konkandhara.com

3 अप्रैल 2026

RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित करण्यात आलेल्या RAIDS App च्या मदतीने नागपूर जिल्हा पोलीसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगलमय परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. संबंधित व्यक्तीची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत असताना नागपूर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी समन्वय साधला. यानंतर RAIDS App च्या सहाय्याने मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण (Photo Reconstruction) करण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेच्या मदतीने अवघ्या २ तासांत मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सदर मृत व्यक्ती ही दौलामेटी, आठवा मैल, नागपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचे उत्कृष्ट उदाहरण ठरली असून, गुन्हे तपास प्रक्रियेला गती देणारी आणि पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेची साक्ष देणारी असल्याचे मानले जात आहे.

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख Read More »

पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा

पीपास रसायनावरून लोटे एमआयडीसीत तणाव; ६ एप्रिलला खेडमध्ये लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात पीपास या घातक रसायनाच्या उत्पादनावरून वातावरण तापले असून या मुद्द्यावरून कोकणात जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. ६ एप्रिल रोजी खेड येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. लोटे एमआयडीसीत कार्यरत असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये पीपास रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. हेच रसायन इटलीमध्ये प्रदूषणाच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या प्रकल्पाशी संबंधित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांमध्ये चिंता वाढली असून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. ६ एप्रिल) खेड येथे मोठा मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वाद वाढत असतानाच लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने पहिल्यांदाच अधिकृत भूमिका मांडली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चिपळूणऐवजी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. कंपनीकडून सांगण्यात आले की, पीपास रसायनाचे उत्पादन करताना सर्व पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे आणि या प्रक्रियेमुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.तसेच, इटलीतील प्रकरणाशी तुलना करणे चुकीचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून स्थानिक नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत माहिती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही कंपनीने नमूद केले.

पीपास रसायनावरून लोटे एमआयडीसीत तणाव; ६ एप्रिलला खेडमध्ये लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा Read More »

konkandhara 75

पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करत असताना गरम मातीच्या संपर्कामुळे भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीतील एच.आर. मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर, मालक आणि व्यवस्थापक अशा चौघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव शकुंतला बबन सोनवणे (वय ४८) असे आहे. ही घटना दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्या वेळी शकुंतला सोनवणे या कंपनीच्या आवारात पडलेले भंगार गोळा करत असताना गरम मातीमुळे त्यांच्या साडीला व हाताला भाजल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, दि. २२ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ललिता चंद्रकांत सोनवणे (सध्या रा. चिपळूण, मूळ रा. पाचगणी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांची चुलत सासू शकुंतला सोनवणे या पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करत असताना दुर्घटनाग्रस्त झाल्या होत्या. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी परिसरातील गरम मातीमुळे अपघात होण्याची शक्यता असूनही संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घेतली नाही, तसेच निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळेच महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पुष्कर कंपनीचे सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप, एच.आर. मॅनेजर सचिव बाळकृष्ण मनवळ (वय ४३, रा. भरणे बाईतवाडी, खेड), रविंद्रकुमार सवरमल भुतिया (वय ५३, रा. बांदल हायस्कूल परिसर, चिपळूण), मालक गौतम मखरिया तसेच व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल Read More »

साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले

साखरपा येथे खासगी आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप

प्रतिनिधी : कोकणधारा संगमेश्वर : साखरपा येथील जाधववाडी जवळ, गद्रे पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास खासगी आराम बसला भीषण आग लागून बस पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ३० प्रवासी सुखरूप बचावले असून मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, चालक गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) हे एनएल ०१, बी २४४२ क्रमांकाची आराम बस पुणे येथून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ३० प्रवाशांना घेऊन रत्नागिरीकडे निघाले होते. आज पहाटे बस साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर आली असता गाडीने अचानक पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने तत्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी.घटनेची माहिती मिळताच देवरूख अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णतः भस्मसात झाली होती. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, हेडकॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली तसेच प्रवाशांना सहकार्य केले.

साखरपा येथे खासगी आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप Read More »

सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

आदर्श जीवनगौरव पुरस्काराने सुभाषराव चव्हाण यांचा सन्मान

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा संस्थेला गेली अनेक वर्षे प्रगतीपथावर नेणारे ज्येष्ठ सहकार नेते आदरणीय श्री. सुभाषराव चव्हाण यांना ‘नवभारत–नवराष्ट्र समूहातर्फे आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या सहकार, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुभाषराव चव्हाण यांनी जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कामकाजाची छाप उमटवली. सेवेत असतानाच त्यांनी सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी आणि लोकहिताचा विचार डोळ्यासमोर ठेवून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी या पतसंस्थेला केवळ चिपळूणपुरते मर्यादित न ठेवता कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागांत नावारूपाला आणले. पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक व्यवहारांच्या पलीकडे जाऊन अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तसेच अनेक युवक-युवतींना स्वावलंबी होण्यासाठी दिशा आणि बळ दिले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाणारे, गरजूंना आधार देणारे आणि सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महापूर आणि कोरोना काळात सुभाषराव चव्हाण यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. विविध सामाजिक उपक्रम, जनहिताचे निर्णय आणि लोककेंद्री कामामुळे त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले कार्य, सहकार क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकी आणि अनेकांना दिलेला आधार याचा सर्वांगीण विचार करून त्यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

आदर्श जीवनगौरव पुरस्काराने सुभाषराव चव्हाण यांचा सन्मान Read More »

रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित

रत्नागिरी नगर परिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत असलेल्या ३१ हजार मालमत्तांपैकी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रशासनाने मोहीम तीव्र केली असून, आर्थिक वर्षअखेरीस थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषदेने ११० मालमत्तांना सील ठोकले, तर ७० नळपाणी जोडण्या तोडल्या आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षासाठी १५ कोटी ८७ लाख ५० हजार ६४८ रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३१ मार्चअखेर ११ कोटी ६२ लाख ७ हजार ८३९ रुपये वसूल करण्यात आले असून, ही ७३.२० टक्के वसुली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांची वसुली अधिक तीव्र करण्यात आली होती. शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांना वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला. या मोहिमेत थकबाकीदार नागरिकांवर कारवाई करताना ७० नळपाणी वाहिन्यांच्या जोडण्या खंडित करण्यात आल्या, तर ११० मालमत्तांवर सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.ही विशेष वसुली मोहीम मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत कर अधिकारी नरेश आखाडे, उत्तम पाटील, सागर सुर्वे, हेमंत वायंगणकर, प्रशांत वरक, प्रथमेश शिवलकर, राजेंद्र पवार, निरंजन जाधव तसेच वसुली पथकाने सक्रिय सहभाग घेतला.

रत्नागिरी नगर परिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित Read More »

चोरीची इको कार २४ तासांत शोधली; दापोली-शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

प्रतिनिधी : कोकणधारा दापोली : येथील व्यापारी अनिल मोरे यांची चोरीला गेलेली चारचाकी इको कार शोधून काढण्यात दापोली आणि शिरगाव पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी दोन अज्ञात इसमांनी अनिल मोरे यांची इको कार चोरून नेली होती. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शोधमोहीम सुरू केली होती.दरम्यान, गुहागर-विजापूर मार्गावरील पोफळी तांबे कॅन्टीन परिसरात एक चारचाकी गाडी संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे अलोरे-शिरगाव पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती दापोली पोलिसांना दिली. घटनेची खातरजमा करण्यासाठी दापोली पोलिसांनी फिर्यादी अनिल मोरे यांना सोबत घेऊन शिरगाव पोलिस ठाणे गाठले. तेथे उभी असलेली गाडी आपलीच असल्याची खात्री मोरे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी रीतसर पंचनामा करून सदर वाहन त्यांच्या ताब्यात सुपूर्द केले. प्राथमिक माहितीनुसार, गुहागर-विजापूर मार्गावरील एका वळणावर ही गाडी सोडून चोरटे पसार झाले होते. चोरीची घटना घडल्यानंतर केवळ एका दिवसात तपासाची दिशा निश्चित करून वाहन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. आपली गाडी सुखरूप परत मिळाल्याने व्यापारी अनिल मोरे यांनी दापोली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, वाहन हस्तगत करण्यात यश आले असले तरी ही चोरी करणारे दोन अज्ञात इसम कोण होते आणि त्यांच्या मागचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई Read More »

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; राष्ट्रवादीसमोर संघटनात्मक आव्हान

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अस्वस्थतेची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कदम यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे सादर केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामकाजाला अपेक्षित वेळ देता येत नसल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जबाबदाऱ्या पार पाडण्यात काही अडचणी येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. स.तु. कदम यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक पातळीवर मोठे आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे. त्यांच्या कार्यकाळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षात एक प्रकारची पोकळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, मतदार संघातील काही सरपंच आणि स्थानिक पदाधिकारी शिवसेना (शिंदे गट) कडे झुकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव तसेच नुकतेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले अजय बिरवटकर यांच्याबाबतही काही कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, बिरवटकर हे सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय/नातेवाईक असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास अनेक कार्यकर्ते टाळाटाळ करत असल्याचीही चर्चा आहे. या सर्व घडामोडींमुळे दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटन टिकवणे, नाराज गटांना सांभाळणे आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता पक्ष नेतृत्व नव्या तालुकाध्यक्षाची निवड करून परिस्थिती कशी हाताळते आणि अस्वस्थ कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने एकत्र ठेवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान Read More »