konkandhara.com

Editorial

konkandhara 23 2

लांजात मंदिराच्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा लांजा : मंदिराच्या जागेवरून झालेल्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना लांजा तालुक्यातील भांबेड कुडेवाडी येथे बुधवारी (दि. ११) रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष शामकांत मोरे (वय ६३, रा. भांबेड कुडेवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भांबेड कुडेवाडी येथे जांगल देवाचे जुने मंदिर असून ते पाडून त्याठिकाणी नवीन मंदिर उभारण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला होता. त्यानुसार सुभाष मोरे यांनी मंदिराच्या जागी नारळ ठेवला होता. याच कारणावरून गावातील काही व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला.या वादातून श्रीधर शंकर मोरे (वय ८०), तुळशीराम शंकर मोरे (वय ७२), तेजस तुळशीराम मोरे (वय ३५), श्रद्धेश तुळशीराम मोरे उर्फ बारक्या (वय ३२) आणि गणेश जयराम मोरे (वय ५५, सर्व रा. भांबेड कुडेवाडी, ता. लांजा) यांनी बुधवारी रात्री सुभाष मोरे यांच्या घरी जाऊन बेकायदा जमाव करून गोंधळ घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच त्यांनी शिवीगाळ करत हाताच्या थपडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सुभाष मोरे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली असून त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर सुभाष मोरे यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वरील पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे करीत आहेत.

लांजात मंदिराच्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा Read More »

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘कोडबिट्स ४.०’ राष्ट्रीय हॅकथॉन संपन्न

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘कोडबिट्स ४.०’ राष्ट्रीय हॅकथॉन संपन्न

प्रतिनिधी : कोकणधारा लवेल : येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग) आणि संगणक अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय स्तरावरील २४ तासांचे हॅकथॉन ‘कोडबिट्स ४.०’ ११ व १२ मार्च २०२६ रोजी उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून एकूण ४८ विद्यार्थी संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या तांत्रिक कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या हॅकथॉनमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक व औद्योगिक समस्यांवर आधारित समस्या विधान देण्यात आली होती. हेल्थकेअर तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, शिक्षणातील डिजिटल उपाय आणि पर्यावरण संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी २४ तास अखंडित परिश्रम घेत नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाय विकसित केले. या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना आयडिया जनरेशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग मॉडेल डिझाईन तसेच मोबाइल व वेब अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. हॅकथॉनदरम्यान सहभागी संघांनी अत्यंत नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांचे मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षक नंदिनी सिंग आणि कैलास शर्मा यांनी केले. प्रकल्पांची तांत्रिक गुणवत्ता, नवोपक्रमशीलता, प्रत्यक्ष वापरयोग्यता तसेच सादरीकरण कौशल्य या निकषांवर प्रकल्पांचे परीक्षण करण्यात आले. सदर स्पर्धेत इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई या कॉलेजच्या “लॉस्ट फ्रॉम लाईट” या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या “इटरेटिव्ह बाईट्स” या संघाने मिळवला. तर तृतीय क्रमांक फादर रॉड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या “अँटी प्लेसमेंट” या संघाने पटकावला. विजेत्या संघांना उपप्राचार्य डॉ.सचिन पाटील, एआयएमएल विभागप्रमुख प्रा.सचिन लाटकर, संगणक विभागप्रमुख प्रा. ज्योती खालकर आणि परीक्षक कु.नंदिनी सिंग व श्री.कैलास शर्मा यांच्या हस्ते अनुक्रमे २५,००० रुपये, २०,००० रुपये आणि १५,००० रुपये अशी रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या हॅकथॉनमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याची संधी मिळाली असून त्यांच्या सर्जनशीलता, नवोपक्रमशील विचारसरणी, समस्या सोडवण्याची क्षमता आणि टीमवर्क कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत झाली. २४ तासांच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत सातत्याने काम करून अनेक उपयुक्त व नाविन्यपूर्ण कल्पना साकार केल्या. या राष्ट्रीय स्तरावरील हॅकथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील विभागप्रमुख, समन्वयक डॉ. अरुण ढंग , प्रा. श्रद्धा गोपाळ, इतर प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. ‘कोडबिट्स 4.0’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास होण्यास चालना मिळाली असून भविष्यातही अशा तांत्रिक स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘कोडबिट्स ४.०’ राष्ट्रीय हॅकथॉन संपन्न Read More »

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये या हवामान बदलाचा प्रभाव जाणवू शकतो. या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः 18 ते 20 मार्चदरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी Read More »

mahila-din-sanitary-napkin-poshtik-ahar-vatap-chiplun

महिला दिनानिमित्त डीबीजे महाविद्यालयाचा उपक्रमविद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन व पौष्टिक आहार वाटप

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून डी. बी. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुंडे तर्फे चिपळूण येथे विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन तसेच पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले. महिलांचे आरोग्य, स्वच्छता आणि सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याचे महत्त्व, सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर आणि त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी याबाबत विद्यार्थिनींना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.यानंतर विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले तसेच पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली. या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सौ. वैशाली जाधव, मुख्याध्यापक श्री. विलास पवार, पदवीधर शिक्षक श्री. संजय सुर्वे, सहशिक्षिका श्रीमती ज्योती भोसले तसेच सहशिक्षक श्री. रोशन निकम उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थिनींना आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन डी. बी. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री. अविनाश शंकर पालशेतकर यांनी केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच उपप्राचार्य सौ. स्नेहल कुलकर्णी व पर्यवेक्षिका सौ. सुजाता खोत यांचे मार्गदर्शन लाभले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व सेवा भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महिला दिनानिमित्त डीबीजे महाविद्यालयाचा उपक्रमविद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन व पौष्टिक आहार वाटप Read More »

रत्नागिरीत भूकंपाचा सौम्य धक्का; तीव्रता २.८ रिश्टर स्केल

रत्नागिरीत भूकंपाचा सौम्य धक्का; तीव्रता २.८ रिश्टर स्केल

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप नोंदविण्यात आला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर व रेखांश ७३.४४ पूर्व या दरम्यान रत्नागिरी परिसरात जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती देण्यात आली आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र काही भागांतील नागरिकांना जमिनीला सौम्य कंप जाणवल्याने काही काळ नागरिक घराबाहेर पडले होते.दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीत भूकंपाचा सौम्य धक्का; तीव्रता २.८ रिश्टर स्केल Read More »

चिपळूण पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देण्याची ग्वाही: सिद्धेश कदम

चिपळूण पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देण्याची ग्वाही: सिद्धेश कदम , नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घेतली मुंबईत भेट

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नगर पालिकेचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी गुरुवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशदादा रामदास कदम यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी चिपळूण नगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी नगराध्यक्ष सकपाळ यांनी लेखी पत्राद्वारे केली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सिद्धेशदादा कदम यांनी दिली. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी १६ इलेक्ट्रिक कचरा वाहने खरेदीसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली. तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत विविध विकास कामांसाठी निधी देण्याबाबतही त्यांनी निवेदन सादर केले. चिपळूण नगर परिषदेचा वाढता विस्तार आणि वाढत्या कचऱ्याच्या प्रमाणामुळे सध्या उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. विशेषतः शिवाजी नगर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर सुक्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याची बाब त्यांनी मांडली.यासाठी दररोज ५ टन क्षमतेचा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्याचा प्रस्ताव नगर पालिकेकडून तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी दिनांक १२ जून २०२५ रोजी दरपत्रक मागविण्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या तीन दरपत्रकांपैकी सर्वांत कमी दरानुसार रु. ४,९९,५५,३५७/- इतके अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामाच्या तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे कार्यालयाकडे सादर करण्यात आला असल्याचेही नगराध्यक्षांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ५ टन प्रतिदिन क्षमतेचा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्यासाठी सुमारे ४ कोटी ९९ लाख ५५ हजार ३५७ रुपये निधी मंजूर करून द्यावा, अशी नम्र विनंती नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशदादा कदम यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, “चिपळूण नगर पालिकेच्या विकासासाठी आम्ही ठामपणे पाठीशी आहोत. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही दिली.

चिपळूण पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देण्याची ग्वाही: सिद्धेश कदम , नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घेतली मुंबईत भेट Read More »

uday-samant-chiplun-vikas-kam-udghatan-sahityik-samman

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शनिवारी विकास कामांचे उद्घाटन, साहित्यिकांचा सन्मान व काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव होणार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मराठी भाषा दिनानिमित्त चिपळूण नगर परिषदेच्या वतीने आयोजित काव्यवाचन स्पर्धेचे बक्षीस वितरण व साहित्यिकांचा सत्कार सोहळा शनिवार दि. १४ मार्च रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष उमेश सपकाळ यांनी दिली. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खुल्या गटातील काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली होती. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला कवी व साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, प्रा. सुहास बारटक्के, स्मिताताई देवधर, अरुण इंगवले, प्रा. संतोष गोणबरे, मुजफ्फर सय्यद, डॉ. प्रशांत पटवर्धन, राष्ट्रपाल सावंत, धीरज वाटेकर, रविंद्र गुरव, संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे तसेच प्रकाश (आप्पा) जाधव या मान्यवर साहित्यिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा व सहभागी कवींचा गौरव सोहळा या कार्यक्रमात पार पडणार आहे. हा कार्यक्रम पेठमाप येथे (इंडियन जिमसमोर) आयोजित करण्यात आला असून नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपालीताई दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, तसेच सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमाला चिपळूणमधील विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शनिवारी विकास कामांचे उद्घाटन, साहित्यिकांचा सन्मान व काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव होणार Read More »

थोरलेभरड–सज्जनवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन | दोडामार्ग PWD कार्यालयासमोर आंदोलन

थोरलेभरड–सज्जनवाडी रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी : कोकणधारा दोडामार्ग : साटेली-भेडशी ग्रामपंचायत हद्दीतील थोरलेभरड–सज्जनवाडी येथील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे किंवा काम थांबविणाऱ्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालय, दोडामार्ग येथे मंगळवार (दि. १० मार्च २०२६) पासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दररोज सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामस्थ आंदोलनात सहभागी होत असून रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. बुधवारी साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांना पाठिंबा दिला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गुणाजी कदम यांनी संबंधित PWD अधिकाऱ्यांना व दोडामार्ग पोलिस ठाण्याला जाब विचारत सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलनात सहभाग घेतला.याशिवाय साटेली-भेडशी परिसरातील काही ग्रामस्थांनी रात्री आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे, हीच ग्रामस्थांची मुख्य मागणी असून प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा थोरलेभरड–साटेली-भेडशी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

थोरलेभरड–सज्जनवाडी रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन Read More »

फुंणगूस येथून हापूस आंबा हंगामाची दमदार सुरुवात

फुंणगूस येथून हापूस आंबा हंगामाची दमदार सुरुवात

प्रतिनिधी : कोकणधारा संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यातील फुंणगूस गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हापूस आंबा हंगामाची दमदार सुरुवात झाली आहे. फुंणगूस येथील प्रसिद्ध आंबा उत्पादक रमेश लांजेकर यांनी यंदाच्या हंगामातील पहिली आंबा पेटी पुणे बाजारपेठेकडे रवाना करून मानाचा मान पुन्हा एकदा पटकावला आहे. “लांजेकर बंधू मॅंगोज” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लांजेकर बंधूंनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचे गोड फळ अखेर १० मार्च २०२६ रोजी मिळाले. त्यांच्या बागेतील दर्जेदार हापूस आंब्याची पहिली पेटी पुणे मार्केटकडे पाठवण्यात आली असून त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदारांसाठी हा क्षण विशेष मानला जात असून लांजेकर बंधूंच्या या पुढाकारामुळे यंदाच्या आंबा हंगामाची उत्साहपूर्ण सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आंब्याबाबत अधिक माहितीसाठी ९७६७६४९०६६ (कॉलिंग) किंवा ९२०९९०८९४५ (व्हॉट्सअॅप) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फुंणगूस येथून हापूस आंबा हंगामाची दमदार सुरुवात Read More »

plastic-mukt-chiplun-home-minister-competition-prize-distribution

प्लास्टिक मुक्त चिपळूण ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात, उमा आलेकर, स्वप्नाली निवाते, शीला ओतारी, प्रियंका शिंदे पैठणीच्या मानकरी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या वतीने, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहयोगाने आयोजित “प्लास्टिक मुक्त चिपळूण होम मिनिस्टर” स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पार पडला. चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट २०२५ पासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे बक्षीस वितरण यापूर्वीच झाले होते. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या चार महिन्यांचा बक्षीस वितरण सोहळा निवडणूक कार्यक्रमांमुळे रखडला होता. या चार महिन्यांचा एकत्रित बक्षीस वितरण कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. या कालावधीत एकूण २७२ महिलांनी सहभाग घेत २४११ किलो प्लास्टिक जमा केले. स्पर्धेच्या निकालानुसार सौ. उमा आलेकर यांनी सर्वाधिक प्लास्टिक जमा करत विशेष कामगिरी केली, तर सौ. स्वप्नाली निवाते यांनी सर्वाधिक महिलांना या स्पर्धेत सहभागी करून घेतले. सातपेक्षा अधिक कुपन देणाऱ्या १६८ महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये शीला शंकर ओतारी या भाग्यवान ठरल्या. तसेच एकूण सहभागी २७२ महिलांमधून ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाऐवजी लकी ड्रॉ काढण्यात आला, त्यामध्ये प्रियांका विनोद शिंदे या चिपळूण होम मिनिस्टर पैठणीच्या मानकरी ठरल्या. या कार्यक्रमाला चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, उपसभापती राणी महाडिक, आरोग्य सभापती शुभम पिसे, शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवार, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, मुख्याधिकारी संजय जाधव, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे प्रमुख भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे यांच्यासह नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटक कंपनी चिपळूणचे उपाध्यक्ष योगेश बांडागळे यांनी केले.

प्लास्टिक मुक्त चिपळूण ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात, उमा आलेकर, स्वप्नाली निवाते, शीला ओतारी, प्रियंका शिंदे पैठणीच्या मानकरी Read More »