रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला असून, एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात अवैध गावठी दारू तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.
आज सकाळी सुमारे ७ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान स्वरूपानंद सुभाष कदम (वय ३०, रा. शिळ कदमवाडी) याला संशयास्पद हालचाली करताना पकडले. चौकशीत तो गावठी दारू तयार करत असल्याचे उघड झाले.
कारवाईत गूळ, नवसागर मिश्रित रसायन तसेच तयार दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व साहित्य नष्ट करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोहिमेत पोलीस कर्मचारी दीपक साळवी, राजेंद्र सावंत, अमिता पाटील, उमेश पवार, भालचंद्र मयेकर, अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.


















