konkandhara.com

10 फ़रवरी 2026

'मोसाद' पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

Written By : विवेक ताम्हणकर बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या घटनेमागे मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवून खळबळ उडवून दिली आहे. हा केवळ अपघात नसून एक पूर्वनियोजित कट असू शकतो, असा संशय त्यांनी एका सादरीकरणाद्वारे (प्रेझेंटेशन) उपस्थित केला. “माझा काका आणि राज्याचा मोठा नेता गेला आहे, आम्हाला उत्तरे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या काही दिवसांतील त्यांच्या बदललेल्या वागणुकीवर प्रकाश टाकला. त्यांच्या दाव्यानुसार, अजित पवारांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल काहीतरी शंका येत असावी, असे त्यांच्या कृतीतून दिसत होते. दादांनी अलीकडच्या काळात आपली पिण्याच्या पाण्याची बाटली बदलली होती. इतकेच नव्हे तर, त्यांनी एका जवळच्या मित्राला स्वतःचे विमान खरेदी करण्याचा सल्ला दिला होता आणि मि त्याना माझ्या मित्राने हेलीकॉप्टर घेतल्याचे सांगितले, “जर मित्र विश्वासू असेल, तर त्याच्याच हेलिकॉप्टरमधून फिरत जा,” असा सल्लाही त्यांनी आपल्याला दिला होता. यावरून त्यांना भविष्यात काहीतरी दगाफटका होऊ शकतो याची चाहूल लागली होती का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. यावेळी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अलीकडच्या काळात अजित पवार वापरत असलेली पाण्याची अत्यंत सुरक्षित बाटलीही दाखविली.  रोहित पवार यांनी या अपघाताचा संबंध इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या कार्यपद्धतीशी जोडला. मोसादच्या पुस्तकाचा संदर्भ देत ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी त्याच्या चालक किंवा वैमानिकाला आपल्या बाजूने वळवणे किंवा त्याला लक्ष्य करणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. या प्रकरणातील मुख्य वैमानिक सुमित कपूर याच्या ट्रॅक रेकॉर्डवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कपूर हा मद्यपान केल्याप्रकरणी तीन वर्षे निलंबित होता. अशा वादग्रस्त पार्श्वभूमीच्या वैमानिकावर कोणाचा दबाव होता का आणि त्याने मुद्दाम अवघड रनवेची निवड का केली, याकडे रोहित यांनी लक्ष वेधले. याशिवाय, तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना रोहित पवार यांनी अनेक विसंगती मांडल्या. विमान उड्डाणाची वेळ, पायलट आणि नियोजित दौरा ऐनवेळी का बदलला? एटीसी (ATC) ट्रान्सस्क्रिप्ट आणि केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालातील वेळेत फरक का आहे? खराब दृश्यमानता असूनही लँडिंगचा धोका का पत्करला आणि विमानाचा ट्रान्सपॉन्डर (Transponder) नेमका कोणाच्या सूचनेवरून बंद होता की केला होता? मृत्यू समोर दिसत असतानाही मुख्य वैमानिक गप्प का होता, हे प्रश्न उपस्थित करून त्यांनी या घटनेच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने तपासाच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी शंका व्यक्त केली असून, हा विमान क्रॅश करण्याचाच कट होता का, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे Read More »

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

मंत्रिमंडळ बैठक: 19 महत्त्वाचे निर्णय; विकासकामांना वेग मुंबई | कोंकणधारा डेस्क:राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत एकूण 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला भावनिक वातावरण होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवली, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत काही निर्णय हे अजित पवार यांच्या कार्यकाळात प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांशी संबंधित असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली. त्यात बारामती जिल्हा क्रीडा संकुलासाठी 75 कोटी 13 लाख रुपये मंजूर करण्यात आले. 🗂️ मंत्रिमंडळ बैठकीतील 19 महत्त्वाचे निर्णय (ठळक मुद्दे) सिंचन प्रकल्पांना गती:नाबार्ड कडून 15,000 कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प व 193 प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा; 8 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन. (जलसंपदा) कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम:करवीर तालुक्यात 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध. (महसूल) पुरंदर विमानतळ:विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना; भूसंपादन व अनुषंगिक कामांसाठी 6,000 कोटींचे कर्ज; एमआयडीसी, एमएडीसी, सिडको सहभाग. (उद्योग) ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान:2026–27 कालावधी; वार्षिक 80.75 कोटींची तरतूद; ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावर पुरस्कार. (सार्वजनिक आरोग्य) एमआयडीसी—रत्नपुरी मळा (इंदापूर):1,000 एकर जमीन नव्या औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरण. (महसूल) मुंबईत महाटेनिस पायाभूत सुविधा:म्हाडाच्या भूखंडांवर संयुक्त भागीदारीत विकास. (गृहनिर्माण) अटल सेतू प्रभाव क्षेत्र विकास धोरण:नव नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात भूसंपादन व भूवाटप धोरणास मान्यता; ‘तिसरी मुंबई’ला गती. (नगर विकास) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षिसांत वाढ:विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचरांना लाभ. (शालेय शिक्षण) PPP धोरण–2026:25 कोटींपेक्षा मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीकडून मंजुरी; नियोजन विभागात स्वतंत्र कार्यासन. (नियोजन) ई-मेल नोटीस वैध:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये दुरुस्ती. (महसूल) परभणी—इंद्राणी सहकारी सूतगिरणी:शासन अर्थसहाय्य. (वस्त्रोद्योग) अपर जिल्हाधिकारी पदनिर्मिती:11 पदांना मान्यता. (महसूल व वन) नागपूर—कोल टू केमिकल प्रकल्प:117.19 हेक्टर जमीन एमआयडीसीला. (महसूल) बारामती क्रीडा संकुल (कटफळ):75.13 कोटींची मंजुरी; पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी, बास्केटबॉल. (शालेय शिक्षण व क्रीडा) धान्य वितरण—एकत्र निविदा प्रक्रिया:मुंबई–ठाणे क्षेत्रातील 5 परिमंडळे व 34 जिल्ह्यांत सुसूत्रता. (अन्न व नागरी पुरवठा) अकोला—लघू पाटबंधारे दुरुस्ती:6.60 कोटी; 255 हेक्टर सिंचन. (मृद व जलसंधारण) कर थकबाकी तडजोड अध्यादेश:कर, व्याज, दंड/विलंब शुल्काबाबत सुधारणा. (वित्त) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दुरुस्ती:कलम 109(3)(घ). (उच्च व तंत्र शिक्षण) खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम दुरुस्ती:प्रवेश व शुल्क विनियमनात सुधारणा. (उच्च व तंत्र शिक्षण) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमुळे सिंचन, आरोग्य, उद्योग, क्रीडा व शहरी विकास या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. निवडणुकांनंतरच्या पहिल्या महत्त्वाच्या बैठकीत व्यापक विकासाचा अजेंडा पुढे नेण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती Read More »

mahad election

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात

महाड | कोंकणधारा डेस्क:महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले, तर पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर या गटाने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी पराभव मान्य करत मतमोजणी केंद्रातून निघून जाणे पसंत केले. जिल्हा परिषद गटांचे निकाल महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये खालील उमेदवार विजयी ठरले— या निकालांमुळे जिल्हा परिषदेवर शिवसेना शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे. पंचायत समितीवर नऊ जागांवर विजय पंचायत समितीच्या गणांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या खालील उमेदवारांनी विजय मिळवला याशिवाय सवाने पंचायत समिती गणातील अनिल जाधव हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. दरम्यान, बिरवाडी पंचायत समिती गणात मयूर पुंडलिक जाधव यांनी विजय मिळवत राष्ट्रवादी–भाजप आघाडीचे एकमेव खाते उघडले आहे. चुरशीच्या लढतीत निर्णायक विजय या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या लढतींपैकी नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गट महत्त्वाचा ठरला. येथे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास भरत गोगावले यांनी तब्बल पाच हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांचा दारुण पराभव केला. त्याचप्रमाणे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेल्या निलेश ताठरे यांनी सतत चर्चेत असलेले सोमनाथ ओझर्डे यांचा पराभव करत विजय संपादन केला. निवडणूक जिल्हा परिषदेची, गुलाल विधानसभेचा महाड नगरपालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती करत ताकद लावली होती. मात्र, मजबूत जनसंपर्क असलेल्या मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा महाड–पोलादपूर तालुक्यावर आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले. नगरपालिका निवडणुकीनंतर दोन गटांत झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांचा हा विजय प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. मात्र मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महाडमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे गुलाल उधळण्यात आला. राष्ट्रवादी बॅकफूटवर; ठाकरे गटाची मते स्थिर या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्याचा पहिला फटका महाड नगरपालिकेत बसल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांच्या कुटुंबाची राजकीय ताकद कमी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते तुलनेने स्थिर असल्याचे चित्र दिसत असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय मतदारांना पसंत न पडल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. निष्कर्ष महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालामुळे महाड–पोलादपूर पट्ट्यातील आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लेखक : कोंकणधारा डेस्क

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात Read More »

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान

पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तालुक्यातील २५ ते ३० टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असताना सुमारे ७० टक्के मतदार हे चाकरमानी असल्याने, त्यांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे, एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी ने-आण, जेवण-खाणे, निवास आणि कथित आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांना करावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना, तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागल्याचे दिसून आले. 55.73 टक्के मतदान; शेवटच्या तासांत फारशी वाढ नाही सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पोलादपूर तालुक्यात 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याचे प्रशासनाच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11,163 पुरुष आणि 10,705 महिला, असे एकूण 21,868 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे आणि कृष्णा कदम यांनी ओंबळी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. कुठल्या मतदान केंद्रांवर कुणाचे भवितव्य ठरणार? कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत माटवण पंचायत समिती गणातील गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर, तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरवणार आहेत. कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-१, वाकण-२, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक (१ ते ३), रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्यासाठी मतदान केले आहे. लोहारे गटात चौरंगी लढत लोहारे जिल्हा परिषद गटात कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना) आणि कृष्णा कदम (ढोबळी मिरची) अशी चौरंगी लढत असून, कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण विरुद्ध अविनाश शिंदे यांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.लोहारे पंचायत समिती गणात युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी विविध गावांतील मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांबाहेर वाहनांची गर्दी तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघाबाहेर लक्झरी बसेस, मोटारकार, जीप आणि खासगी आरामगाड्यांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे ७० टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने हा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे. ‘दुबार मतदार’ प्रश्नावर तोडगा हवा या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील खर्च टाळण्यासाठी पोस्टल मतांचा पर्याय, किंवा आधारकार्डशी मतदार ओळखपत्र जोडून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.पोलादपूर तालुक्यातील अनेक मतदार मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून, काहीजण तिकडील महापालिकांमध्ये नगरसेवकही झाले आहेत. त्यामुळे आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग सक्तीचे केल्यास दुबार मतदारांचा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे. निकाल सोमवारी सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवारी होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील ‘दुबार मतदार’ प्रश्नाचा निकालांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लेखक : कोंकणधारा डेस्क

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान Read More »