konkandhara.com

23 मार्च 2026

रत्नागिरीत 114 ग्रामपंचायतींतील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिलला निवडणूक

114 ग्रामपंचायतींतील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिलला निवडणूक

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांमुळे संबंधित ग्रामपंचायतींतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत संबंधित ग्रामपंचायत हद्दीत आचारसंहिता लागू राहणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी दिली.

114 ग्रामपंचायतींतील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिलला निवडणूक Read More »

डिझेल दरवाढीने मच्छिमार अडचणीत; केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी – नितेश राणे

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी केंद्रीय मंत्री, पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह जी यांच्या कडे सविस्तर पत्र पाठवून केली आहे. राज्यातील 136 मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सुमारे 7,550 यांत्रिक मासेमारी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात वाढत्या दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांमुळे डिझेल दरात झालेली वाढ ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.सहकारी संस्थांना ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणून वर्गीकृत केल्याने मच्छीमारांना किरकोळ दरांपेक्षा जास्त दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांपेक्षा मच्छीमारांवर अधिक आर्थिक भार पडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.वाढत्या इंधन खर्चाचा भार सहकारी संस्थांना सहन करणे कठीण जात असून, हा खर्च अखेरीस वैयक्तिक मच्छीमारांवर टाकला जात आहे. परिणामी अनेक मच्छीमारांना मासेमारीच्या फेऱ्या कमी कराव्या लागत असून, याचा थेट परिणाम मासळी उत्पादन आणि उत्पन्नावर होत आहे. या परिस्थितीमुळे मच्छीमार, मजूर, मासळी विक्रेते आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. मत्स्यव्यवसाय हा अन्नसुरक्षा आणि निर्यातीसाठी महत्त्वाचा क्षेत्र असतानाही, शेतीप्रमाणे इंधन अनुदान किंवा संरक्षण यंत्रणा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मच्छीमार सहकारी संस्थांचे पुनर्वर्गीकरण करून किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देणे, लक्षित डिझेल अनुदान किंवा थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना लागू करणे, तसेच मत्स्यव्यवसायाला इंधन संरक्षण योजनांमध्ये समाविष्ट करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसायासाठी इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याचीही मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष दिल्यास महाराष्ट्रातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, Read More »

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. माजी खासदार, शिक्षण महर्षी तथा सहकार महर्षी गोविंदराव निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून नर्सरीपासून नर्सिंग, आयटीआय ते अभियांत्रिकी अशा विविध शाखांमध्ये संस्थेने उल्लेखनीय विस्तार साधला आहे. गोविंदराव निकम आणि अनुराधाताई निकम यांनी संस्थेची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून शेखर निकम यांनी जबाबदारी सांभाळत संस्थेचा विकास पुढे नेला. सध्या ते आमदार म्हणून कार्यरत आहेत. आता नव्या पिढीकडे नेतृत्वाची धुरा सोपवित अनिरुद्ध निकम यांच्या रूपाने संस्थेला नवे नेतृत्व मिळाले आहे. अनिरुद्ध निकम यांनी कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण ऑस्ट्रेलियातून पूर्ण केले असून ते उच्चशिक्षित आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारल्याने संस्थेच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीबद्दल अनिरुद्ध निकम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष Read More »

नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग; जाळपोळीचा संशय

नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग; जाळपोळीचा संशय

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे 50 हजार ते 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांच्या मालकीचे हे हॉटेल असून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती दिली, मात्र तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने संपूर्ण हॉटेल भस्मसात झाले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आग लागण्यामागील कारणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. संबंधित मालकांनी ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अवैधरित्या प्रवेश करून मद्यप्राशन करणाऱ्यांना पकडल्याची घटना घडली होती. त्यावेळी संबंधितांकडून धमकी व मारहाणीचा प्रयत्नही झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या आगीचा त्या घटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अज्ञात व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग; जाळपोळीचा संशय Read More »