प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी : राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणास स्थगिती देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. ९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यासाठी देण्यात येणाऱ्या इरादापत्रांच्या (Letter of Intent) प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
राज्यातील विविध संघटनांकडून ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांचे खुले धोरण बंद करण्याबाबत शासनाकडे सातत्याने मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत खुले धोरणास तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले.
परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांसाठी देण्यात येणाऱ्या इरादापत्रांच्या कामकाजास स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.















