Asia Cup 2025: ड्रीम 11नं माघार घेतली; लीड स्पॉन्सरशिवाय उतरणार टीम इंडिया, बीसीसीआय नवा प्रायोजक शोधतंय
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 मध्ये लीड स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरणार आहे. ड्रीम 11नं बीसीसीआयसह केलेला करार संपवल्यानंतर ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर लीड स्पॉन्सरचं नाव दिसणार नाही, हे सर्वप्रथम ऑलराऊंडर शिवम दुबे यानं शेअर केलेल्या नव्या किटच्या फोटोमधून स्पष्ट झालं. बीसीसीआयनं तत्काळ नव्या लीड स्पॉन्सरसाठी अर्ज मागवले आहेत. 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा लागेल, तर 16 सप्टेंबरला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑनलाइन गेमिंग रेग्युलेशन बिल मंजूर केलं. या कायद्यामुळेच ड्रीम 11नं बीसीसीआयसह करार तोडला, अशी माहिती समोर आली आहे. बीसीसीआयनं पुढील तीन वर्षांसाठी लीड स्पॉन्सरशिपचे दर निश्चित केले आहेत — दोन देशांमधील सामन्यांसाठी साडेतीन कोटी आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांसाठी दीड कोटी रुपये. बोर्डाला यामधून 400 कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे. यापूर्वीही टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजक वारंवार बदलले आहेत. सहारा, स्टार, ओप्पो, बायजू आणि ड्रीम 11 या कंपन्या विविध कारणांमुळे करार संपवून निघून गेल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय आता अधिक स्थिर आणि दीर्घकालीन स्पॉन्सरशिपसाठी प्रयत्नशील आहे.