प्रतिनिधी : कोकणधारा
खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत संबंधित कुटुंबाच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, ऐन ईदच्या तोंडावर संसाराचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आगीची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक (गटनेते) रहीम सहीबोले, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, आमीर महाडीक तसेच अनेक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. यावेळी भरणे नाका येथील शिरीषकर वॉटर सप्लायर्सचे गणेश शिरीषकर यांनीही आपल्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत अग्निशमन दलाला मोलाची मदत केली.
अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दरम्यान, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून काही दिवसांतच ईदचा सण साजरा होणार आहे. अशा आनंदाच्या वातावरणात ही दुर्घटना घडल्याने संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.















