मुंबई : शिवसेना नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी मोठा गदारोळ झाला. शिवसेना (ठाकरे गट) आमदार महेश सावंत यांनी थेट पोस्टर दाखवत सरवणकरांच्या दोन दिवसांपूर्वीच्या वक्तव्याचा उल्लेख केला आणि सरकारवर जोरदार टीका केली.
सरवणकर यांनी नुकतंच, “आमदारांना दोन कोटी निधी मिळतो, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटींचा निधी मिळतो,” असं विधान केलं होतं. याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी बैठकीत संताप व्यक्त केला. “तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिलात आणि त्यांनी स्वतःचा विकास केला. पण आम्हाला निधी मिळत नाही. माजी आमदार बोलत आहेत की त्यांना 20 कोटी निधी मिळतो, आणि आम्हाला निधी मिळत नाही,” असा सवाल सावंतांनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदेंसमोर केला.
यावेळी सावंतांनी आणखी कठोर शब्दांत इशारा दिला – “तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे, पण आम्हीही ‘दादा’गिरीतून आलो आहोत. माजी आमदारांना खूप निधी दिला, पण कामे झाली नाहीत. त्यांनी तो निधी स्वतःचा विकास करण्यासाठी वापरला आहे. त्यामुळे साहेब, तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी, त्यांना कानमंत्र द्यावा.”
दरम्यान, सावंत यांनी स्थानिक विकासाच्या विविध मागण्याही पुढे केल्या. माहिम किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी निधी द्यावा, माहिममध्ये सायकलिंग ट्रॅक उभारावा, तसेच जीर्ण अवस्थेतील शाळांची डागडुजी करून विद्यार्थ्यांना वर्ग मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली.
सिद्धिविनायक मेट्रो स्थानकासमोरील आकर्षक हत्तीचा पुतळा आजही बसविला गेला नाही, कारण मेट्रो आणि पालिकेत ताळमेळ नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, दादर विभागातील पोलीस स्थानक म्हाडाच्या इमारतीत कार्यरत आहे, त्याला स्वतंत्र जागा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, मुंबईतील सर्व पुतळ्यांजवळ सीसीटीव्ही बसविण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
या सर्व प्रकरणामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापलं आणि विरोधी पक्षाचा आमदार निधी या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.