इंग्रजी लोणच्यासारखं, पण मातृभाषेला मान द्या” – गुलाबराव पाटील यांचा शिक्षकांना सल्लाआदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मंत्री पाटील यांची प्रतिक्रिया; मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याचे आवाहन
जळगाव – “जेवणात जसं लोणचं लागतं, तसंच थोडं इंग्रजी यायला हरकत नाही. पण आपल्या मातृभाषेचा आदर राखलाच पाहिजे,” असा अनोखा सल्ला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिक्षकांना दिला. शिक्षक दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात त्यांनी पुढाऱ्यांची मुलं विरुद्ध शिक्षकांची मुलं यांच्यातील तुलना मांडली. “आदर्श शिक्षकांची मुलं मोठ्या पदावर असतात. पण पुढाऱ्यांची मुलं फार मोठ्या ठिकाणी नसतात. राजकारण्यांकडे प्रॉपर्टी असते, पण शिक्षकांची खरी प्रॉपर्टी म्हणजे त्यांची घडलेली मुलं,” असे ते म्हणाले. “इंग्रजी मीडियमची मुलं फोडून मराठी शाळेत घ्या” गुलाबराव पाटील यांनी शाळांच्या पटसंख्येवर भाष्य करताना म्हटलं – “जशी भाजप कोणालाही पक्षात घेत असते, तशीच तुम्ही इंग्रजी मीडियमची मुलं फोडून जिल्हा परिषद शाळेत घ्या. मराठी शाळांची पटसंख्या वाढली तरच आदर्श शिक्षक घडतील.” त्यांनी हेही सांगितले की पटसंख्या कमी झाल्यामुळे शिक्षक भरती रखडली आहे. मराठी शाळांची स्थिती आता पूर्वीपेक्षा सुधारली आहे, मात्र अजूनही पटसंख्या टिकवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आदर्श शिक्षक आणि कुटुंबाचा वाटा सोहळ्यात पाटील म्हणाले – “आदर्श शिक्षक होण्यात पत्नींचाही मोठा वाटा आहे. कारण त्यांच्या आधारामुळेच गुरुजी आपलं कर्तव्य पार पाडू शकतात. आदर्श शिक्षकांवर कोणी टीका करत नाही. ते समाजात विद्यार्थी घडवण्याचं महान काम करतात.” शिक्षकांसाठी ड्रेसकोडची मागणी शाळांमधील शिक्षकांच्या शिस्तीवर बोलताना पाटील म्हणाले – “पूर्वीचे शिक्षक नेहमी ड्रेसकोडमध्ये असायचे. आता तसं नाही. पण शाळेत तरी शिक्षकांचा ड्रेसकोड असायलाच हवा. कारण गुरु हा देवाच्या स्थानी असतो.”