konkandhara.com

8 मार्च 2026

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा खेड : मुंबई–गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत प्रवीण गीते हा तरुण आपल्या मित्रासह रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (एमएच ०८ बीबी ५७९०) या दुचाकीवरून मुंबई–गोवा महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात होता. भरणे गावाच्या हद्दीत शिंदेवाडी परिसरात दुचाकी भरधाव वेगात असताना चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी महामार्गावर घसरली. या अपघातात अद्वैत महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जोरात आपटला. डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला अद्वैतचा मित्रही गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ कळंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्वैत गीते हा नवभारत हायस्कूलचे शिक्षक प्रवीण गीते यांचा मुलगा असून त्यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील तिसंगी आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नातेवाईक, हितचिंतक आणि मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्वैतचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली.दरम्यान, अद्वैत आपल्या मित्रांसोबत जेवणासाठी महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू Read More »

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील अत्याधुनिक सभागृह कलाकारांसाठी खुले – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील अत्याधुनिक सभागृह कलाकारांसाठी खुले – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांच्या हक्काच्या व्यासपीठाची प्रतीक्षा आता संपली असून रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील नूतनीकृत आणि अत्याधुनिक सभागृह स्थानिक कलाकारांसाठी समर्पित करण्यात आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात शनिवारी रात्री या नूतनीकृत सभागृहाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.उद्घाटन प्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या मंगल मंत्रोच्चारात कोनशिलेचे अनावरण व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.ए. परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला, भारुड आणि लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तसेच नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मीनार गजानन पाटील यांचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी विशेष कौतुक केले. तसेच प्रा. आनंद आंबेकर आणि डॉ. शशांक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. उदय सामंत म्हणाले की, “रत्नागिरीत कलाकारांसाठी अत्याधुनिक सभागृहाची गरज होती. ही गरज ओळखून अत्यंत कमी कालावधीत हे सभागृह सज्ज करण्यात आले असून या माध्यमातून रत्नागिरीच्या समृद्ध संस्कृतीला आणि कलाविश्वाला नवे बळ मिळेल.” या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, डॉ. राजश्री देशपांडे, प्राचार्य कीर्तीकुमार भोसले, समीर इंदुलकर, अनिल दांडेकर यांच्यासह नगरसेवक, कलाकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. तसेच पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या कार्याचा गौरव करणारे पद्यरूप गौरवपत्र यावेळी त्यांना प्रदान करण्यात आले.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील अत्याधुनिक सभागृह कलाकारांसाठी खुले – पालकमंत्री डॉ. उदय सामंत Read More »

mumbai-goa-highway-inauguration-nitin-gadkari-statement

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाला मोठ्या प्रमाणावर विलंब झाल्याने या महामार्गाचे उद्घाटन करण्याबाबत आपल्यालाच संकोच वाटत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन आपण करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाबाबत अनेक वर्षांपासून विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत कामाला झालेल्या उशिराबद्दल खंत व्यक्त केली. महामार्गाच्या कामातील अडथळे दूर करून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा मार्ग हा कोकणातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होणार आहे.

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी Read More »

kajal-shirsat-bds-dentist-pal-punarvasan-dodamarg

पाल पुनर्वसनच्या काजल शिरसाट दंतवैद्य बनल्या ; BDS पदवी संपादन करून तालुक्याचा मान उंचावला

दोडामार्ग / भूषण सावंत दोडामार्ग : पाल पुनर्वसन (ता. दोडामार्ग) येथील शरद कृष्णा शिरसाट यांची कन्या काजल शरद शिरसाट हिने Pandit Deendayal Upadhyay Dental College, सोलापूर येथून BDS (Bachelor of Dental Surgery) हा ४+१ वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून दंतवैद्य ही पदवी संपादन केली आहे. सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवी प्रदान समारंभात तिला अधिकृतरीत्या ही पदवी बहाल करण्यात आली. काजल शिरसाट हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आपल्या कुटुंबाचे तसेच पाल पुनर्वसन परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. BDS हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये चार वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम आणि एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते. या कालावधीत विद्यार्थ्यांना दातांचे विविध आजार, त्यांचे निदान, उपचार पद्धती, शस्त्रक्रिया तसेच आधुनिक दंतवैद्यकीय तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. सोलापूर येथील Pandit Deendayal Upadhyay Dental College हे दंतवैद्यकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध महाविद्यालय मानले जाते. येथे आधुनिक साधनसामग्री आणि अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून काजल शिरसाट आता समाजसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. काजल शिरसाट यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह पाल पुनर्वसन व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन यश संपादन करावे, यासाठी काजल शिरसाट या प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. त्यांच्या या यशामुळे पाल पुनर्वसनसह दोडामार्ग तालुक्याचा अभिमान अधिक उंचावला आहे.  

पाल पुनर्वसनच्या काजल शिरसाट दंतवैद्य बनल्या ; BDS पदवी संपादन करून तालुक्याचा मान उंचावला Read More »