प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर तरंग’ या महिलांच्या विशेष गायन कार्यक्रमाने चिपळूणकर रसिकांना सुरेल संगीताची अविस्मरणीय मेजवानी दिली.
स्थानिक महिलांनी आपल्या मधुर आवाजात विविध गीते सादर करत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सुरांची मनमोहक लहर निर्माण केली. महिलांसाठी महिलांनीच सादर केलेल्या या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली आणि प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संगीत शिक्षिका वीणा कुंटे, उत्तरा साडविलकर, मंदा संकपाळ, नाट्य परिषदेच्या सचिव डॉ. मीनल ओक आणि खजिनदार ॲड. विभावरी रजपूत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष योगेश बांडागळे आणि संगीत शिक्षक सतीश कुंटे यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमात विभावरी वाडकर, मानसी शिंदे, अमृता नायर, दीपा ओडल, निकिता सावंत, दीपा गद्रे, मनस्वी राजवाडे, सारिका यादव, सरला शिंदे, स्वाती कार्ले, वीणा परंजपे, अनघा जोशी, मेघना बेहेरे, अदिती तांबे आदींनी विविध गीते सादर करत रसिकांची मने जिंकली. तसेच गंधाली ग्रुप यांनी सादर केलेल्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले.
गायनाला हार्मोनियमवर उत्तरा साडविलकर व निकिता सावंत यांनी साथ दिली. तबल्यावर यदुवीर चोगले, श्रुतिका शिगवण आणि शुभ्रा वाघमारे यांनी सुरेल साथ केली, तर साइड रीदमवर आरुश कुडाळकर यांनी प्रभावी साथ दिली.
या कार्यक्रमातील सहभागी कलाकारांना कोकण गंधर्व राजाभाऊ शंबेकर, डॉ. मिलिंद गोखले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कलाकारांना मेघना गोखले व राहुल साडविलकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे निवेदन अपर्णा नातू आणि संगीता जोशी यांनी केले, तर उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया पोटे यांच्यासह नाट्य परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरेल वातावरण, कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रसिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे ‘स्वर तरंग’ ही मैफल संस्मरणीय ठरली.















