konkandhara.com

कोकणची बातमी

कोकणात नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम : रोहा तालुक्यात महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम

कोकणात सध्या नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील वर्से गावात काळभैरव ग्रामस्थ मंडळाने नव्याने बांधलेल्या जरीमरी मंदिरात नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नऊ दिवस विविध मनोरंजक स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रम ठेवले होते. त्यात विशेष आकर्षण ठरली पाककला स्पर्धा. या स्पर्धेतून गावातील महिलांची कला आणि परंपरा पुढे आली. या पाककला स्पर्धेत विजेतेपद पटकावून ‘शोध सुगरणीचा’ हा मान राणी म्हात्रे यांना मिळाला. मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात ग्रामस्थ, महिला व तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. वर्से गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे गावातील महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि नवरात्रोत्सवाचा आनंद अधिकच वाढतो. पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा उत्सव महिलांच्या सहभागामुळे अधिक रंगतदार झाला आहे.

कोकणात नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम : रोहा तालुक्यात महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम Read More »

“दुष्काळानं होरपळलेला मराठवाडा आता पूरानं डुबला! हजारो कुटुंबं बेघर

मराठवाड्यातील पूरस्थिती – लोकांचे आयुष्य विस्कळीत, प्रशासनाची धडपड मराठवाड्यातील मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांत अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण केली आहे. नद्या तुडुंब भरून वाहत आहेत, शेतं पाण्याखाली गेली आहेत आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या नैसर्गिक संकटामुळे हजारो कुटुंबं विस्थापित झाली आहेत. प्रशासन मदतकार्य राबवत असलं तरी जनतेच्या डोळ्यांत चिंता आणि अनिश्चिततेचं सावट स्पष्टपणे दिसत आहे. Konkandhara च्या टीमने प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचून या संकटग्रस्त भागाची पाहणी केली. लातूर जिल्ह्यातील किल्लारीच्या बाजूला असलेल्या गावात प्रवेश करताच चिखलाने माखलेले रस्ते, पाण्याने भरलेली शेतं आणि ओसाड झालेली घरे दिसू लागतात. गावाच्या मध्यभागी अजूनही कमरेपर्यंत पाणी साचलेले आहे. घरांची भिंत कोसळलेली, छपरं उखडलेली आणि उरलेसुरले सामान उंचावर ठेवलेलं – हेच दृश्य जवळजवळ प्रत्येक ठिकाणी दिसतंय.लोकं शाळा आणि मंदिरात आसरा घेत बसलेले आहेत. पाण्यातून बाहेर आलेल्या गुरांना बांधण्यासाठी जागा नाही. मुलं भिजलेल्या वहीपुस्तकांकडे पाहून रडताना दिसतात. दरम्यान, मदत पोहोचवणाऱ्या सरकारी गाड्यांची धावपळ सुरू आहे, पण लोकांच्या नजरेत अजूनही हताशपणा आहे. शिवाजी जगदाळे नावाचे शेतकरी डोळ्यांत पाणी आणून सांगतात, “संपूर्ण कापसाचं पीक वाहून गेलं. शेतात पाणीच पाणी आहे. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरलं.”गावातील महिलावर्ग चिंतेत आहे. माया ताई सांगतात, “घरातलं धान्य, कपडे सगळं वाहून गेलं. मुलांना कसं वाढवायचं, उद्या काय खायचं हाच प्रश्न आहे.”तरुण मुलं मात्र मदतकार्यांत पुढाकार घेत आहेत. गाड्या थांबवून लोकांना अन्न व पाणी वाटताना त्यांचं धडपडणं दिसतं.स्थानिक शिक्षक देशमुख सर म्हणाले, “शाळा पाण्याखाली गेल्या. विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जातंय. सरकारनं लगेच पावलं उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होईल.”जवळच्या आरोग्य केंद्रात डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलं की, पूरपाण्यामुळे पाण्यातून पसरणाऱ्या रोगांचा धोका वाढतोय. आधीच डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे रुग्ण वाढू लागलेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मराठवाड्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडला आहे. मंजीरा, मनार, तेरणा अशा नद्यांच्या काठावर असलेल्या गावी पूरस्थिती गंभीर आहे.राज्य सरकारनं आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. १०० पेक्षा जास्त गावं बाधित झाली असून, सुमारे ५०० हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे.एनडीआरएफच्या १२ टीम्स सध्या विविध भागांत कार्यरत आहेत. बचाव व मदतकार्य सुरू असलं तरी काही भागात अजूनही अडकलेले लोक बाहेर काढायचे आहेत.दरवर्षी दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा या वेळी पावसाच्या तडाख्याने हवालदिल झाला आहे. हवामान बदलाचा थेट परिणाम या भागावर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मराठवाड्यातील पूरस्थिती ही केवळ हवामानाच्या अनिश्चिततेचा परिणाम नाही, तर अपुऱ्या नियोजनाचीही देणगी आहे. या भागात जलव्यवस्थापनाची मोठी समस्या आहे. एका बाजूला दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला अचानक येणारा पूर – ही द्विधा स्थिती शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करते.पूरनियंत्रणासाठी जलाशय, बंधारे, नालेसफाई यासारखी कामं वेळेवर न झाल्यामुळे पाणी गावांमध्ये घुसतं. राजकीय नेत्यांनी घोषणाबाजी केली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अपुरी पडते.या आपत्तीचा दीर्घकालीन परिणाम कृषी क्षेत्रावर होणार आहे. पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचं कर्ज वाढेल. बाजारात अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.राजकीय पातळीवरही ही परिस्थिती संवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीतून आंदोलन पेटण्याची भीती आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही, तर याचे परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतात.हवामान बदलाचा धोकाही अधिक गंभीर होताना दिसतोय. यापुढे आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाची नव्याने मांडणी करावी लागेल, अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा होणार. स्थानिक लोकांवर या पूरस्थितीचा थेट आणि तीव्र परिणाम झाला आहे. घरे उद्ध्वस्त झाल्यानं हजारो लोक बेघर झाले आहेत. शेतकऱ्यांचं पीक वाहून गेल्यानं त्यांचं संपूर्ण वर्ष आर्थिक संकटात गेलं आहे.लहान मुलांचं शिक्षण बिघडलं आहे, शाळा बंद आहेत. आरोग्य सेवांवर ताण वाढलाय. महिलांना अन्न, पाणी, सुरक्षित निवारा यांचा प्रचंड अभाव जाणवतोय.गावोगाव लोकं आता सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलेली आहेत. मदत पोहोचली तरी ती सर्वांना समान प्रमाणात मिळत नाही, अशी लोकांची तक्रार आहे.Konkandhara च्या वाचकांसाठी या घटनेतून शिकण्यासारखं म्हणजे – हवामान बदल आता फक्त आंतरराष्ट्रीय चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या दारात ठोठावत आहे. मराठवाड्यासारख्या भागांत टिकाऊ जलव्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापनाची गरज आता टाळता येणार नाही. मराठवाड्यातील पूरस्थिती ही एक नैसर्गिक आपत्ती असली तरी तिच्या पाठीमागे मानवनिर्मित निष्काळजीपणाही दिसून येतो. शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, हजारो कुटुंबं विस्थापित झाली, तर संपूर्ण समाजावर अनिश्चिततेचं सावट आलं आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी सरकार, प्रशासन आणि स्थानिक जनता यांना एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे.

“दुष्काळानं होरपळलेला मराठवाडा आता पूरानं डुबला! हजारो कुटुंबं बेघर Read More »

कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम

कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मुंबई/कर्जत — कर्जत विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाला दिलेले आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत मिळवलेला थोरवे यांचा विजय कायम राहिला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने जल्लोष साजरा केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (महायुती) उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केवळ 5,700 मतांच्या अल्पाधिक्याने विजय मिळवला होता. पराभूत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी निकालाला आव्हान देत, “थोरवे यांनी डमी उमेदवार उभा करून निवडणूक प्रक्रियेत फेरफार केला” असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सहा महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. मात्र अखेरीस न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने सुधाकर घारे यांचा अपेक्षाभंग झाला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनात घारे यांना मताधिक्य असल्याचे वक्तव्य पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे या दाव्याचे वजन कमी झाले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर कर्जत व खालापूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की या निकालाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच सुमारे 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर दिसून येण्याची शक्यता आहे. यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट झाली असून, आमदार महेंद्र थोरवे यांचा राजकीय प्रभाव आगामी काळात आणखी दृढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम Read More »

माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त

माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त; तीन जणांना अटक, ₹3.80 लाख जप्त रायगड — जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे मोठे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तपासून कारवाई केली आणि तिघांना अटक केली आहे. सध्या पोलिसांनी सुमारे ₹3,80,000 मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत; हा आकडा पुढे वाढण्याची शक्यता अधिक आहे. तपासात समोर आले की, माणगाव टेमपाले येथील मुफस्सिर उर्फ़ मिनी अब्दुल राशिद खानदेशी यांच्या घरातून बनावट नोटा साठवण्यात आढळल्या. तसेच म्हसळा तालुक्यातील निगडीपाब रे येथील सुनील बाळाराम मोरे व मेहबुब उलडे (राहणार: बोर्लीपंचतन, ता. श्रीवर्धन) हे ही या रॅकेटशी संबधित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी (20 सप्टेंबर) पोलिसांनी पहिली कारवाई केली. त्यानंतर फरार झालेला मेहबुब उलडे सोमवारी रात्री दिघी येथून ताब्यात घेण्यात आला. चौकशीत बंदोबस्तात असे आढळले की, आरोपी वीस, पन्नास आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या बाजारात मिसळण्याचा प्रयत्न करत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकरण चर्चेत आले होते आणि काही व्यापाऱ्यांनीही बनावट नोटांमुळे फसवणुकीची तक्रार नोंदवली असल्याचे समोर आले आहे. बनावट नोटा खर्‍या नोटांसारख्या दिसत असल्याने सामान्य नागरिक गोंधळले गेले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी संपूर्ण साखळीचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की संशयास्पद नोटा त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात जमा कराव्यात. गोरेगाव पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा सध्या रॅकेटची उर्वरित साखळी उघड करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त Read More »

ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप घोटाळ्यात १९ कोटींचा भांडाफोड

रायगड सायबर सेलची मोठी कारवाई; ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप घोटाळ्यात १९ कोटींचा भांडाफोड रायगड : ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा रायगड सायबर सेलने मोठा भांडाफोड केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 44 म्यूल बँक खाती गोठवली असून, तब्बल 19 कोटी 44 लाख 34 हजार रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी राजस्थानमधील भारमल हनुमान मिना याला अटक करण्यात आली आहे. अलिबागच्या चेंढरे येथे राहणारे अमित जाधव यांना एम-999, मधूर मार्केट, लकी स्पिन यांसह तब्बल 26 अ‍ॅप्समधून संदेश येत होते. गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप्स उपलब्ध असल्याने ते कायदेशीर आहेत असा समज झाल्याने त्यांनी पैसे गुंतवले. मात्र काही दिवसांतच त्यांना परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. सायबर सेलच्या तपासात हा गुन्हा राजस्थानपर्यंत पोहोचला. भारमल मिना याने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने खाती उघडून त्याद्वारे फसवणुकीचे पैसे जमा केले होते. दररोज लाखो रुपयांचे कमिशन या पद्धतीने मिळत असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या तपासात या रॅकेटमध्ये दोन मोठ्या बँकांचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. उदाहरणादाखल, एका मोबाईल शॉप मालकाच्या खात्यात 2 महिन्यांत तब्बल 56 कोटी रुपयांचा व्यवहार, तर एका गृहीणीच्या खात्यात 114 कोटींचा व्यवहार झाल्याचे आढळले. आणखी एका नागरिकाच्या खात्यात 186 कोटींचे व्यवहार झाले होते. या प्रकरणातील प्रमुख Parimatch Gaming App चा तपास एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ED) करत असून, आतापर्यंत 55 म्यूल खात्यांतील 3 हजार कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रिजवान नदाफ, सहायक पोलीस निरीक्षक अमोल जाधव, तसेच सहायक पोलीस अजय मोहिते व पथकातील अधिकारी यांच्यासह ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणातील आणखी किमान पाच जणांचा शोध घेतला जात आहे.

ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप घोटाळ्यात १९ कोटींचा भांडाफोड Read More »

अलिबागमध्ये बेकायदेशीर रेंटल बाईकवर रिक्षाचालक आक्रमक

अलिबाग : पर्यटन नगरी अलिबागमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर रेंटल बाईक व्यवसायामुळे स्थानिक परवानाधारक रिक्षाचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांनी अलिबाग पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या रेंटल बाईकवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिक्षाचालकांच्या मते, शहरात केवळ दोन परवानाधारकांना 10 ते 12 बाईक भाड्याने देण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात हेच परवानाधारक 40 ते 50 बाईक रस्त्यावर सोडत आहेत. तसेच अनेकजण कोणतेही परवाने न घेता बेकायदेशीरपणे रेंटल बाईकचा धंदा सुरू ठेवत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अलिबागमधील पारंपरिक रिक्षा व्यवसायावर संकट ओढावले असून, अनेक रिक्षाचालक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनासाठी माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे आणि शेकाप तालुका प्रमुख सुरेश घरत यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालक प्रतिनिधी मंडळाने अधीक्षक आँचल दलाल तसेच पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना निवेदन दिले. या वेळी अलिबाग ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अफजल सय्यद, अमीन मुल्ला, पप्पू पडावे, शरद राऊत, स्वप्नील नाईक, मन्सूर आगा आणि संदीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनात रिक्षाचालक संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर बेकायदेशीर रेंटल बाईकवर तातडीने कारवाई झाली नाही तर पुढील काळात मोठं आंदोलन छेडलं जाईल.

अलिबागमध्ये बेकायदेशीर रेंटल बाईकवर रिक्षाचालक आक्रमक Read More »

पनवेल तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन

सीएम फडणवीस यांच्या हस्ते सन्मान नवेल तालुका पोलीस ठाण्याच्या स्मार्ट वर्क, सुयोग्य व्यवस्थापन आणि उत्तम कामगिरीला मोठी दाद मिळाली आहे. या ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत खारपाडा टोल नाका ते वावंजे, धोदानी, शिरवली व खालापूर तालुका सीमेपर्यंतचा मोठा भाग येतो. या भागात नवनवीन गृहनिर्माण संकुलांसह ग्रामीण परिसरही आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी तालुका पोलिसांवर असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हे कर्तव्य प्रभावीपणे बजावण्यात आले. या ठाण्यात प्रशस्त इमारत, स्वच्छता, पासपोर्ट, बारानिशी, वायरलेस, स्टेशन डायरी यांसाठी स्वतंत्र खोल्या, महिला-पुरुष आरोपींसाठी कोठडी, संगणक, इंटरनेट, वायफाय, कॅमेरे, पिण्याचे पाणी अशा सुविधा उपलब्ध आहेत. दाखल गुन्ह्यांचे अन्वेषण व प्रकटीकरणाचे प्रमाण समाधानकारक आहे. गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण करण्यातही यश मिळाले आहे. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, तत्पर कामकाज, सायबर क्राईम नियंत्रण, प्रशिक्षित पोलिस दल, नागरिकांचा अभिप्राय, सुरक्षा निकष अशा 37 मुद्द्यांवर पनवेल तालुका पोलीस ठाणे पात्र ठरले आहे. नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी सीएम फडणवीस यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले उपस्थित होते. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक घाडगे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन Read More »

नवरात्रोत्सवात सुगरणीचा शोध!

नवरात्रोत्सवात सुगरणीचा शोध! रोहाच्या वर्से गावात महिलांसाठी खास उपक्रम, राणी म्हात्रे सन्मानित कोकणात सध्या नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील वर्से गावात काळभैरव ग्रामस्थ मंडळाने नव्याने बांधलेल्या जरीमरी मंदिरात नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नऊ दिवस विविध मनोरंजक स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रम ठेवले होते. त्यात विशेष आकर्षण ठरली पाककला स्पर्धा. या स्पर्धेतून गावातील महिलांची कला आणि परंपरा पुढे आली. या पाककला स्पर्धेत विजेतेपद पटकावून ‘शोध सुगरणीचा’ हा मान राणी म्हात्रे यांना मिळाला. मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात ग्रामस्थ, महिला व तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. वर्से गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे गावातील महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि नवरात्रोत्सवाचा आनंद अधिकच वाढतो. पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा उत्सव महिलांच्या सहभागामुळे अधिक रंगतदार झाला आहे.

नवरात्रोत्सवात सुगरणीचा शोध! Read More »

रत्नागिरीत आईनेच आठ महिन्यांच्या मुलीची हत्या; पोलिस तपास सुरू

रत्नागिरी, कारवांचीवाडी पारसनगर येथे एका आईने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतक बालिकेचे नाव हुरेन आसिफ नाईक असून, तिचा मृतदेह रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. ही घटना रत्नागिरी तालुक्यासह शहरात खळबळ उडवणारी ठरली आहे. घटनेच्या तपशीलानुसार, रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील या तरुणीचा विवाह चिपळूणजवळील गावातील तरुणाशी झाला होता. या दाम्पत्याला आधीच चार वर्षांची एक मुलगी आहे. पती कामानिमित्त परदेशात असल्याने महिला आपल्या माहेरी, कारवांचीवाडी येथे राहत होती. महिलेवर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी तिची बहीण बाहेर गेली असताना, आरोपीने आठ महिन्यांच्या हुरेनच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबल्याने बाळाचा गुदमरण झाला. ही घटना शेजाऱ्यांना उघडकीस आली आणि त्यांनी तातडीने बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. ग्रामीण पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आईने असे कृत्य का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

रत्नागिरीत आईनेच आठ महिन्यांच्या मुलीची हत्या; पोलिस तपास सुरू Read More »

यवतमाळनंतर चिपळूणमध्येही TWJ कंपनीचा मोठा घोटाळा! 28 लाख 50 हजारांची भावंडांची फसवणूक

रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील 39 लाखांच्या फसवणुकीनंतर आता चिपळूणमध्येही ट्रेड विथ जॅझ (TWJ) कंपनीच्या फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण शहरातील भावंडांची तब्बल 28 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कंपनीच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण शहरातील इंटक भवन येथे असलेल्या TWJ कंपनीच्या कार्यालयातून हा सगळा कारभार चालत होता. आरोपी समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांनी स्वत:ला कंपनीचे प्रतिनिधी सांगत प्रतिक दिलीप माटे आणि त्यांची बहीण तृप्ती दिलीप माटे यांचा विश्वास संपादन केला. महिन्याला 3 ते 4 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी प्रतिक माटे यांच्याकडून 3.5 लाख आणि त्यांच्या बहिणीकडून 25 लाख रुपये गुंतवून घेतले. जानेवारी 2023 पासून आजपर्यंत या दोघांनी मिळून 28.5 लाख रुपये गुंतवले. मात्र, मे 2025 नंतर कंपनीने कोणताही परतावा दिला नाही. वारंवार मागणी करूनही मूळ रक्कमही न परतवल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रतिक माटे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, TWJ कंपनीने गुंतवणूकदारांना सुरुवातीला मोठा नफा दाखवून आकर्षित केले होते. एका लाख रुपयांवर महिन्याला 7 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात होते. हळूहळू हा दर 6, 5, 4 आणि 3 टक्क्यांपर्यंत कमी झाला. काही गुंतवणूकदारांनी सुरुवातीला दामदुप्पट नफा घेतला, त्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि गुंतवणुकीचा ओघ वाढत गेला. पुढे कंपनीने गुंतवणूक थांबवली आणि फसवणूक उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी अशा हाय-प्रोफाईल लोकांकडून करोडो रुपये गोळा केले असून, हा गैरव्यवहार तब्बल 1000 ते 1200 कोटी रुपयांचा असल्याची चर्चा आहे. कंपनीकडे इव्हेंट, इन्फ्रा, हॉस्पिटॅलिटी, लर्निंग, लॉजिस्टीक अशा विविध उपकंपन्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अवास्तव आमिषांना बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच गुंतवणूक करावी.

यवतमाळनंतर चिपळूणमध्येही TWJ कंपनीचा मोठा घोटाळा! 28 लाख 50 हजारांची भावंडांची फसवणूक Read More »