konkandhara.com

1 मार्च 2026

शिरोडा वेळागर येथे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात

शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान उत्साहात; विविध मान्यवरांची उपस्थिती

सिंधुदुर्ग | भूषण सावंत (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने भव्य स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ओरोस, पिंगुळी, माजगाव, सावंतवाडी, बांदा, तळवडे, शिरोडा आणि वेंगुर्ला येथील श्री समर्थ बैठकांमधील श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत स्वच्छतेचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपली. या स्वच्छता अभियानात सौ. लतिका लक्ष्मण रेडकर (सरपंच, शिरोडा), सौ. सुमती हरिश्चंद्र मसुरकर (माजी पंचायत समिती सदस्य), सिद्धेश विष्णू परब (माजी उपसरपंच), श्री. पांडुरंग बापू नाईक (ग्रामपंचायत सदस्य), श्री. निलेश मयेकर (मंडळ निरीक्षक), केशव कुडव (पोलीस पाटील, तळवडे) आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमादरम्यान परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. “स्वच्छ गाव, सुंदर गाव” हा संदेश देत ग्रामस्थांनी स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. या अभियानामुळे परिसर स्वच्छतेकडे सकारात्मक वाटचाल करत असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान उत्साहात; विविध मान्यवरांची उपस्थिती Read More »

चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूण | योगेश बांडागळे (प्रतिनिधी): चिपळूणमध्ये माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राधाताई लाड सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. “लोकांना राजकारणाशी काही देणंघेणं नाही, त्यांना विकास हवा आहे. कुडाळ मतदारसंघासोबतच चिपळूणमधील विकासकामांचाही नियमित फॉलोअप घेणार,” अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसाचे १६ तास काम करतात तसेच पालकमंत्री उदय सामंत यांचे सातत्याने सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना महिला आघाडी प्रमुख रश्मी गोखले, जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, तालुकाप्रमुख बापू आयरे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, गटनेते अंकुश आवले, पाणी समिती सभापती निहार कोवळे, माजी नगरसेवक करामत मिठागरी, शिक्षण व क्रीडा समिती सभापती हर्षाली पवार, नीलम जाधव, राणी महाडिक, रुपेश घाग, दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले. परिमल भोसले हे धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांना पक्षात सन्मानाने स्थान द्यावे, असे आवाहन आमदार राणे यांनी केले. तसेच पाग पॉवर हाऊस परिसरात उड्डाणपुलासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या पक्षप्रवेशामुळे चिपळूणमधील स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश Read More »

श्री सदस्यांचे कार्य समाजासाठी आदर्श : उमेश सकपाळ

श्री सदस्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी आदर्श – नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ

चिपळूण | कोंकणधारा प्रतिनिधी : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेच्या समारोप प्रसंगी बोलताना चिपळूणचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. श्री सदस्यांच्या वतीने चिपळूण शहरात सकाळी साडेसात ते ११ या वेळेत भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हजारो श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. “श्री सदस्यांनी ज्या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने चिपळूण शहर स्वच्छ केले, ते पाहून मनापासून अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेले संस्कार आणि समाजसेवेचा संदेश आजही त्यांच्या कार्यातून जिवंत असल्याचे दिसते,” असे नगराध्यक्ष सकपाळ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणारे वृक्षारोपण उपक्रमही प्रेरणादायी आहेत. केवळ वृक्षारोपण न करता ती झाडे जपण्याची जबाबदारी श्री सदस्य स्वतः घेतात, ही बाब उल्लेखनीय आहे. स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी उभा केलेला आदर्श समाजासाठी मार्गदर्शक आहे.” नगराध्यक्षांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगर परिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. श्री सदस्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी स्वच्छ आणि सुंदर चिपळूण घडवूया.” समारोप प्रसंगी नगर परिषदेच्या वतीने श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, नगरसेवक अंकुश आवले, कपिल शिर्के, वैशाली कदम, शिल्पा देसाई, अजय भालेकर, नसरीन खडस, शहनाज वांगडे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार आरोग्य निरीक्षक सुजित जाधव व श्री सदस्य मनोज पवार यांनी मानले. — लेखक : कोंकणधारा डेस्क

श्री सदस्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी आदर्श – नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ Read More »

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील अनधिकृत धार्मिक फलक प्रशासनाने काढले; निवेदनानंतर तात्काळ कारवाई.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील धार्मिक फलक हटवले

रत्नागिरी | कोंकणधारा प्रतिनिधी : रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी परिसरात अनधिकृतपणे लावण्यात आलेले धार्मिक आशयाचे फलक प्रशासनाने काढून टाकले आहेत. संबंधित निवेदनाची दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या इमारतींच्या भिंतींवर ‘इफ्तारी का इंतिजाम’ आणि ‘सेहरी का इंतजाम किया जाएगा’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. हे फलक Young Memon Welfare Foundation आणि Armaan Group Ratnagiri या संस्थांच्या नावाने लावले असल्याचे समोर आले. या संदर्भात हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे निवेदन सादर करून शासकीय ठिकाणी कोणत्याही धर्मविशिष्ट फलकांना परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच संबंधित फलक तात्काळ काढावेत आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. निवेदनानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी फलक हटवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधित फलक काढून टाकले. या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या वतीनेही लेखी पत्र देण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारचे फलक लावले जाणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कारवाईनंतर शासकीय परिसरात नियमांचे पालन सुनिश्चित करण्यावर प्रशासनाने भर दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील धार्मिक फलक हटवले Read More »

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह आजपासून प्रवास सुरू मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! सिंधुदुर्ग –महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मुंबईतील भाऊचा धक्का येथे या सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर ही बोट विजयदुर्गकडे प्रस्थान करणार असून, या प्रवासासाठी प्रवाशांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. पहिल्याच दिवशी विविध श्रेणींमधून जवळपास सर्वच तिकीट बुकिंग होत आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे की, सुमारे ६२६ प्रवासी आणि मोठ्या संख्येने वाहने वाहून नेण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक रो-रो जहाज मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण करणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी समुद्रप्रवासासोबतच पर्यटकांना कोकणचा विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा अनुभवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. ही सेवा महाराष्ट्राच्या सागरी वाहतुकीच्या इतिहासातील एक नवीन आणि वैभवशाली अध्याय ठरणार असून, भविष्यात या सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. कोकणाला वेगवान कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि राज्याच्या सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर प्रत्यक्षात साकार झाला आहे. या प्रतिसादाबद्दल बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, कोकणवासीयांनी या सेवेचे केलेले स्वागत हे या प्रकल्पाच्या यशाची पावती आहे. या सेवेमुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल. उद्याच्या पहिल्या फेरीसाठी झालेल्या बुकिंगच्या तपशिलानुसार, सर्वाधिक पसंती इकोनॉमी श्रेणीला मिळाली असून प्रीमियम श्रेणी, बिझनेस श्रेणी आणि प्रथम दर्जा (फर्स्ट क्लास) श्रेणीत देखील प्रवाशांनी आपले स्थान आरक्षित केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ₹३,००० पासून ₹९,००० पर्यंतचे विविध तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. केवळ प्रवासीच नव्हे तर वाहनांच्या वाहतुकीसाठीही या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच दिवशी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. या प्रतिसादावरून मुंबई-कोकण प्रवासासाठी ही सेवा किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते.

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये स्वच्छता मोहीम

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये भव्य स्वच्छता मोहीम

चिपळूण | कोंकणधारा प्रतिनिधी : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आज रविवारी चिपळूण शहरात श्री सदस्यांच्या वतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळपासूनच शहरातील विविध भागांत स्वच्छतेसाठी पथके कार्यरत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या मोहिमेचा शुभारंभ पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, शिवसेनेचे गटनेते अंकुश आवले, नगरसेविका शिल्पा देसाई, वैशाली कदम तसेच नसरीन खडस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि बायपास परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत ही मोहीम उत्साहात पार पडली. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मार्कंडी व गुहागर बायपास रोड परिसरात उपस्थित राहून स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि श्री सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले. दरवर्षी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला जातो. यंदाही हजारो श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याचा संदेश दिला. या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी आणि नागरिक सहभाग याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. लेखक : कोंकणधारा डेस्क

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये भव्य स्वच्छता मोहीम Read More »