प्रतिनिधी : कोकणधारा
सांगली : S3 Training Academy यांच्या वतीने 19 एप्रिल 2026 रोजी स्प्रिंट ड्युअॅथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी आयर्न मॅन प्रशांत दाभोळकर यांची रेस अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. देशभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून S3 Training Academy फिटनेस आणि एंड्युरन्स खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करत आहे. स्पर्धेचे स्वरूप आव्हानात्मक असून त्यामध्ये प्रथम 5 किलोमीटर धावणे, त्यानंतर 20 किलोमीटर सायकलिंग आणि शेवटी 2.5 किलोमीटर धावणे असा क्रम असणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधील खेळाडू उत्साहाने सहभागी होतात. 18 ते 30, 31 ते 45, 46 ते 55 तसेच 56 वर्षांवरील अशा विविध वयोगटांमध्ये स्पर्धा होणार असल्याने सर्व वयोगटातील खेळाडूंना आपल्या क्षमतेची चाचणी घेण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.
या उपक्रमामुळे रनिंग आणि सायकलिंग या खेळांबाबत जनजागृती होत असून फिटनेस संस्कृतीला चालना मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन S3 Training Academy चे रेस डायरेक्टर व अध्यक्ष संतोष शिंदे आणि रेस अँबेसिडर आयर्न मॅन प्रशांत दाभोळकर यांनी केले आहे.















