खेड : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आलेले खेड येथील शासकीय विश्रामगृह सध्या बंद अवस्थेत असून कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प वापराविना पडून असल्याचे चित्र आहे. सुमारे २ कोटी ८० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आवश्यक निधी उपलब्ध न झाल्यामुळे उर्वरित काम रखडले आहे.
सध्या तळमजल्यावरील चार सूट्सचे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांसाठी सेवा सुरू करण्यात आलेली नाही. केअरटेकर, चौकीदार आणि खानसामा ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने विश्रामगृहाचे व्यवस्थापन करणे अशक्य ठरत आहे. परिणामी, ऑनलाईन बुकिंग सेवाही सुरू करण्यात आलेली नाही.
शासनाने मोठा निधी खर्च करून उभारलेली ही वास्तू वापराविना पडून असल्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हंगामी तत्वावर कर्मचारी उपलब्ध करून देत विश्रामगृह तातडीने सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.














