प्रतिनिधी : कोकणधारा
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता. ३) कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांचा सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दरवर्षी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांचा गौरव केला जातो. याच पार्श्वभूमीवर यंदाचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार सौ. स्वप्ना यादव यांना जाहीर करण्यात आला होता.
हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील आनंद भवन, सायबर कॉलेज येथे दिमाखदार वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूरचे खासदार धनंजयराव महाडिक यांच्या हस्ते झाले, तर समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या सोहळ्याला कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या राजश्रीताई पाटील, भागिरथी महिला पतसंस्थेच्या चेअरमन अरुंधती महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लवांडे, सहसचिव सौ. भारतीताई मुथ्था, संचालिका सौ. निलिमा बावणे, ॲड. अंजलीताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. स्वप्ना यादव यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेल्या प्रभावी आणि जबाबदार कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे चिपळूणसह संपूर्ण सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौ. स्वप्ना यादव यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















