खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर रविवारी (दि. १२ एप्रिल २०२६) सकाळी सुमारे ७ वाजता भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने दुभाजक तोडत थेट दोन पुलांच्या मधोमध जाऊन अडकला.
अपघातावेळी कंटेनरचा अर्धा भाग हवेत लटकत नदीच्या दिशेने झुकलेला होता. त्यामुळे तो सुमारे २०० फूट खोल जगबुडी नदीत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर सुरक्षित बाहेर काढण्यात आला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान, कंटेनर बाहेर काढण्याचे काम सुरू असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक लेन सुमारे दीड तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
विशेष म्हणजे, जगबुडी पुलावर याच आठवड्यातील हा दुसरा भीषण अपघात असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून येथे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.















