प्रतिनिधी : कोकणधाराराजापूर : तालुक्यात गुरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गावरील नेरकेवाडी येथे करण्यात आली.
याबाबतची फिर्याद अक्षय सुनिल घुमे (रा. बंगालवाडी, ता. राजापूर) यांनी दिली आहे.
त्यानुसार चंद्रकांत महादेव कुर्ले (रा. कोंढेतड, ता. राजापूर), तबरेज चांदमियाँ ठाकूर (रा. परटवली, ता. राजापूर) आणि एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता आरोपी क्रमांक १ हा आपल्या ताब्यातील महिंद्रा मॅक्सिमो (क्र. एमएच ०४ एफडी २४१६) या वाहनातून तीन गोवंश जनावरांची वाहतूक करत होता. या जनावरांना पाणी व खाद्य न देता, दोरीने घट्ट बांधून वेदना होईल अशा पद्धतीने हौद्यात कोंबून कत्तलीसाठी पाठविण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०, प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांचे परिवहन नियम १९७८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सायंकाळी ६.२४ वाजता नोंदविण्यात आला.
पोलिसांनी कारवाईदरम्यान एक महिंद्रा मॅक्सिमो वाहन व तीन गोवंश जनावरे असा एकूण सुमारे ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.















