प्रतिनिधी : कोकणधारा
खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुजन गोपाल दास (वय २९, मूळ रा. बंगाल, सध्या रा. आवाशी, खेड) असे मृत कामगाराचे नाव असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता तीन झाली आहे.
६ मार्च रोजी खान केमिकल कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाला होता. या स्फोटामुळे गरम रसायन कामगारांच्या अंगावर उडाले, तसेच छप्पर कोसळल्याने एकूण अकरा कामगार जखमी झाले होते. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात हलवण्यात आले होते.
या दुर्घटनेत यापूर्वी ११ मार्च रोजी मुरडे येथील रघुनाथ खंडू खामकर (वय ५७) यांचा, तर १२ मार्च रोजी लातूर येथील असद खान यांचा मृत्यू झाला होता. उपचार सुरू असलेल्या कामगारांपैकी सुजन दास याने सोमवारी (१६ मार्च) उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
सुजन दास यांचे कुटुंब मूळचे बंगालमधील असून, मागील ३० वर्षांपासून ते आवाशी येथे वास्तव्यास आहे. वडील गोपाल दास यांनी मेहनतीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करत येथे घर उभारले. सुजनचे शिक्षणही स्थानिक पातळीवर झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याच्या बहिणीचा विवाह पार पडला होता. आनंदाचे वातावरण असतानाच सुजनच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जखमी कामगारांवर अद्याप उपचार सुरू आहेत.















