konkandhara.com

Editorial

चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ कोटी ८५ लाखांहून अधिक वसुली

चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ कोटी ८५ लाखांहून अधिक वसुली

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथील जिल्हा न्यायालयात शनिवार, दि. १४ मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीत प्रलंबित व वादपूर्व अशा विविध प्रकरणांचा निकाल लागून एकूण ३ कोटी ८५ लाखांहून अधिक रक्कमेची तडजोड व वसुली करण्यात आली. या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व तालुका विधी सेवा समितीकडील ७४० प्रलंबित प्रकरणे तसेच १ हजार ३१२ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ७४० प्रलंबित प्रकरणांपैकी १०७ प्रकरणे निकाली निघाली असून, दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये एकूण ३ कोटी ५० लाख १० हजार ५२१ रुपयांची तडजोड झाली. तसेच वादपूर्व प्रकरणांपैकी ५० प्रकरणे निकाली निघून ३५ लाख ११ हजार ८ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. त्यामुळे पक्षकारांचा वेळ व खर्च वाचला.विशेष म्हणजे, चिपळूण जिल्हा न्यायालयाने गेल्या अडीच वर्षांत सलग ११ राष्ट्रीय लोकअदालतींमधून तब्बल २४ कोटीहून अधिक रक्कमेची वसुली केली असून ही बाब उल्लेखनीय ठरली आहे.ही लोकअदालत जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये विविध बँका, पतसंस्था, महावितरण, इतर वित्तीय संस्था, नुकसान भरपाई अर्ज, कौटुंबिक हिंसाचार व पोटगीसंबंधित प्रकरणांचा समावेश होता. लोकअदालतीसाठी न्यायाधीश व वकीलांचे तीन पॅनेल कार्यरत होते. या प्रक्रियेत जिल्हा न्यायालय-१ चिपळूणच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, दिवाणी न्यायाधीश के. ए. पोवार, सह दिवाणी न्यायाधीश वाय. सी. पाटील तसेच पॅनल विधीज्ञ एन. एस. सावंत, एन. जी. लाड आणि सौ. एन. यू. पवार यांनी कामकाज पाहिले. लोकअदालतीत पक्षकार व वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच चिपळूण वकील संघ, जेष्ठ विधीज्ञ, सरकारी वकील, पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याबद्दल तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा डॉ. अनिता नेवसे यांनी सर्वांचे आभार मानले.

चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ कोटी ८५ लाखांहून अधिक वसुली Read More »

पालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी घाबरू नये वाशिष्ठी पाण्याबाबत अफवा; नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नागरिकांना दिलासा दिला.

पालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा, नागरिकांनी घाबरू नये, वाशिष्ठी अहवालाबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे आवाहन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या पाण्याबाबत विविध चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर पालिकेकडून नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीच पुरवले जात असून नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे. नगराध्यक्ष सकपाळ यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वाशिष्ठी नदीचे पाणी प्रदूषित असल्याबाबत कोणताही अधिकृत अहवाल नगर पालिकेकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अशा चर्चांमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. चिपळूण नगर पालिका जॅकवेलच्या माध्यमातून नदीतून पाणी उचलते. त्यानंतर त्या पाण्यावर अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रक्रियेद्वारे आवश्यक सर्व टप्प्यांमध्ये प्रक्रिया केली जाते. फिल्ट्रेशन, क्लोरीनेशनसह विविध तांत्रिक प्रक्रियेनंतरच हे पाणी नागरिकांना पुरवले जाते. त्यामुळे नागरिकांना मिळणारे पाणी पूर्णपणे सुरक्षित आणि पिण्यायोग्य असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. तसेच, “मी स्वतः जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात आहे,” असेही सकपाळ यांनी सांगितले. शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा नियमितपणे तपासली जात असून, पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सातत्याने केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता निर्धास्त राहावे, असे आवाहनही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.

पालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा, नागरिकांनी घाबरू नये, वाशिष्ठी अहवालाबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे आवाहन Read More »

रत्नागिरीत गॅस एजन्सीत गैरप्रकार उघड; गोडावून कीपरकडून ५ व्यावसायिक सिलिंडरची अवैध विक्री

रत्नागिरीत गॅस एजन्सीत गैरप्रकार उघड; गोडावून कीपरकडून ५ व्यावसायिक सिलिंडरची अवैध विक्री

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : शहरातील एका गॅस एजन्सीत गोडावून कीपरने पाच व्यावसायिक गॅस सिलिंडरची परस्पर अवैध विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित एजन्सीकडून जिल्हा प्रशासन तसेच शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, यापैकी चार सिलिंडर परत मिळवण्यात आले आहेत.सध्या देशातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी व्यावसायिक सिलिंडरच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच व्यावसायिक सिलिंडर पुरवण्यास परवानगी आहे. रत्नागिरी शहरातील संबंधित गॅस एजन्सीकडे २४ व्यावसायिक सिलिंडरचा साठा उपलब्ध होता. मात्र, गोडावून कीपरने एजन्सी व्यवस्थापकांना कोणतीही माहिती न देता त्यापैकी पाच सिलिंडरची अवैध विक्री केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच एजन्सीकडून तातडीने कारवाई करण्यात आली आणि चार सिलिंडर परत मिळवण्यात यश आले. या प्रकरणी एजन्सीच्या व्यवस्थापक प्रीती राज यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे तसेच शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पुढील तपास सुरू आहे.

रत्नागिरीत गॅस एजन्सीत गैरप्रकार उघड; गोडावून कीपरकडून ५ व्यावसायिक सिलिंडरची अवैध विक्री Read More »

konkandhara 37 1

राजापूरात गुरांची क्रूर वाहतूक उघड; टेम्पोसह चालक ताब्यात, तिघांवर गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधाराराजापूर : तालुक्यात गुरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गावरील नेरकेवाडी येथे करण्यात आली.याबाबतची फिर्याद अक्षय सुनिल घुमे (रा. बंगालवाडी, ता. राजापूर) यांनी दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत महादेव कुर्ले (रा. कोंढेतड, ता. राजापूर), तबरेज चांदमियाँ ठाकूर (रा. परटवली, ता. राजापूर) आणि एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता आरोपी क्रमांक १ हा आपल्या ताब्यातील महिंद्रा मॅक्सिमो (क्र. एमएच ०४ एफडी २४१६) या वाहनातून तीन गोवंश जनावरांची वाहतूक करत होता. या जनावरांना पाणी व खाद्य न देता, दोरीने घट्ट बांधून वेदना होईल अशा पद्धतीने हौद्यात कोंबून कत्तलीसाठी पाठविण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणी प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०, प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांचे परिवहन नियम १९७८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सायंकाळी ६.२४ वाजता नोंदविण्यात आला. पोलिसांनी कारवाईदरम्यान एक महिंद्रा मॅक्सिमो वाहन व तीन गोवंश जनावरे असा एकूण सुमारे ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

राजापूरात गुरांची क्रूर वाहतूक उघड; टेम्पोसह चालक ताब्यात, तिघांवर गुन्हा Read More »

konkandhara 36 1

फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीचा गैरफायदा; अश्लील व्हिडिओ प्रकरणी तिघांवर गुन्हा, आरोपी अटकेत

प्रतिनिधी : कोकणधारा राजापूर : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी फेसबुकवर ओळख निर्माण करून तिचा गैरफायदा घेत शारीरिक अत्याचार व अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात घडल्याने राजापूर पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करून पुढील तपासासाठी वैभववाडी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणातील तिन्ही संशयितांना वैभववाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीची फेसबुकद्वारे ओंकार सुर्वे (रा. नेर्ले, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याशी ओळख झाली होती. जुलै २०२५ मध्ये ती ओंकार सुर्वे व त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांच्यासोबत वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील धबधबा परिसरात गेली होती. वेळ झाल्याने ती मयूर सुर्वे यांच्या जुन्या घरी नेण्यात आली. त्या ठिकाणी मयूर सुर्वे याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तर ओंकार सुर्वे याने जबरदस्तीने संबंध ठेवले. तसेच तिच्या नकळत मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानंतर दि. १४ मार्च २०२६ रोजी पंकज पवार (रा. ताम्हणे, ता. राजापूर) याने संबंधित मुलीशी संपर्क साधून तो अश्लील व्हिडिओ पाठवत धमकी दिली. “माझी मागणी मान्य केली नाही तर व्हिडिओ व्हायरल करीन,” असे सांगून दबाव टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या बहिणीला संपर्क करून सर्व घटना सांगितली. बहिणीच्या धीरामुळे तिने दि. १५ मार्च रोजी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी बीएनएस कलम ६४(१), ७४, ७९, ३५१(२), पोस्को कायदा कलम ४, ८, १२ तसेच आयटी कायदा कलम ६७, ६७(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळ वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपास तेथे सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीचा गैरफायदा; अश्लील व्हिडिओ प्रकरणी तिघांवर गुन्हा, आरोपी अटकेत Read More »

पाली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व दीक्षाभूमी इमारतीचे लोकार्पण

पाली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व दीक्षाभूमी इमारतीचे लोकार्पण

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. १६ (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे समाजात मार्गदर्शक ठरावेत आणि ते जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच या स्मारकातून भगवान गौतम बुद्धांचे विचार समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात याचा अभ्यासही होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. पाली येथे जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत ३ टक्के वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व दीक्षाभूमी इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, उपसभापती गजानन धनावडे, पंचायत समिती सदस्य पद्मजा कांबळे, समाज कल्याण सहाय्यक दीपक घाटे, पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष व सरपंच विठ्ठल सावंत, सल्लागार एम. बी. कांबळे, जि.प. सदस्य ॲड. सुयोग कांबळे, माजी जि.प. सदस्य रामभाऊ गराटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, भंते कश्यपजी थेरो, संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले होते. तब्बल २३ वर्षांनंतर या स्मारकाच्या इमारतीचे उद्घाटन होत आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानकर्त्याचे हे स्मारक सर्व समाजासाठी असून ते कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसावे. लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या; मात्र त्या केवळ अफवाच ठरल्या. बापजन्मात संविधान कुणीही बदलू शकत नाही. अशी वेळ आलीच तर त्याच्या विरोधात समाजाचे नेतृत्व करण्यास आपण तयार आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी एखादा कार्यकर्ता काम करत असेल तर समाजाने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. ‘विकास हीच माझी जात आणि विकास हाच माझा धर्म’ या भावनेतून आपण काम करत असल्याचे सांगून त्यांनी भविष्यकाळात सर्वांनी एकसंघपणे सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले. आखाती देशांतील लोकही ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ असा संदेश देत आहेत. या स्मारकातून बाबासाहेबांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे समाजाला दिशा देणारे ठरावेत आणि ते जनमानसात रुजावेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळाचे सल्लागार एम. बी. कांबळे यांनी स्मारकाच्या उभारणीविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व दीक्षाभूमी इमारतीचे लोकार्पण Read More »

ऑटोरिक्षा परवान्यासाठी खोटे कागदपत्र सादर केल्यास कारवाई

ऑटोरिक्षा परवान्यासाठी खोटे कागदपत्र सादर केल्यास परवाना निलंबनाची कारवाई – आरटीओ

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. १६ (जिमाका) : ऑटोरिक्षा परवाना मिळवताना खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाईही करण्यात येईल, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे. जिल्ह्यात शासकीय धोरणानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत तीनचाकी, तीन आसनी ऑटोरिक्षा परवाने (परमिट) जारी केले जातात. या परवान्यासाठी अर्जदार सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपनी किंवा संघटित क्षेत्रातील कोणत्याही संस्थेत अथवा उद्योगात नोकरी करत नसावा, अशी अट आहे. यासाठी ऑटोरिक्षा परवाना देताना अर्जदाराकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाते. मात्र, काही अर्जदारांकडून वरील अटींची पूर्तता होत नसतानाही खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून परवाना मिळविल्याच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर कार्यालयामार्फत ५० हून अधिक परवाना निलंबनाच्या अनुषंगाने नोटिसा बजावण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने दोषींवर कारवाई करण्यात येत आहे. ऑटोरिक्षा परवान्यासाठी अर्ज करताना इच्छुकांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णय क्रमांक एमव्हीआर ०८१५/प्र.क्र. ३८७ / परि-२, दिनांक १८ जुलै २०१७ मधील अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

ऑटोरिक्षा परवान्यासाठी खोटे कागदपत्र सादर केल्यास परवाना निलंबनाची कारवाई – आरटीओ Read More »

खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात भीषण आग; ईदच्या तोंडावर कुटुंबाचे मोठे नुकसान

खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात भीषण आग; ईदच्या तोंडावर कुटुंबाचे मोठे नुकसान

प्रतिनिधी : कोकणधारा खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत संबंधित कुटुंबाच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, ऐन ईदच्या तोंडावर संसाराचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक (गटनेते) रहीम सहीबोले, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, आमीर महाडीक तसेच अनेक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. यावेळी भरणे नाका येथील शिरीषकर वॉटर सप्लायर्सचे गणेश शिरीषकर यांनीही आपल्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत अग्निशमन दलाला मोलाची मदत केली. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून काही दिवसांतच ईदचा सण साजरा होणार आहे. अशा आनंदाच्या वातावरणात ही दुर्घटना घडल्याने संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात भीषण आग; ईदच्या तोंडावर कुटुंबाचे मोठे नुकसान Read More »

चिपळूणमध्ये शिवसेना महिला आघाडीतर्फे महिला दिनानिमित्त ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्वप्नाली बांदेकर, श्रुती बागडे व मधुरा नवरत पैठणीच्या मानकरी ठरल्या.

शिवसेना महिला आघाडीचा ‘खेळ पैठणीचा’ उत्साहात | चिपळूण

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने रविवारी सायंकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या माऊली संपर्क कार्यालयात ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चिपळूण शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात स्वप्नाली बांदेकर, श्रुती बागडे आणि मधुरा नवरत या पैठणीच्या मानकरी ठरल्या.कार्यक्रमाची सुरुवात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रश्मीताई गोखले, तालुकाप्रमुख सुप्रियाताई सुर्वे, शहरप्रमुख प्राजक्ता टकले, सुकन्या चव्हाण, शिक्षण व क्रीडा समिती सभापती हर्षाली पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, अंजली कदम, वैशाली कदम, पंचायत समितीच्या माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या पूजाताई निकम, आरतीताई सकपाळ, महिला बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा राणी महाडिक, नगरसेविका नीलम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. ‘खेळ पैठणीचा’ या खेळाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ऐश्वर्या लांडे, प्रतिभा खोत, निकिता शिंदे, विद्या नरळकर, पूनम भोजने यांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ महिलांसाठी घेण्यात आलेल्या खेळांमध्ये मनीषा पाटील प्रथम, अनुसया पानकर द्वितीय, तर अमिता नवरत तृतीय ठरल्या. तसेच खेळादरम्यान काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये गीता कदम, मनीषा नवरत आणि राखी कमलाकर या भाग्यवान ठरल्या. विजेत्या तीन महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता ठोंबरे, विशाखा उत्तेकर, तेजू साटम, दिशा किंजलकर, प्रिया शिंदे, अनामिका हरदारे, अपर्णा पवार, गायत्री जोशी, स्मिता खंदारे, वंदना पाटील, प्रतीक्षा हरवडे, रिया कांबळी, स्नेहा मोरे, अर्चना कारेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सुमारे तीन तास चाललेल्या या ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाने उपस्थित महिलांचे चांगलेच मनोरंजन केले.

शिवसेना महिला आघाडीचा ‘खेळ पैठणीचा’ उत्साहात | चिपळूण Read More »

konkan dhara

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; TWJ चे नार्वेकर दाम्पत्य अटकेत

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टीडब्ल्यूजे (TWJ) कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर व संचालक नेहा समीर नार्वेकर या दाम्पत्याला रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, नार्वेकर दाम्पत्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.टीडब्ल्यूजे कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा ३ ते ४ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेण्यात आली होती. काही काळ परतावा दिल्यानंतर कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर व संचालक नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांना आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ठेकेदार प्रतीक माटे यांना दरमहा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये तसेच त्यांच्या बहिणीकडून २५ लाख रुपये अशी एकूण २८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेत फसवणूक केल्याची तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी नार्वेकर दाम्पत्यासह कंपनीच्या दोन प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेक गुंतवणूकदार पुढे येत असून त्यांनी चिपळूण तसेच रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. गुंतवणूकदारांची संख्या आणि गुंतवणुकीची रक्कम लक्षात घेता या फसवणुकीची व्याप्ती कराडपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात यापूर्वी संकेश घाग याला अटक करण्यात आली आहे. तसेच समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर यांच्यावर राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वी त्यांना ठाणे येथे अटक करण्यात आली होती. चिपळूण शहरातील बायपास मार्गावर टीडब्ल्यूजे कंपनीचे आलिशान कार्यालय असून त्याठिकाणी मोठा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. मात्र फसवणुकीचा प्रकार उघड होताच हे कार्यालय बंद करण्यात आले. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या कार्यालयाची तपासणी करून काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; TWJ चे नार्वेकर दाम्पत्य अटकेत Read More »