रत्नागिरी, कारवांचीवाडी पारसनगर येथे एका आईने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतक बालिकेचे नाव हुरेन आसिफ नाईक असून, तिचा मृतदेह रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. ही घटना रत्नागिरी तालुक्यासह शहरात खळबळ उडवणारी ठरली आहे.
घटनेच्या तपशीलानुसार, रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील या तरुणीचा विवाह चिपळूणजवळील गावातील तरुणाशी झाला होता. या दाम्पत्याला आधीच चार वर्षांची एक मुलगी आहे. पती कामानिमित्त परदेशात असल्याने महिला आपल्या माहेरी, कारवांचीवाडी येथे राहत होती.
महिलेवर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी तिची बहीण बाहेर गेली असताना, आरोपीने आठ महिन्यांच्या हुरेनच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबल्याने बाळाचा गुदमरण झाला. ही घटना शेजाऱ्यांना उघडकीस आली आणि त्यांनी तातडीने बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.
ग्रामीण पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आईने असे कृत्य का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.














