विशेष प्रतिनिधी, कोकणधारा
रत्नागिरी : रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शहराची वाढती सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत सुसज्ज मिनी थिएटर उभारण्यात आले आहे.
या मिनी थिएटरचे उद्घाटन ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
या नव्या नाट्यगृहामुळे रत्नागिरीतील सांस्कृतिक चळवळीला नवी चालना मिळणार असून स्थानिक कलाकारांना विविध कार्यक्रम सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या मिनी थिएटरची एकूण आसन क्षमता ३०० असून लघु नाट्यप्रयोग, नाट्यछटा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने तसेच विविध कलात्मक उपक्रमांसाठी हे नाट्यगृह उपयुक्त ठरणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला कला व संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे या परंपरेला अधिक बळ मिळणार असून या मिनी थिएटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, कलाकार व रंगकर्मींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.















