konkandhara.com

28 मार्च 2026

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडला; खळबळ

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण : तालुक्यातील देवखेरकी परिसरात एका हापूस आंब्याच्या बागेजवळ जळालेला मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह ठेवून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी जळालेल्या बॅगेचे अवशेष तसेच दोन लोखंडी रॉड आढळून आले असून, ते या प्रकरणाशी संबंधित असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी बागेत काम करणाऱ्या एका मजुराला हा मृतदेह दिसला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने तो घाबरून गेला आणि भीतीपोटी त्याने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. अखेर, मनावरील ताण वाढल्यानंतर त्याने ही माहिती बागमालकाला दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बराच कालावधी उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा सांगाडा उरला असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रत्नागिरी येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरील अवशेष आणि हाडांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेत सापडलेले अवशेष अल्पवयीन मुलाचे किंवा मुलीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. हा प्रकार पूर्वनियोजित खून असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात किंवा आसपासच्या भागात कोणते बालक बेपत्ता आहे का, याचीही माहिती पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगाराचा तातडीने शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ Read More »

चिपळूण बाजारपेठेत छेडप्रकरण; भावाकडून मारहाण, परस्पर तक्रारी

चिपळूण बाजारपेठेत महिला कर्मचाऱ्याची छेड; भावाकडून तरुणाला मारहाण, परस्परविरोधी तक्रारी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील बाजारपेठ परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची कथित छेड काढणाऱ्या तरुणाला संबंधित महिलेच्या भावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे बाजारपेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि संबंधित तरुण हे दोघेही शहरातील बाजारपेठेतील एका दुकानात कामाला आहेत. कामाच्या ठिकाणी संबंधित तरुणाकडून महिलेला वारंवार त्रास दिला जात असल्याची चर्चा असून, याबाबत त्याला यापूर्वीही समज देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, समज देऊनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने संबंधित महिला मानसिक त्रासात होती, अशी माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार पुन्हा घडल्याने महिलेच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली. याची माहिती मिळताच महिलेचा भाऊ थेट दुकानाजवळ पोहोचला.त्यानंतर संबंधित तरुणाला जाब विचारण्यात आला. या वेळी दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात महिलेच्या भावाने तरुणाला मारहाण केल्याचे समोर आले आहे.घटनेदरम्यान परिसरातील काही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या वेळी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने या घटनेकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. दरम्यान, या प्रकरणात संबंधित महिलेच्या बाजूने छेडछाडीबाबत तक्रार देण्यात आली असून, दुसरीकडे मारहाण झालेल्या तरुणानेही स्वतःवर हल्ला झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही बाजूंच्या तक्रारींची पडताळणी करत असून, दुकानातील सहकारी, परिसरातील साक्षीदार तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.चिपळूण पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे समजते. महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारांविषयी व्यापारी वर्तुळातही चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेमुळे बाजारपेठ परिसरात चर्चेला उधाण आले असून, नेमका प्रकार काय घडला, याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. पोलीस तपासानंतर या प्रकरणाचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

चिपळूण बाजारपेठेत महिला कर्मचाऱ्याची छेड; भावाकडून तरुणाला मारहाण, परस्परविरोधी तक्रारी Read More »

चिपळूण पाग परिसरात उड्डाणपूल; १०७.७८ कोटींच्या प्रकल्पासाठी नारायण राणे पुढाकार

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ व पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाढती लोकसंख्या, अवजड वाहनांची वर्दळ आणि शहरांतर्गत वाहतुकीचा ताण लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १०७ कोटी ७८ लाख रुपयांच्या वाढीव उड्डाणपुलाचा (Elevated Structure) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. तहसील कार्यालय ते ‘पाग’ या दरम्यान उड्डाणपुलाची लांबी वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या भागात एसटी बसेस व अवजड वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात घडले असून, वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १८ जून २०२५ रोजी १०७.७८ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला. त्यानंतर २२ जुलै २०२५ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडून हा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, वार्षिक आराखड्यात या कामाचा समावेश करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या प्रकल्पाची निकड लक्षात घेऊन खासदार नारायण राणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. चिपळूणमधील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची गंभीरता त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे शहरातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे विभाजन होऊन अपघातांमध्ये मोठी घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कामासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही पाठपुरावा केला आहे. खासदार राणे यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. साखळी क्रमांक ५१+५५० ते ५२+६२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या या उड्डाणपुलामुळे चिपळूणच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.सध्या या प्रस्तावावर पुढील प्रशासकीय कार्यवाही अपेक्षित असून, केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार Read More »

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा गौरव रत्नागिरी, दि. २८ : दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मूल्यमापनात २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. बगाटे यांनी ‘मिशन जीवन’, ‘रेड्स ॲप’, ‘मिशन गती’, ‘रत्नसेतू चॅटबॉट’सह २४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान केला.

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांचा गौरव

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. २८ : दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मूल्यमापनात २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. बगाटे यांनी ‘मिशन जीवन’, ‘रेड्स ॲप’, ‘मिशन गती’, ‘रत्नसेतू चॅटबॉट’सह २४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान केला.

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांचा गौरव Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूणमध्ये बंद फ्लॅट आणि दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; सीसीटीव्हीत दोघे कैद

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील पागमळा परिसरातील दोन बंद फ्लॅट तसेच मार्कंडी भागातील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पागमळा येथील एकाच अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबविली. तर मार्कंडी परिसरात तीन दुकानांच्या शटरची पट्टी वाकवून चोरी करण्यात आली.दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. या घटनेचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

चिपळूणमध्ये बंद फ्लॅट आणि दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; सीसीटीव्हीत दोघे कैद Read More »