प्रतिनिधी : कोकणधारा
दोडामार्ग : साटेली-भेडशी ग्रामपंचायत हद्दीतील थोरलेभरड–सज्जनवाडी येथील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे किंवा काम थांबविणाऱ्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालय, दोडामार्ग येथे मंगळवार (दि. १० मार्च २०२६) पासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
दररोज सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामस्थ आंदोलनात सहभागी होत असून रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. बुधवारी साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांना पाठिंबा दिला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गुणाजी कदम यांनी संबंधित PWD अधिकाऱ्यांना व दोडामार्ग पोलिस ठाण्याला जाब विचारत सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलनात सहभाग घेतला.
याशिवाय साटेली-भेडशी परिसरातील काही ग्रामस्थांनी रात्री आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे, हीच ग्रामस्थांची मुख्य मागणी असून प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा थोरलेभरड–साटेली-भेडशी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.















