प्रतिनिधी : कोकणधारा
देवरुख पोलिसांचा जलद तपास, आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी
देवरुख | प्रतिनिधी: दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देवरुख पोलिसांनी जलद तपास करून एका संशयिताला अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपी आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड, जि. सातारा) असून, मृत व्यक्ती सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण, जि. सातारा) आहे. दोघेही एकमेकांचे मित्र तसेच नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष भावके आणि सुधीर यादव हे दोघे ३१ मार्च २०२६ रोजी आशिषच्या एमएच ५० / एन ४६४२ क्रमांकाच्या इर्टिगा कारने रत्नागिरीकडे गेले होते. रत्नागिरीतील आरेवारे परिसरात त्यांनी मद्यपान करून जेवण केले. त्यानंतर रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास ते परत घरी निघाले.
यावेळी सुधीर यादव याने पुन्हा दारू पिण्याची मागणी केली. मात्र, त्या ठिकाणी दारू मिळणार नसल्याचे आशिष भावके याने सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या सुधीर यादव याने आरोपीच्या कारच्या बॉनेटवर चढून बसत पुढील काच फोडली आणि वाहनाचे नुकसान केले.
याचा राग आल्याने आरोपी आशिष भावके याने, सुधीर यादव हा गाडीच्या बॉनेटवर असतानाच कार सुरू केली. त्यामुळे सुधीर यादव खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून बरगडी, कंबर, पोट आणि शरीराच्या डाव्या बाजूस दुखापती झाल्या. मात्र, जखमी अवस्थेत असतानाही आरोपीने त्याला घटनास्थळीच सोडून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
यानंतर दुसऱ्या दिवशी जखमी सुधीर यादव याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यू नोंद (अ.मृ.) क्र. १२/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सखोल चौकशीनंतर आरोपीविरुद्ध देवरुख पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्र. ४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद अनंत वाघाटे (वय ५७), देवरुख पोलीस ठाणे हे आहेत.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे व त्यांचे सहकारी करीत आहेत.















