर लढावं लागण्याची शक्यता भाजप–शिवसेना उमेदवारांसमोर निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मतविभाजन होणार की बंडखोर शेवटच्या क्षणी माघार घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. नागपूरच्या मतदारांसाठीही ही परिस्थिती नव्या प्रश्नांना जन्म देणारी आहे. एकीकडे विकास, पायाभूत सुविधा आणि शहराच्या भविष्यासंबंधी मुद्दे असताना, दुसरीकडे पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र उभे राहत आहे. मतदार कोणत्या बाजूला झुकतात, हे येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होईल. या सगळ्या घडामोडी पाहता, नागपूर महापालिका निवडणूक केवळ सत्तेसाठीची लढाई राहिलेली नाही. ती युतीतील विश्वास, स्थानिक नेतृत्वाचा आत्मसन्मान आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेची कसोटी ठरली आहे. निवडणूक जवळ येत असताना, ही धुसफूस शांत होते की आणखी तीव्र होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

नागपूर महापालिका: युतीत धुसफूस, शिवसेनेची उघड बंडखोरी Read More »

केडीएमसीत भाजपचे खाते उघडले: प्रभाग 18(अ) बिनविरोध

कल्याण–डोंबिवली | 24 डिसेंबर 2025:कल्याण–डोंबिवली महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस संपत असतानाच राजकीय वातावरणात एक अनपेक्षित वळण आलं. दुपारपर्यंत अर्ज सादर झाल्यानंतर ‘कोण विरुद्ध कोण’ हे चित्र स्पष्ट होणार होतं; मात्र प्रभाग क्रमांक 18(अ) मध्ये जे घडलं, त्याने अनेकांना चकीत केलं आणि काहींना बुचकळ्यात टाकलं. या प्रभागात चक्क भाजपच्या उमेदवाराविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. परिणामी, भाजपचा उमेदवार आपोआप बिनविरोध निवडून आला असून त्याची अधिकृत घोषणा अर्ज छाननीनंतर केली जाणार आहे. यामुळे Kalyan Dombivli Municipal Corporation मध्ये भाजपने आपले खाते उघडल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रभाग 18(अ) ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव होती. या जागेसाठी Bharatiya Janata Party ने आधीच तयारी करून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानुसार रेखा राजन चौधरी यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात ठाकरे गट–मनसे युती किंवा काँग्रेस–वंचित आघाडीकडून उमेदवार येईल, अशी अपेक्षा होती; मात्र शेवटच्या क्षणापर्यंत एकही अर्ज समोर आला नाही. अर्ज दाखल करण्याच्या वेळेआधी निवडणूक कार्यालयाबाहेरची हालचाल पाहणाऱ्यांसाठी हा प्रसंग आश्चर्याचा ठरला. अन्य प्रभागांमध्ये उमेदवारी अर्जांची गर्दी, कार्यकर्त्यांची धावपळ आणि चर्चांचा गोंधळ दिसत असताना, 18(अ) मध्ये मात्र शांतता होती. ही शांतता निकालाची चाहूल देणारी ठरली. विरोधकांचा अर्जच नसल्याने भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बुधवारी होणाऱ्या अर्ज छाननीनंतर या निवडीची औपचारिक घोषणा केली जाईल; म्हणजेच प्रचार, मतदान आणि मतमोजणी यांचा टप्पा गाठण्यापूर्वीच या प्रभागाचा निकाल लागणार आहे. या घटनेमुळे केडीएमसीतील निवडणुकीची सुरुवातच वेगळ्या सूरात झाली आहे. राज्यातील महापालिकांमधील हा पहिला अधिकृत निकाल ठरण्याची शक्यता असून, त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. भाजप–शिवसेना यांची युती केडीएमसीत असली, तरी प्रभाग 18(अ) मधील ही घडामोड भाजपसाठी मनोबल वाढवणारी मानली जात आहे. ‘ना प्रचार, ना निवडणूक’ अशा स्थितीत मिळालेला हा विजय पक्षाच्या रणनीतीचा परिणाम असल्याचं भाजप कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. दुसरीकडे, विरोधकांच्या गोटात या बिनविरोध निवडीबाबत आश्चर्य आणि प्रश्न उपस्थित होत आहेत. कल्याण–डोंबिवलीसारख्या मोठ्या महापालिकेत एका प्रभागात विरोधकांना उमेदवारच मिळू नये, ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. काही जण यामागे स्थानिक समन्वयाचा अभाव, वेळेवर निर्णय न होणं किंवा प्रभागातील समीकरणे चुकल्याचं कारण देत आहेत. तर काहींना हा विरोधकांच्या संघटनात्मक कमकुवततेचा इशारा वाटतो. केडीएमसीत एकूण चित्र मात्र चुरशीचंच राहणार असल्याचं संकेत आहेत. भाजप–शिवसेना युतीसमोर ठाकरे गट–मनसे युती उभी असून काँग्रेस आणि वंचित आघाडीही स्वतंत्रपणे मैदानात आहेत. बहुतांश प्रभागांमध्ये थेट लढती अपेक्षित असताना, 18(अ) मधील हा अपवाद निवडणुकीच्या कथानकात वेगळं पान जोडतो. या प्रभागातील बिनविरोध निवड इतर प्रभागांतील प्रचारावरही परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये सुरू आहे. स्थानिक मतदारांसाठीही हा प्रसंग नव्या अपेक्षा निर्माण करणारा आहे. प्रतिनिधी बिनविरोध निवडून आल्याने विकासकामांचा वेग, जबाबदारीची जाणीव आणि उत्तरदायित्व अधिक असावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रचाराच्या गदारोळाविना मिळालेल्या या विजयाचा अर्थ पुढील काळात कसा उलगडतो, हे नगरसेवकाच्या कामकाजातूनच स्पष्ट होणार आहे. एकूणच, कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 18(अ) ने सुरुवातीलाच वेगळी छाप पाडली आहे. बिनविरोध निवड हा आकड्यांचा खेळ नसून, तो राजकीय संघटन, वेळेची गणितं आणि स्थानिक वास्तव यांचा संगम असतो—ही बाब या घटनेनं पुन्हा अधोरेखित केली आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

केडीएमसीत भाजपचे खाते उघडले: प्रभाग 18(अ) बिनविरोध Read More »