प्रतिनिधी : कोकणधारा
संगमेश्वर : साखरपा येथील जाधववाडी जवळ, गद्रे पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास खासगी आराम बसला भीषण आग लागून बस पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ३० प्रवासी सुखरूप बचावले असून मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) हे एनएल ०१, बी २४४२ क्रमांकाची आराम बस पुणे येथून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ३० प्रवाशांना घेऊन रत्नागिरीकडे निघाले होते. आज पहाटे बस साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर आली असता गाडीने अचानक पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आले.
चालकाने तत्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी.
घटनेची माहिती मिळताच देवरूख अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णतः भस्मसात झाली होती. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, हेडकॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली तसेच प्रवाशांना सहकार्य केले.















