प्रतिनिधी : कोकणधारा
रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत रोहा तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली असून, माजी तालुका प्रमुख व माजी उपजिल्हाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा नगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अधिकृत धोरणांविरुद्ध जाऊन विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा संशय मनोजकुमार शिंदे यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळाले असले, तरी मागील नगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. या अपयशामागे पक्षविरोधी वर्तणूक कारणीभूत ठरल्याचा ठपका पक्षाने ठेवला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली रोहा येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत तालुक्यातील राजकीय घडामोडी, संघटनात्मक स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीचा आढावा घेण्यात आला.
कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मनोजकुमार शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर, केवळ व्यक्तीवर कारवाई करून न थांबता संपूर्ण रोहा तालुका कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णयही बैठकीत जाहीर करण्यात आला.
पक्ष संघटना नव्याने उभारण्यासाठी लवकरच निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांची नवीन फळी जाहीर केली जाईल, असे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मनोजकुमार शिंदे यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता, मात्र आता त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई झाल्याने रोहा तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राजा केणी यांचे वक्तव्य
“पक्षामध्ये शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करणे संघटनेच्या हिताचे आहे. लवकरच रोहा तालुक्यात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल.”
— राजा केणी, जिल्हाप्रमुख, शिवसेना (रायगड)















