konkandhara.com

30 अप्रैल 2026

konkandhara 2026 04 30T163754.020

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत हाणामारी झाली. अंगणात कचरा टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका वृद्ध दांपत्याला लाकडी काठी व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैमुना इस्माईल बोंदले (वय ५२) व आरोपी हे शेजारी असून त्यांच्यात गेल्या काही काळापासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. मात्र, यापूर्वी कोणतीही पोलिस तक्रार करण्यात आली नव्हती. २८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी अर्बिना खान हिने फिर्यादीच्या अंगणात कचरा टाकला. याबाबत जाब विचारल्याने संतप्त होऊन तिने शिवीगाळ करत हातातील दगडाने मैमुना बोंदले यांच्या ओठावर प्रहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी मैमुना यांचे पती इस्माईल बोंदले घटनास्थळी आले असता, इतर सहा आरोपींनी त्यांना घेरले. त्यावेळी मन्सूर अली खान याने लाकडी काठीने इस्माईल यांच्या पाठीवर व डोक्यावर वार केले. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी दांपत्याला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर जखमी मैमुना बोंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अर्बिना खान, मन्सूर अली खान, महिल अझीम खान, जमीर खान, राहिल अझीम खान, शरीफा अली खान आणि शबाना मन्सूर खान या सात जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५१(२), ११५(२), १८९(२), १९१(२), १९० आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा Read More »

konkandhara 2026 04 30T161216.368

चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक अभिजित यादव यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव

चिपळूण : जिल्हा हिवताप कार्यालय, चिपळूण अंतर्गत कार्यरत असलेले चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक तथा प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथील श्री. अभिजित कमलाकर यादव यांची रत्नागिरी जिल्ह्यातून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी रत्नागिरी येथील मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर विष्णू जगताप यांच्या हस्ते श्री. यादव यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कार्य करत राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, चिपळूण तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री. सुनील जानवलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. श्री. अभिजित यादव हे सामाजिक, आरोग्य व सहकार क्षेत्रातही सक्रिय असून महाराष्ट्र राज्य जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना शाखा रत्नागिरी उपाध्यक्ष, जिल्हा हिवताप कर्मचारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी व्हाईस चेअरमन, तालुका आरोग्य समन्वय समिती चिपळूण उपाध्यक्ष, निरंतर वैद्यकीय सेवा संस्था मर्यादित रत्नागिरी (सहकार मेडिकल) उपाध्यक्ष तसेच सूर्यमुखी मारुती मंदिर एमआयडीसी खेर्डी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक अभिजित यादव यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव Read More »

konkandhara 2026 04 30T160009.000

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला असून, एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात अवैध गावठी दारू तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. आज सकाळी सुमारे ७ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान स्वरूपानंद सुभाष कदम (वय ३०, रा. शिळ कदमवाडी) याला संशयास्पद हालचाली करताना पकडले. चौकशीत तो गावठी दारू तयार करत असल्याचे उघड झाले. कारवाईत गूळ, नवसागर मिश्रित रसायन तसेच तयार दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व साहित्य नष्ट करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत पोलीस कर्मचारी दीपक साळवी, राजेंद्र सावंत, अमिता पाटील, उमेश पवार, भालचंद्र मयेकर, अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत Read More »