चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला कठोर शब्दांत इशारा देत माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. “जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला स्वस्त बसू देणार नाही. वेळ आली तर नेपाळसारखे घरात घुसू,” अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी गावात झालेल्या जनसभेत ते बोलत होते.
या सभेत कडू यांनी शेतकरी आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “सरकार शेतकऱ्यांना सातत्याने लुटत आहे. आम्हाला पेटवणं जमणार नाही, पण घरात बांधून ठेवण्याची ताकद आहे,” असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी कडू यांनी शेतकऱ्यांसाठी 28 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषाही स्पष्ट केली.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला भाव द्यावा यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी करत आहेत. “देशातील 200 उद्योगपत्यांचे 18 ते 24 लाख कोटी कर्ज सरकार माफ करू शकते, पण शेतकऱ्यांचे 30–40 हजार कोटींचं कर्ज माफ करायला तयार नाही. सोयाबीन, तूर, धान याला 20 टक्के बोनस आणि जीएसटीचा परतावा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी इशारा दिला की, “15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाही, तर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन ठेवणार.”
सभाेत बोलताना बच्चू कडू यांनी पुढे सांगितले, “मी कुठल्याही जातीसाठी बोलणार नाही. प्रत्येक जातीने आपले आरक्षणासाठी लढावं, पण मी फक्त शेतकऱ्यांसाठी लढणार. शेतकरी हा प्रत्येक जाती-धर्मात आहे. त्यांच्यासाठी मी आयुष्य वाहणार आहे.”
गोरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. “गोरक्षणाच्या नावाखाली काही गुंड-कार्यकर्त्यांचे पोट भरते, पण गाईला शेतकऱ्यांकडे ठेवलं तर काहीच मदत मिळत नाही. गोरक्षकांना अनुदान देता, मग शेतकऱ्यांना का नाही?” असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, गोदावरी पट्टा पूरग्रस्त असतानाही मुख्यमंत्री फडणवीस दौऱ्यावर गेले नाहीत, अशी टीकाही कडू यांनी यावेळी केली. “हेच लोक उद्धव ठाकरेंना नाव ठेवत होते, पण आता स्वतः ऑनलाईन झाले आहेत,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.



















