बार्शीत 76 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवला
सोलापूर : राज्यात सलग मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी रवाना झाले. या पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आज शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या ताफ्याला संतप्त शेतकऱ्यांनी अडवत सरकारच्या मदतीवर जोरदार नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र, ती मदत तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकरी सातत्याने करत आहेत. विरोधी पक्षाने हेक्टरी 30 ते 50 हजार रुपयांची मागणी केली आहे. त्याच धर्तीवर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही सरकारने जाहीर केलेली मदत नगण्य असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. कारी गावातील एका शेतकऱ्याने थेट भरत गोगावले यांना उद्देशून, “गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसे निघत नाहीत. एकरी फक्त 3400 रुपये सरकार देतंय, सोयाबिनला 6 हजार रुपयांचा भाव आहे, हे आम्ही टिंगल नाही म्हणणार तर काय?” अशा शब्दांत रोष व्यक्त केला. यावेळी, शेतकऱ्यांनी एकमुखीपणे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. दरम्यान, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी संतप्त शेतकऱ्यांशी चर्चा केली, तर मंत्री भरत गोगावले यांनीही गाडीतून उतरून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. “निवडणुका झाल्या की मदतीच्या निकषात बदल करता. फुकटातील विमा बंद करून शेतकऱ्यांचं नुकसान केलं,” असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. 🌧️ अतिवृष्टीचे प्रमाणबार्शी तालुक्यात यंदा मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाला. मे महिन्यात सरासरीच्या 12 पट पाऊस झाला. सप्टेंबरअखेर तालुक्यात 980 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा दुप्पट आहे. सततच्या पावसामुळे सर्व प्रमुख नद्यांना पूर आला असून 35 गावांतील नागरिकांना मोठा फटका बसला. 🌾 पिकांचे व जनावरांचे मोठे नुकसानतहसील प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बार्शी तालुक्यातील 78 हजार शेतकऱ्यांच्या 75 हजार 874 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबिनसह फळबागा, द्राक्षबागा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय, 155 घरांची पडझड झाली, 40 जनावरे व 18 हजार कोंबड्या वाहून गेल्या. एकीकडे शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत, तर दुसरीकडे सरकारच्या मदतीवर असमाधान व्यक्त करून ते आंदोलनाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
बार्शीत 76 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवला Read More »