प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या वतीने, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहयोगाने आयोजित “प्लास्टिक मुक्त चिपळूण होम मिनिस्टर” स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पार पडला.
चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट २०२५ पासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे बक्षीस वितरण यापूर्वीच झाले होते. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या चार महिन्यांचा बक्षीस वितरण सोहळा निवडणूक कार्यक्रमांमुळे रखडला होता. या चार महिन्यांचा एकत्रित बक्षीस वितरण कार्यक्रम यावेळी संपन्न झाला.
या कालावधीत एकूण २७२ महिलांनी सहभाग घेत २४११ किलो प्लास्टिक जमा केले. स्पर्धेच्या निकालानुसार सौ. उमा आलेकर यांनी सर्वाधिक प्लास्टिक जमा करत विशेष कामगिरी केली, तर सौ. स्वप्नाली निवाते यांनी सर्वाधिक महिलांना या स्पर्धेत सहभागी करून घेतले.
सातपेक्षा अधिक कुपन देणाऱ्या १६८ महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये शीला शंकर ओतारी या भाग्यवान ठरल्या. तसेच एकूण सहभागी २७२ महिलांमधून ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाऐवजी लकी ड्रॉ काढण्यात आला, त्यामध्ये प्रियांका विनोद शिंदे या चिपळूण होम मिनिस्टर पैठणीच्या मानकरी ठरल्या.
या कार्यक्रमाला चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, उपसभापती राणी महाडिक, आरोग्य सभापती शुभम पिसे, शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवार, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, मुख्याधिकारी संजय जाधव, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे प्रमुख भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे यांच्यासह नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटक कंपनी चिपळूणचे उपाध्यक्ष योगेश बांडागळे यांनी केले.















